


✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.17मे):-भारतातील लोकशाही ही संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे. देशाच्या हितासाठी व सर्वांगीण विकासासाठी मतदान करणे अनिवार्य आहे.त्यासाठी मतदान जनजागृती आणि प्रबोधनही तितकेच आवश्यक असून त्यात युवकांची भूमिका महत्वपूर्ण ठरेल.सोबतच नव्यानेच महाविद्यालयीन स्तरावर स्थापन झालेल्या निवडणूक साक्षरता मंडळाची मोलाची मदत होईल असे मत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. प्राचार्य डॉ. सुभाष मुरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली त्यात निवडणूक साक्षरता मंडळ नोडल अधिकारी म्हणून प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांचे कडे पदभार सोपविण्यात आला.तसेच मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनमोल मून तर उपाध्यक्ष म्हणून कोमल गोबाडे यांची निवड करण्यात आली.लोकशाही बळकटी आणि जनजागृती व प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, पथनाट्य,एकांकिका इत्यादीचे माध्यमातून विविध उपक्रम कसे राबविणार आहे याबाबतचे सविस्तर असे मार्गदर्शन डॉ नरेश इंगळे यांनी केले.सूत्रसंचालन मयुरी रताळे तर आभार प्रदर्शन पूनम शिवणकर हिने केले.मंडळ स्थापना कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




