क्रांतिकारकांचा आणखी किती अपमान करणार?

50

नुकताच कर्नाटक मधील भाजप सरकारने शालेय पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमातून शहीद भगतसिंग यांच्यावरील धडा काढून टाकून, अभ्यासक्रमात आरएसएस चे संस्थापक केशव हेडगेवारांच्या भाषणाचा समावेश केला आहे. भगतसिंग-सरदार पटेलांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्याच नावाने गांधी-नेहरूंवर दिवसरात्र आरोप करणाऱ्यांच्या लेखी क्रांतिकारकांची आधीही किंमत नव्हती आणि आता तर नाहीच.

स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व पणाला लावणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आरएसएस आणि भाजपच्या मनात कायम द्वेष भरलेला दिसतो. गांधी-नेहरूंनी भगतसिंगांसाठी काही केलं नाही म्हणत असतांना RSS ने भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी काय केलं? हे मात्र सांगत नाहीत. गांधींनी सुभाषचंद्र बोसांना दुखावलं सांगतांना डॉ. हेडगेवारांनी दोन वेळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली हे ते लोक सांगत नाहीत. गांधींनी सरदार पटेलांना डावललं सांगतांना ह्याच सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती ही माहिती हे लोक सांगत नाहीत. कारण संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांना व विरोधकांना दोघांनाही माहित आहे कि ह्या दोन्ही संघटना स्वातंत्र्यलढयात दूरदूरपर्यंत कुठेच नव्हत्या.

देशासाठी आपले प्राण अर्पण करणारे शहीद भगतसिंग. संपूर्ण देशातील युवकांमध्ये क्रांतिकार्य भरणारे, देशभक्ती पेरणारे भगतसिंग. मला अजिबात माफी नकोय तर आम्हाला युद्धकैदी म्हणून बंदुकीने उडवा म्हणणारे शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढून टाकला जातो. पण कायम ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या, ब्रिटिशांची मर्जी राखणाऱ्या आणि जे युवक स्वातंत्र्यलढ्यात येऊ इच्छितात त्यांना स्वातंत्र्यलढ्यापासून रोखणाऱ्या डॉ. हेडगेवारांचे भाषण मात्र पाठ्यपुस्तकात घेतल्या जाते हे किती संतापजनक आहे.

संघीय लेखक श्री.सी.पी. भिशीकर यांनी त्यांच्या ’केशव – संघ निर्माता’ या पुस्तकात संघाच्या स्थापनेनंतर डॉ.हेडगेवारांनी ब्रिटिशांच्या विरोधी एक शब्दही उच्चारला नाही असे नमूद केले आहे. डॉ. हेडगेवारांना स्वातंत्र्यलढ्याबद्दल जराही आस्था नव्हती. स्वतःला तर नव्हतीच परंतु स्वातंत्र्य लढयात भाग घेण्यास इच्छुक तरुणांना या लढ्यापासून परावृत्त करण्याचाच त्यांचा सतत प्रयत्न असे. हे सिद्ध करणारा एक प्रसंग स्वतः गोळवलकर गुरुजींनीच सांगितला आहे. असहकार आंदोलनाच्या काळात काही तरुण डॉ.हेडगेवारांना भेटायला आले होते. असहकाराच्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले होते. स्वातंत्र्याचा क्षण जवळ आला आहे असे अनेकांना वाटू लागले होते. अशा वेळी संघाने स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्त राहू नये, असे त्यांतील एका तरुणाचे मत होते. त्याने त्याचे मत अत्यंत स्पष्ट शब्दांत डॉ.हेडगेवारांना सांगितले. मी स्वतः जेलमध्ये जायला तयार आहे असेही तो म्हणाला. त्यावेळी डॉ.हेडगेवार म्हणाले, छान, जरूर सत्याग्रहात जा. पण मग दोन वर्षे तुझा प्रपंच कोण आणि कसा चालविणार? त्यावर तो तरुण म्हणाला, त्याची काळजी नको. मी त्याची तजवीज केली आहे. ती माझ्या संसाराला दोन वर्षे पुरेल आणि दंड भरावा लागला, तर त्याचीही मी तरतूद केली आहे. यावर डॉ.हेडगेवार म्हणाले, फारच छान! तू दोन वर्षांची तरतूद करून ठेवलीच आहेस, तर उद्यापासून तू संघाचे दोन वर्षे पूर्णवेळ काम कर. त्यानंतर तो तरुण संघातही आला नाही आणि जेलमध्येही गेला नाही.

(श्री.गुरुजी समग्र दर्शन, खंड-4,पृष्ठ 39-40,अनडुईंग इंडिया दी आरएसएस वे शमसुल इस्लाम) म्हणजे स्वतः स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे दुरच पण ज्यांची ईच्छा आहे त्यांनाही त्यापासुन दुर ठेवले ही यांची देशभक्ती. अशा लोकांची भाषणे पाठ्यपुस्तकात घेऊन नवीन पिढीला काय शत्रूंची गुलामी करण्याची प्रेरणा द्यायची का?नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दोन वेळा डॉ. हेडगेवारांच्या भेटीचे प्रयत्न केले. त्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांना पाठवले. परंतु आपण ब्रिटिशांच्या काळ्या यादीत येऊ या भीतीने डॉ. हेडगेवारांनी सुभाषबाबूंची भेट टाळली. कधीकाळी सरसंघचालक डॉ. हेडगेवारांचे निकटचे सहकारी असलेल्या श्री. मा. ह. हातिवलेकर यांनी ’अक्षर वैदर्भी’च्या 1991 च्या अंकात ’एक सहप्रवास; सावरकर-संघ मार्क्सवाद’ या लेखात बाळाजी हुद्दार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. हेडगेवार यांच्या तथाकथित भेटीबाबत सांगितलेल्या प्रसंगाची आपल्या लेखात पुष्टीच केली आहे. या लेखात ’नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बाळाजी हुद्दार मार्फत संघाच्या सहकार्याच्या अपेक्षेने पाठविलेल्या दूताची भेटही डॉ.हेडगेवारांनी आजारी असल्याचे सोंग घेऊन टाळली’ हे मा.ह.हातिवलेकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ना.ह.उर्फ नानाजी पालकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते व डॉ. हेडगेवारांचे चरित्रकार यांच्याही ’ डॉ.हेडगेवार प्रेरक जीवन प्रसंग’ या पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दोन वेळा डॉ.हेडगेवारांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु तो दोन्हीही वेळा हुकला असे म्हंटले आहे. हेडगेवारांनी भेट टाळली असं लिहिण्याऐवजी त्यांनीही भेट हुकली असं जरी लिहिलं तरीसुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोसांनीच हेडगेवारांच्या भेटीसाठी प्रयत्न केले होते डॉ.हेडगेवारांनी नाही ही गोष्ट स्पष्ट होते आणि त्यांचेच अनुयायी आज देशभक्ती कशी करावी याचे धडे देतांना दिसतात.

भगतसिंगांसाठी गांधींनी काय केलं अस विचारणार्‍यांना खरेतर भगतसिंगांबद्दल काहीच सोयरसुतक नाही. भगतसिंग हे कम्युनिस्ट विचारधारेचे म्हणजेच हिंदू महासभा व आरएसएसच्या एकदम विरुद्ध विचासरसारणीचे. त्यातही ते नास्तिक. गांधींनी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून वरील व्हॉईसरॉय आयर्विन यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी चर्चा तर केलीच सोबतच आयर्विन यांना गांधीजींनी 5 पत्रेसुद्धा लिहिलीत. ती गांधी वाङ्ममयात उपलब्ध आहेत. प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल हे स्वतः भगतसिंगांचे सहकारी होते. त्यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे व गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदविली आहे. ‘१९२१ ते १९४२ हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘ऍन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिल्या गेलाय त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’ अजून कुठला पुरावा हवाय? पण या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नायकांनी किंवा संघटनांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी कधीच काही केलेलं नाही. यांनी इंग्रज सरकारला एखाद पत्र लिहिलेलं नाही की व्हाइसरॉय ची एखादी भेट घेतलेली नाही, भगतसिंगांना वकील दिला नाही, एखादं आंदोलन केलं नाही किंवा साधा निषेध नोंदविल्याचा सुद्धा इतिहासात उल्लेख नाही. म्हणजेच भगतसिंगांच्या फाशीला मूक संमती असलेल्या डॉ. हेडगेवारांचे भाषण पाठ्यपुस्तकात घुसवायचे आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या भगतसिंगांच्या धडा काढून टाकायचा ही विकृती नाही तर दुसरे काय आहे?

ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात स्वातंत्र्याच्या पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार झपाट्याने विस्तार झाला. हिंदू धर्माच्या प्राचीन आणि उज्वल परंपरांचे गोडवे गाऊन लाखो युवकांना संघशाखांत आणण्यात आले. एक शिस्तप्रिय संघटना उभी करण्यात गोळवलकर गुरुजी यशस्वी झालेत परंतु या लाखो तरुणांतून एकालाही स्वातंत्र्यलढ्यात झोकून देण्याची प्रेरणा गोळवलकर गुरुजी देऊ शकले नाहीत. इतकेच नाही तर हेच संघाचे लोक 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहून ब्रिटिशांना सैन्यभरती व युद्ध प्रयत्नांना मदतच करत होते. यांपैकी एकाही तरुणाने कधीच बंदूक हातात घेऊन ब्रिटिशांवर गोळ्या झाडल्या नाहीत की त्यांच्याविरुद्ध काही कार्य केले नाही. संपूर्ण देश इंग्रजांविरोधात लढत असतांना हे लोक ब्रिटिशांना स्वयंस्फूर्तीने मदत करत होते. सशस्त्र क्रांतिकारकांपासून तर कायम चार हात दूरच राहत होते.

अमृतसर मधील जालियनवाला बागेचे ह्या केंद्र सरकारने आधुनिकीकरणाच्या नावाखाली पूर्णपणे रूप बदलून टाकले आहे. गुजरातमधील साबरमती आणि महाराष्ट्रातील सेवाग्राम हे दोन्ही गांधींचे आश्रम तोडून त्याजागी लोकांच्या मनोरंजनासाठी थीम पार्क बनविण्याचा घाट घातला जातोय. या अगोदर गुजरात मधील सरदार पटेलांच्या नावाने असलेल्या स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम ठेवण्यात आले. नविन भव्य स्टेडियम बांधून त्याला मोदींचे नाव देण्यास कुणाचाही विरोध असण्याचे कारण नव्हते. परंतू देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या सरदार पटेलांचा इतका अपमान तर खुद्द ब्रिटिशांनी सुद्धा कधीच केला नव्हता. ह्यांनी तो केला कारण याच सरदार पटेलांनी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ही संघटना देशद्रोही आहे म्हणून बंदी घातली होती. सरदार पटेलांच्याच निर्देशाने 14 नोव्हेंबर 1948 रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती. त्यात संघ हा राष्ट्रविरोधी (अँटी नॅशनल) आहे असे स्पष्टपणे लिहिलेले होते.नंतरच्या काळात कुणावरही बंदी असू नये या उदात्त धोरणाला अनुसरून ही बंदी उठविण्यात आली. ही बंदी उठवत असतांना त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर संघाने एक करार केला. या करारामधील एक अट अशी होती की , ’संघाने आपल्या घटनेतून व कृतीतून भारतीय राज्यघटना व तिरंगा राष्ट्रध्वज यांचा आदर व बांधिलकी निःसंशय रित्या दाखवून दिली पाहिजे. त्यांचा अपमान करु नये.

( “The R.S.S. leader has undertaken to make the Ioyalty to the Union Constitution and respect for the National Flag more explicit in the Constitution of the R.S.S.” Govt. Communique Dated 11 th July 1949 announcing the lifting of ban; Rashtriya Swayamsevak Sangh: by Deshraj Goyal, New Delhi. pg.205) या वरील अटीवरून आपल्याला काय आकलन होते? असं तुम्ही कुणाला म्हणाल की तुझ्या बोलण्या-वागण्यातून भारतीय राज्यघटना आणि तिरंग्याचा अपमान व्हायला नको? जे अपमान करत असतील त्यालाच ना? मग असा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या, कायम ब्रिटिशांच्या बाजूने असणाऱ्या व क्रांतिकारकांच्या विरोधी कारवाया करणाऱ्या आरएसएस च्या प्रमुख डॉ. केशव हेडगेवारांचे विचार नवीन पिढीला शिकवून हे सरकार काय साध्य करणार आहे?

ह्या गेल्या ८ वर्षात ह्यांनी देशातील वातावरण द्वेषपूर्ण करून टाकले आहे. वारंवार क्रांतिवीरांचा अपमान केला गेलाय. इतिहास बदलविण्याचा घाट घातला जातोय कारण स्वतंत्र्यलढ्याचा आणि आरएसएस आणि भाजपचा काडीचाही संबंध नाही. त्यांना ह्या देशाचा क्रांतीमय इतिहासाचं पुसून काढायचा आहे आणि स्वतः च्या धार्मिक राजकारणाला सोयीस्कर असा इतिहास लिहायचा आहे. कर्नाटकात झालेल्या ह्या घटनेला आपण आज विरोध केला नाही तर उद्या प्रत्येक राज्यात महापुरुषांचा इतिहास हा आपण शिकलेल्या इतिहासापेक्षा खूप वेगळा असेल हे लक्षात असू द्या.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666