29 मे ला कोल्हापुरात आयोजित राजर्षी शाहू विचार संमेलनाचे उदघाटक ना. जितेंद्र आव्हाड तर स्वागताध्यक्ष राजीव आवळे

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.20मे):- निर्मिती विचारमंच, कोल्हापूर
आयोजित लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचा विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे एक दिवसीय राजर्षी शाहू विचार संमेलन दि. 29 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय पाटलांवर राजर्षी शाहू यांचे विचार सर्वांनाच मार्गदर्शक व आदर्शवादी ठरणारे आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे विचारच समतावादी समाज निर्मिती मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. जगभर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर घातला जात आहे. लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार लोकमाणसांपर्यंत पोहचवण्यासाठी या राजर्षी शाहू विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

इतिहास संशोधक प्रा. डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. ना. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे ग्रामविकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ, विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय चोरमारे, सन्माननीय उपस्थिती म्हणून ए. वाय. पाटील, आर. के. पोवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.रविवार दि. 29 मे, 2022 रोजी सकाळी 10:00 पासून सुरु होणाऱ्या या संमेलनातील पहिले सत्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे असून यात निर्मिती फिल्म क्लब निर्मित… सलाम संविधान हा प्रबोधनपर गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात निवेदिका साक्षी चोथे यांच्यासह चंद्रनील सावंत, सानिका नाकील, अनुष्का माने, आदित्य बल्लाळ, माऊली गावडे, राधिका पाटील,
धनश्री नाझरे, अमृता नलवडे, संकेत भोसले, अमोलकुमार बांगर, विश्ववेदा सावंत, ओंकार सुतार, इंद्रजित जोशी, विक्रम परीट आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

दुपारी 12 वाजता उदघाटन आणि खुली चर्चा असे दुसरे सत्र होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीव आवळे हे असणार आहेत.संमेलनाचे मुख्य निमंत्रक निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने, प्रा. डॉ. शोभा चाळके-म्हमाने सहनिमंत्रक धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन सुरेश केसरकर, महादेव चक्के, प्रागतिक लेखक संघाचे चंद्रकांत सावंत, सिद्धार्थ कांबळे हे असून यावेळी प्रा. डॉ. कपिल राजहंस यांनी संपादित केलेल्या एक हजार हुन अधिक पानांच्या सर्वव्यापी शिवराय या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

निर्मिती प्रकाशनाच्या प्रकाशिका, कवयित्री, लेखिका डॉ. शोभा चाळके यांनी शिवाजी विद्यापीठाची इंग्रजी विषयातील पीएच. डी. (Ph. D.) पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या संमेलनात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत लाटकर, ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. स्मिता गिरी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनंत हावळ यांना राजर्षी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.या संमेलनास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष राजीव आवळे आणि निमंत्रक अनिल म्हमाने यांनी केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED