ज्येष्ठ कवयित्री शशिकला गावतुरे यांच्या काव्यरचना मुलांच्या स्वयं प्रज्ञेचा विकास करणाऱ्या- बंडोपंत बोढेकर

🔹काव्यकुंज चे बालक मंडळींच्या हस्ते लोकार्पण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20मे):-झाडीबोली साहित्य मंडळ महिला शाखा मुल च्या अध्यक्षा सौ. शशिकला नामदेवराव गावतुरे यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण छोटेखानी स्वरूपात मुल येथे गावतुरे भवनात संपन्न झाले. बालकांसाठीच लिहिलेला हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह असून लहान बालकांच्या उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय सिध्दावार , समाजसेवक श्री. नामदेव गावतुरे, गणेश मांडवकर , कवयित्री सौ. शशिकला गावतुरे, कवी लक्ष्मण खोबरागडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

बाल काव्यकुंज काव्यसंग्रहात एकूण ५५ पद्य रचना असून या संग्रहास गडचिरोली येथील कवी प्रमोद बोरसरे यांची प्रस्तावना लाभली आहे.सौ. शशीकला गावतुरे यांच्या काव्यरचना लहान मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देणा-या आहे. प्रयोग, कृती आणि निरीक्षणं च्या अनुभवावर आधारित लेखन असलेल्या या रचना लहान मुलांच्या स्वयं प्रज्ञेचा विकास करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले .

कवयित्री सौ. शशिकला गावतुरे म्हणाल्या, या काव्यसंग्रहातील रचना लहान मुलांकरिता संवाद शैलीत लिहिलेल्या असल्या तरी त्या मोठ्यांनाही निश्चितपणे आवडतील असे त्या म्हणाल्या . पत्रकार विजय सिध्दावार म्हणाले, सौ. गावतुरे यांच्या अनेक कवितांमधून सामाजिक स्थितीचे दर्शन घडून येते.याप्रसंगी उपस्थित बालक कु. आयरा हर्षवर्धन गजभिये यांनी ‘ आला आला पाउस ‘ , कु. अनुष्का निमदेव नक्षिणे यांनी ‘उखाणे ओळखा’ , स्वरूप अतुल उईके यांनी ‘टांग टींग टींगा ‘ ‌तर सोहम नक्षिणे यांनी ‘ मागणी ‘ आदी कविता बाल मित्रांनी प्रभावीपणे काव्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत आणली . सूत्रसंचालन नामदेव पिज्दूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय लाडेकर यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED