जय भवानी कडून सहा लाख मे.टन ऊसाचे विक्रमी गाळप पूर्ण

30

🔸कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करणार – अमरसिंह पंडित

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.20मे):-प्रतिदिन २५०० मे.टन ऊस गाळप क्षमता असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याने सहा लाख मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण करून उच्चांकी ऊस गाळपाचा इतिहास रचला आहे, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस तोडणी मजुर, वाहतुक ठेकेदार यांसह सर्व हितचिंतकांच्या पाठबळामुळे कारखान्याच्या इतिहासातील हा सोनेरी दिवस उजाडला असल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कार्यक्षेत्रात केवळ १०,९८० मे.टन ऊस शिल्लक असून येत्या पाच दिवसांत कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्‍वास यानिमित्ताने चेअरमन पंडित यांनी व्यक्त केला. उच्चांकी गाळपाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जय भवानीची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे.टन ऊस गाळपाची असतानाही कारखान्याने क्षमतेपेक्षा अधिक गाळप करत १९३ दिवसांत सहा लाख मे.टन ऊस गाळप करून सुमारे ५,३६,००० क्विंटल साखर उत्पादीत केली. यावर्षी १०.४३ % सरासरी साखर उतारा मिळाला. जय भवानीच्या डिस्टीलरीमध्ये १७० दिवसांत ७५ लाख लिटर रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन झाले आहे. जय भवानीने यावर्षी शेतकर्‍यांना २१५० रुपये प्रतिटन भाव दिला असून कोणताही दुजाभाव न करता ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वेळेवर पैसे जमा केले आहेत. जय भवानीच्या इतिहासातील ही विक्रमी कामगिरी आहे, कमी दिवसात विक्रमी गाळप करून नवा इतिहास रचण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने होवू शकले याचा आनंद आहे असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. विक्रमी गाळपाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कारखाना साईटवर कर्मचारी व कामगारांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, जय भवानीच्या कार्यक्षेत्रात नोंद आणि बिगर नोंद असा एकुण १०,९८० मे.टन ऊस गाळपा अभावी शिल्लक असून पुढील चार दिवसांत या सर्व ऊसाचे गाळप होईल. कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपुर्ण गाळप झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार इतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाचे नियोजन आम्ही करत आहोत. अलिकडे राजकीय विरोधक मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत. फसवी आणि बिनबुडाची आकडेवारी सांगून शेतकर्‍यांची लुट करण्याचा प्रयत्नही विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी संयम राखावा, जय भवानीच्या कार्यक्षेत्रात यावर्षी कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, याचे नियोजन आम्ही करत आहोत असेही त्यांनी शेवटी सांगितले. यानिमित्ताने चेअरमन अमरसिंह पंडित यांनी जय भवानीचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कर्मचारी, ऊसतोडचणी मजुर, वाहतुक ठेकेदार आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.