गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.23मे):-ऊस तोडीची तारीख नोव्हेंबर महिन्यात होती. सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी साखर कारखाना ऊस गाळपासाठी नेत नसल्याने अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

ग्रामीण भागात सध्या गोड ऊसाच्या कडू कहाण्या सर्वत्र ऐकण्यास मिळत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकरी रविंद्र विक्रम ढगे यांना अडीच एककर शेतजमीन आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात नगदी पीक म्हणून संपूर्ण कुटुंबाने मोठया कष्टाने एक लाख रुपये उसनवारी वर घेऊन खर्च करून ऊसाची लागवड केली. ऊस जोमात वाढला, पहिल्या वर्षी नॅचरल शुगर या साखर कारखान्याने ऊस नोव्हेंबर २०२० मध्ये ऊस गाळपासाठी नेला.

उसाचे पीक हे सलग तीन वर्षासाठी असल्याने पुढील हंगामाची नोंद ही साखर कारखान्यांने घेतली. नियमाप्रमाणे नोव्हेंबर ते डिसेंबर २0२१ महिन्यात हा ऊस साखर कारखान्याने गाळपासाठी नेणे क्रमप्राप्त होते. रवींद्र ढगे यांनी कारखाना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. सात महिन्याचा कालावधी लोटला तरीही त्यांचा ऊस अजूनही शेतातच उभा आहे. शेतात उभा असलेला ऊस आता वाळूनही गेला, तरीही त्याला तोड येईना. संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह हा या उसाच्या शेतीवरच अवलंबून असल्याने व ऊस गाळपास न गेल्याने हतबल झालेले ढगे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. ऊस तोडणी साठी गयावया करूनही प्रशासनाश किव येत नसल्याने ढगे कुटुंब शनिवार पासून अंबाजोगाई-धानोरा रस्त्यावर तळपत्या उन्हात ठिय्या आंदोलनास बसले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, अद्याप पर्यंत तरी इकडे प्रशासनाचा कोणताही कर्मचारी फिरकला नाही.

*ऊस तोडीसाठी एककरी होते १५ ते २० हजारांची मागणी*

शेतात उभा असलेला ऊस तोडून नेण्यासाठी मुकदम अथवा ऊस तोड करणाऱ्या हरवेस्टर मशीनचा चालक शेतकऱ्यांकडे प्रती एककर १५ ते २० हजार रुपयांची मागणी करतो. याशिवाय ट्रॅक्टर चालकाचा रोजचा भत्ता पाचशे रुपये, पुन्हा कोयत्याची होणारी पूजा यासाठीची वेगळी दक्षिणा असा हा आतला व्यवहार एककरी २५ हजार रुपयांपर्यंत जातो. अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांची लूट सुरू असूनही ऊस लवकर जात नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED