“पढाई भी, सफाई भी” उपक्रम स्तुत्य, पण भौतिक सुविधांचे काय?

64

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.27मे):-जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने “पढाई भी, सफाई भी” हा उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांचा हा महत्वाचा उपक्रम आहे. या स्तुत्य उपक्रमाचे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चिमूर मार्फत स्वागत करण्यात आले. परंतु त्याच बरोबर शाळांचे भौतिक सुविधांचे काय? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा स्वच्छ आणि सुंदर असाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारेल. शाळेत शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण होईल. या उपक्रमाला ग्रामपंचायत, पंचायत समिती यांची शाळेला कशी मदत होईल. या करिता चिमूर पंचायत समिती येथे नुकतीच सभा पार पडली. या सभेत शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. यात अनेक शाळेत भौतिक सुविधांचा अपु-या निधीमुळे अभाव आहे. पिण्याचे पाणी, आवश्यक प्प्रमाणात शौचालय, हात धुण्याची सुविधा, शौचालयात पाण्याची सुविधा, वाचनालय या भौतिक सुविधांचा काही शाळेत अभाव आहे. तर आवश्यक निधी अभावी या सुविधा नादुरुस्त पडलेल्या आहे. अनेक शाळेत तर विजेचे बिल भरायला देखील रक्कम शिल्लक नाही. असे असतांना तालुका प्रथम क्रमांकावर राहण्याकरिता अधिका-याकडून मुख्याध्यापकांना दबाव आणल्या जात आहे.

दरम्यान शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करून द्याव्यात आणि त्या सुचारु रूपाने चालण्याकरिता शासनाने नियमित निधी पुरवावा अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती शाखा चिमूरचे अध्यक्ष गोविंद गोहणे, सरचिटणीस जनार्दन केदार, कार्याध्यक्ष सरोज चौधरी, गोवर्धन ढोक, राजू चांदेकर, वंदना हटवार, कल्पना महाकाळकर, मनीषा मोडक आदींनी केली आहे.