धक्कादायक! लग्न लावून मुलीला सासरी पाठवलं; दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास

26

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.28मे):-आपल्या लाडक्या मुलीचे थाटात लग्न लावले, पाणवलेल्या डोळ्यांनी तिला निरोप देत पाठवणी केली, मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (27 मे) दुपारच्या सुमारास बीड शहरातील अंबिका चौक परिसरात घडली आहे. सुवर्णा सुनील जाधव (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे.

सुवर्णा यांच्या मुलीचा लग्नसोहळा 26 मे रोजी मोठ्या थाटात पार पडला. सायंकाळी मुलीची सासरी पाठवणी केली. त्यानंतर शुक्रवारी (27 मे) मयत सुवर्णा यांनी घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सुवर्णा यांनी नेमकी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान मयत जाधव कुटुंबातील कोणीही पोलीस ठाण्यात न गेल्यानं, अद्यापही आत्महत्याची नोंद ठाण्यात झाली नसून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.