इलेक्ट्रिक ‘शिवाई’ लालपरी नव्या रुपात- आज लोकार्पण सोहळ्यानंतर धावणार

46

राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रुपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणा-या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे आज होणा-या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

१ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, अशा शब्दात आनंद व्यक्त करण्यात आला.

१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्यापार्श्वभूमिवर आज पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावेल. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. १ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकार्पण केल्यानंतर ‘शिवाई’च्या पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर दिवसाला ६ फे-या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे सांगतानाच आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

या बसची लांबी १२ मीटर आहे. टू बाय टू आसन व्यवस्था असून यात एकूण ४३ आसने आहेत. ही बस ध्वनी व प्रदुषणविरहीत आहे. तसेच ही गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार असून ती वातानुकूलीत आहे व हिची बॅटरी क्षमता ३२२ के.व्ही एवढी आहे.

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-७०५७१८५४७९