प्रचारक चंपत पा. कावडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिंचोली येथे ग्रामगीता वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1जून):- चिंचोली खुर्द (ता. राजुरा) येथील दिवंगत ज्येष्ठ प्रचारक चंपत पाटील कावडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तेरवी न करता ग्रामगीतेचे वितरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे राजुरा तालुका प्रचारक चिंचोली येथील ज्येष्ठ समाजसेवी चंपत सिताराम कावडकर यांचे गेल्या १४ मे रोजी निधन झाले.

त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सेवा मंडळाचे प्रचार विभागाचे केंद्रीय सदस्य ऍड. राजेंद्र जेनेकर , जिल्हा प्रचार प्रमुख लटारू मत्ते गुरुजी , सुभाष पावडे, देवराव कोंडेकर ,संत गाडगेबाबा धोबी वरठी समाज मंडळाचे राजकुमार चिंचोलकर , कवी खेमदेव कन्नमवार, विमलबाई कावडकर, रामदास कावडकर ,हरिदास कावडकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती . अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

चिंचोली येथील प्रसिद्ध विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात राजेंद्र जेनेकर यांनी दिवंगत चंपत पाटलांच्या सेवाकार्याचा धावता आढावा घेऊन असा तळमळीने काम करणारा प्रचारक पुन्हा होणे नाही,असे प्रतिपादन केले. युवा प्रचारक देवराव कोंडेकर ,खेमदेव कन्नमवार आणि राजकुमार चिंचोलकर यांनीही कावडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी कावडकर परिवाराशी निगडीत व्यक्तींना मंडळातर्फे ग्रामगीता ग्रंथाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास कावडकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळ पासून झाली.‌ कावडकर कुटुंबाच्या वतीने आणि ग्रामवासी यांच्या सहकार्याने चिंचोली येथे गावात ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर तालुका प्रचारक नानाजी देवाळकर आणि रामदास चौधरी यांनी ग्रामगीतेचे वाचन केले .

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED