परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका पुरविण्याची जबाबदारी महाविद्यालयांची का?

26

🔹नागपूर विद्यापीठाने गळ्यात ओवली माळ आणि केला गजब कारभार ?

✒️नागपूर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.2जून):-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरविण्याची जबाबदारी विद्यापीठाने कॉलेजांच्याच गळ्यात टाकली आहे. कॉलेजांनी वैयक्तिकरीत्या किंवा समूह तयार करून हे प्रश्नसंच तयार करावेत, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. येत्या ८ जूनपासून सुरू होणाऱ्या या परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याकरिता कॉलेजांकडे आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.उन्हाळी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रश्नसंच पुरविण्याची मागणी केली होती. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सूचना दिल्यानंतर विद्यापीठाने प्रश्नसंच पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नसंच पुर‌विणे तसेच परीक्षेशी संबंधित इतर बाबींसंदर्भात विद्यापीठाने परीक्षेची कार्यप्रणाली कशी असेल, याबाबत सूचना जाहीर केल्या आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ जूनपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम वर्ष व अंतिम वर्ष वगळून इतर सर्व वर्षांच्या सम सत्रातील परीक्षा २२ जूनपासून होतील. परीक्षा तीन पाळ्यांमध्ये घेण्यात येई‌ल. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचा पेपर सकाळी ८.३० ते ११ वाजता दरम्यान होईल, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा आणि आंतरविद्या शाखा दुपारी १२.३० ते २ वाजता आणि मानव्यविद्या शाखेचा पेपर दुपारी ३.३० ते ५ वाजतादरम्यान होईल. बहुपर्यायी प्रश्नपद्धती असल्याने पुनर्मूल्यांकनाची सुविधा देण्यात आलेली नाही. या परीक्षेत कॉलेजांना विद्यापीठाने पुरविलेली प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थी संख्येनुसार त्यांच्या प्रती काढाव्या लागतील. परीक्षा संपल्यावर संबंधित विषय शिक्षकांकडून पाच दिवसांच्या आत प्रश्नपत्रिकेची तपासणी करावी लागेल. विद्यार्थ्यांचे गुण ‘स्कीम ऑफ एग्झामिनेशन’ नुसार रूपांतरित करुन कॉलेज लॉगिनमध्ये अपलोड करावे लागणार आहेत.

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२च्या परीक्षा घेण्यासाठी कॉलेजांना प्रतिविद्यार्थी प्रतिविषय २५ रुपये विद्यापीठाकडून दिले जाणार आहेत. व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला. या खर्चामध्ये १० रुपये प्रश्नपत्रिकेची प्रत काढण्याकरिता, पाच रुपये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांचे मूल्यांकन करण्याकरिता आणि केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि इतर खर्च यासाठी १० रुपये यांचा समावेश आहे. हा खर्च कॉलेजला देण्यात येणाऱ्या परीक्षेसंबंधीच्या अग्रीमातून करावयाचा आहे. ही अग्रीम रक्कम मिळण्याकरिता कॉलेजने विद्यापीठाकडे अर्ज करावयाचा आहे. ज्या कॉलेजांनी उन्हाळी २०२० पर्यंतचा हिशेब दिलेला आहे, अशाच कॉलेजांना ही रक्कम देण्यात येईल. ज्यांनी असा हिशेब दिलेला नाही, त्यांनी तातडीने तो वित्त व लेखा विभागाला सादर करावा आणि परीक्षा विभागाला अग्रीम रकमेबाबत अर्ज द्यावा. त्यासाठी मुदत देण्यात येत असल्याचे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कळविले आहे.

परिक्षा संबंधित विद्यार्थ्यांसाठी सूचना सुचना दिल्या आहेत त्यात विद्यार्थ्यांना दीड तासात ५०पैकी ४० प्रश्न सोडवावे लागतील. ४०पेक्षा अधिक प्रश्न सोडविल्यास कोणतेही ४० बरोबर प्रश्न तपासले जातील.

-प्रश्नपत्रिकेतच योग्य पर्यायासमोर बरोबरची खूण करावी लागेल.
-प्रश्नपत्रिकेत रोल नंबर, नामांकन क्रमांक, परीक्षेचा दिनांक व वेळ या बाबी नमूद कराव्यात.
-बहिशा:ल विद्यार्थी म्हणून ज्या कॉलेजमधून अर्ज केला असेल, त्याच कॉलेजात परीक्षा द्यावी.
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा हव्यात.उन्हाळी सत्रासाठी पावणेदोन लाख अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.