“जिवंतपणी आणि मेल्यावरही कृषी वीज जोडणीच दिली नाही अन म्हणे ३७००० हजार बिल भरा, जळगाव जामोद महावितरणकडून शेतकऱ्याची उघड फसवणूक”

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

निमगाव(दि.2जून);-अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यास महावितरणने दहा वर्षापासून कृषी वीज जोडणी दिलीच नाही आणि याबाबत शेतकऱ्याने विचारणा केली असता ३६,९७०/-रु चे वीज बिल शेतकऱ्याच्या हाती दिल्याने, महावितरण जळगाव जामोद कार्यालयाने शेतकऱ्याची आणि कृषी अनुदान लाटण्यासाठी महाराष्ट्र शासनाचीही फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत सविस्तर असे कि, स्व. प्रल्हाद विष्णाजी करांगळे राहणार जामोद यांनी त्यांचे मौजा मालठाणा बु येथील गट क्रमांक ६८ नुसार शेत जमिनीत, ५ एच पी भाराच्या कृषी वीज जोडणीसाठी ग्राहक क्र. २९३३०७७७७७८६ नुसार अनामत रक्कम रुपये आठ हजार आठशे पावती क्रमांक ६६७४२११ दिनांक ०५/०४/२०२२ महावितरण जळगाव जामोद कार्यालय जिल्हा बुलढाणा येथे भरणा केले होते.

त्यानंतर प्रल्हाद विष्णाजी करांगळे मयत झाल्यामुळे त्यांचा मुलगा गजानन प्रल्हाद करांगळे याने संबंधित कार्यालयाकडे अनेकदा चौकशी केली असता केवळ पुढील वर्षी जोडणी मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र एकदा आपल्या वीज जोडणीबाबत नेमके काय जाणून घ्यायचेच या उद्देशाने गजानन करांगळे यांनी जानेवारी २०२२ या महिन्यात जळगाव जामोद महावितरण कार्यालयात ठिय्या ठोकला होता. त्यावेळी सदर कार्यालयाने वीज जोडणी न देताच ती दुसऱ्याच ग्राहक क्रमांकाने म्हणजे ग्रा. क्र. २९०६८ ०० ०१३३१ नुसार व मीटर क्र. ०५३१ ५४ ०६८८३ दि. १८ मार्च २०१६ रोजी वीज जोडणी केल्याचे नमूद करून फेब्रुवारी २०२२ पर्यत रुपये छत्तीस हजार नऊशे सत्तरचे वीज बिल त्यांचे हातात दिले. जे पाहून करांगळे यांना जबर धक्का बसला. त्यानंतर दि. ७/३/२०२२ रोजी करांगळे यांनी महावितरणच्या जामोद येथील कार्यालयास लेखी अर्जाद्वारे कृषी वीज जोडणी न देता वीज बिल कसे हि विचारणा केली मात्र संबंधितांनी काहीही न कळविल्यामुळे गजानन करांगळे यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेस याप्रकरणी मदतीचे आवाहन केले.

त्यानुसार संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे यांचे माध्यमातून महावितरण च्या अकोला परिमंडळ स्तरीय माननीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे करांगळे यांनी दि. १/६/२०२२ रोजी नोंदणी क्र. १८१५ नुसार तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीत करांगळे यांनी, महावितरणने त्यांचे नावाचा वापर करून शासनाकडून कृषी वीज बिल अनुदान लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच वीज जोडणी न देता दिलेले खोटे वीज बिल रद्द करावे आणि वीज अधिनियमाच्या कलम ४३ उपकलम ३ नुसार संबंधितांवर दि.५/४/२०१३ पासून प्रतिदिन रु. १०००/- याप्रमाणे दंड करून, ती रक्कम मा. सर्वोच्च न्यायालयाच्या लखनौ डेव्हलपमेंट अथोरीटी विरुद्ध एम के गुप्ता या सिव्हील अपील केस मधील न्यायनिर्णयानुसार शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

तसेच महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयास यासंबंधी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.एकीकडे महावितरण शेती वीज बिल वसुली बाबत आकांततांडव करीत आहे, मात्र वीज जोडणी न देताच हजारो रुपयांचे देऊन लाखो रुपयांचे अनुदानही सर्रास लाटल्या जात असल्यामुळे अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने आणि महावितरण उच्च प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष मा प्रतापराव होगाडे साहेब यांचे मार्गदर्शनात शेतकरी हितार्थ हा लढा सुरूच राहणार असल्याचे प्रमोद खंडागळे बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांनी ई मेल प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.