सुरजागडच्या ओव्हरलोड ‘लोह दगड’ वाहनाबद्दल आमदार महोदयांची चुप्पी का…?

🔸बदनामी पासून वाचण्याचा लोकप्रतिनिधींचा केविलवाणा प्रयत्न

✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)मो:-9623459632

गडचिरोली(दि.3जून):- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात परप्रांतीय मजुरांना प्राधान्य देत असल्याची ओरड होत असताना स्थानिक आमदाराने स्थानिकांना या लोहप्रकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाल्याचा कांगावा कितपत खरा आहे असा सवाल निर्माण झाला आहे. स्थानिक लोकांच्या हिताला प्राधान्य देण्याऐवजी लोहखनिजांचे उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या हितासाठी आपली भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीची बांधिलकी कुणाप्रती आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.या लोहखनिजाची वाहतूक करणारे ओव्हरलोड ट्रक भरधाव वेगाने धावत असतात. यामुळे आलापल्ली ते आष्टी मार्गाची चाळण होण्यास सुरुवात झाली यश असून अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु सर्वसामान्यांच्या या समस्येवर आमदार महोदय एक ब्र सुद्धा काढत नाही याला काय म्हणायचे?

सिरोंचा महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 60 जणांना आपला जीव गमवावा लागला. जर या लोकप्रतिनिधीला इतकी तळमळ असती तर शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न करून या महामार्गाची समस्या निकाली काढली असती. परंतु नागरिकांच्या जीवाशी देणंघेणं असलेल्या प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी फारसे गंभीर नसल्याचे यातून दिसून येते.चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळ कोनसरी येथे लोह प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे आणि हा लोह प्रकल्प मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होणार असून या प्रकल्पाचा जिल्ह्यातील दहा ते बारा हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितली आहे. तसेच सध्या लोह प्रकल्पात रस्ता सुरक्षेकरीताच्या 500 लोकांसह 6500 पेक्षा अधिक बेरोजगारांना काम मिळाले असल्याचे म्हटले आहे.

परंतु सुरजागड खदानीच्या कंपनी चे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना विचारले असता त्यांनी आलापल्ली ते सुरजागड पर्यंत असलेल्या रस्त्याची सुरक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मी कंपनीकडून लावण्यात आलेले नाही, सुरजागड खदानीच्याच परिसरात कामात जवळपास फक्त 2 हजार कामगार लावण्यात आलेले असून,आहे आलापल्ली ते सुरजागड हा रस्ता शासनाने कंपनीला दिलेला नसल्याने, रस्ता सुरक्षेसाठी चारशे,पाचशे लोकं लावण्यात आले असल्याची माहिती पूर्णपणे खोटी असल्याची माहिती दिलेली आहे.

यावरून स्थानिक आमदारांनी मुद्दाम पणे रस्त्याच्या सुरक्षेसाठी 400 ते 500 लोकांसह, साडे सहा हजार लोकांना कंपनीत कामाला लावण्यात आल्याची खोटी माहिती देऊन स्थानिक जनतेसोबत शुध्द फसवणूक करीत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे सुरजागड लोह प्रकल्पातील रोजगाराच्या ‘जांगडबुत्त्या’ पासून जिल्ह्यातील बेरोजगार आणि स्थानिक आदिवासींनी सतर्क होण्याची वेळ आली आहे.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED