विधान परिषदेवर वर्णीसाठी बीड जिल्ह्यातील नेत्यांचे जोरदार लॉबींग

26

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.5जून):-विधानसभेतून राज्यसभेवर निवडुण द्यायच्या जागांवर उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर आता जिल्ह्यातील नेत्यांनी आपला मोर्चा विधान परिषदेकडे वळविला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी उमेदवारांची नावे याच आठवड्यात निश्चित होणार असल्याने आता जिल्ह्यातील नेत्यांनी जोरदार लॉबींग सुरु केले आहे. भाजपकडून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तसेच महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचेही नाव समोर येत आहे.

विशेष म्हणजे मागच्या दिड वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांबाबतही राज्य पातळीवर तडजोडीच्या माध्यमातून तोडगा निघत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीजणांच्या अपेक्षा आणखीच दुणावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून पराभव झाल्यानंतर राज्य पातळीवर त्यांना वारंवार डावलण्यात आले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मास लिडर असलेल्या पंकजा मुंडे ओबीसी चेहरा मानल्या जातात.
त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलून दाखविले. आगामी निवडणुका आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न या पार्श्वभूमीवर त्यांनीही दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्ताने ओबीसी आरक्षणाबाबत यश मिळविलेल्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनाच बोलवून सुवर्णमध्य साधला आहे. राज्य भाजपला त्यांचे वावडे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्यांचा ओबीसी चेहरा यामुळे त्यांचे पारडे अधिक जड झाल्याचे मानले जाते.

महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे मागच्या वेळी भाजपच्या कोट्यातूनच परिषदेवर होते. त्यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे घटक पक्ष म्हणून त्यांना संधी दिली जाईल असे मानले जाते. मराठा चेहरा असलेल्या विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कायम देवेंद्र फडणवीसांची बाजू जोरकसपणे लाऊन धरलेली आहे. भाजपकडून इतर घटक पक्ष दुरावत आहेत तर काहींना भाजप नेतृत्वच दुर सारत असताना देवेंद्र फडणवीस यांना खंबीर साथ ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.

आता त्यांच्याकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला विधान परिषदेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचीही धुळपेरणी करायची आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला काहीतरी येईल, असे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत असून त्यांचे जोराचे प्रयत्नही सुरु आहेत. श्रेष्ठींनी त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषद असा शब्द दिलेला आहे

आता विधान सभेतून विधान परिषदेवर निवडुण द्यायच्या १० जागांत राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांचेही अद्याप पूनर्वसन झालेले नाही. वास्तविक पक्षाने राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीत खडसेंचे नाव दिलेले आहे. मात्र, याला अद्याप मूर्तरुप नसल्याने दुसरे नाव खडसे यांचे येऊ शकते. किंवा नियुक्त जागांत खडसेंचे निश्चित झाले तर आदीती नलावडे यांच्यासह अमरसिंह पंडित यांचे नाव दुसऱ्या क्रमांकासाठी मानले जाते.

या गोळाबेरजेत जमलेच नाही तर खडसेंच्या नियुक्त जागांवरील यादीत पक्ष अमरसिंह पंडित यांना संधी देईल असे मानले जाते. विधान परिषदेत भाजपचे आक्रमक चेहरे येणार असल्याने त्यांचा मुकबला करण्यासाठी अभ्यासू व आक्रमक चेहरा म्हणून अशी त्यांची जमेची बाजू आहे. तसेच मधल्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीत पालकमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध इतर असे चित्र झाले होते. त्यामुळे आता मुंडेंनीही आपले वजन पंडितांच्या पारड्यात टाकल्याचे बोलले जाते.

दरम्यान, मध्यंतरी येडेश्वरी कारखान्यावरील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजरंग सोनवणे यांना ‘चांगली संधी’ मिळेल, असे सुतोवाच केले होते. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांच्या यादीसाठी आता सोनवणेंनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी पक्षाकडून लढविलेली लोकसभा निवडणुक, त्यांचा कारखाना आणि भविष्यात केज मतदार संघात पक्षाला बळ यासाठी त्यांना परिषदेवर घ्यावे, असा कार्यकर्त्यांचा सुर आहे.