प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा चादर देऊन सन्मान

26

🔸हदगाव तालुका कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-9373868284

हदगांव(नांदेड)(दि.5जून):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने नाश्ता व चादर भेट देऊन दिव्यांग बांधवांचा नुकताच सन्मान करण्यात आला.हदगाव तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत परंतु दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना समोर येत असून अजूनही दिव्यांगाचे प्रश्न सुटले नसल्याने अनेक दिव्यांगाना हदगाव येथील शासकीय रेस्ट हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उज्वला सुनील आमगे, संदीप तुकाराम कपाटे, अमोल चंपत पोटे, भगवान गायकवाड, मारुती सुदाम पोटे, गिरी गोविंद तालनकर, शिवाजी पोटे, संकेत पोटे आदी दिव्यांग व्यक्तींना चहा, नाश्ता व भेट वस्तु देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील देवसरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत व दिव्यांग व्यक्तीचे मनोबल खचून जाऊ नये म्हणून हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक दिव्यांगाच्या सेवेसाठी भेट वस्तूंच्या स्वरूपात दिव्यांगाना चादरी भेट दिल्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक दिव्यागांना बोलण्याची संधी दिली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधुन त्यांचे प्रश्न मांडले असता दोन दिवसात माळझरा ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच त्यांचे रखडलेले पैसे देऊ असे आश्वासन दिले असल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भागवत पाटील देवसरकर, प्रदेश अध्यक्ष विखे-पाटील कृषि परीषद महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ नांदेड़ जिल्हा सचिव व लोकमत तालुका प्रतिनिधी संदीप तुपकरी, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगाव तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत भोरे, हदगाव तालुका कोषाध्यक्ष संजय तोषनिवाल,सामाजिक कार्यकर्ते सखाराम खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक लाभार्थी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.