बीड हादरले! विवस्त्र करून महिलेचा गळा आवळला; चोराने बांधून ठेवल्याचा दावा करणारा पती ताब्यात

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.5जून):-तालुक्यातील रंजेगाव येथे एका विवाहित महिलेला विवस्त्र करून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली आहे. दरम्यान, चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेने बीड तालुक्यात खळबळ उडालीये.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती दिनेश आबुज(२९) असे मयत महिलेचे नाव आहे. ज्योतीचे माहेर (सिंदफणा चिंचोली ता. गेवराई) असून १२ वर्षांपूर्वी तिचा विवाह दिनेश उर्फ विश्वांभर पांडुरंग आबुज (३५, रा. रंजेगाव) याच्याशी झाला होता. दिनेश शेती करतो तर ज्योती घरकाम करते. दिनेशचे आई- वडील चार धाम यात्रेसाठी गेले होते. घरी ज्योती, दिनेश व त्यांची दोन मुले होती.

५ जून रोजी पहाटे दोरीने गळा आवळून ज्योतीचा खून करण्यात आला. पहाटे पतीने चार ते पाच चोरांनी घरात घुसून मारहाण करत पत्नीला विवस्त्र केले तर आपल्याला बाहेर दरवाजाजवळ बांधून टाकून नंतर पत्नीला संपविले, असा खुलासा केला. दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. खुनाचे गूढ कायम असून तपास यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. महिलेचा गळा आवळून खून झाला हे स्पष्ट आहे. संशयित पतीची चौकशी केली जात आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.

पतीने बनाव केल्याचा आरोप
_____________

मयत ज्योतीचा भाऊ केदार पांडुरंग करांडे याने पती दिनेशवर आरोप केला आहे. तो तिला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असे.तिला संपवून घरात चोर शिरले होते व त्यांनी तिला मारून मला बांधून टाकले असा बनाव केला असल्याचा आरोप त्याने केला. ज्योतीच्या गळ्यातील दागिने सुरक्षित आहेत, घरातील सर्व ऐवज जशास तसा आहे.त्यामुळे चोर हे कृत्य कसे करू शकतात यावर विश्वास नाही, असे त्याने सांगितले.

Breaking News, क्राईम खबर , बीड, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED