युवकमित्र परीवार संस्थेच्या ‘लेखन वाचन अभियानातंर्गत’ शहादा तालुक्यात ५००० सचित्र बालमित्र पुस्तकाचे वितरण

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शहादा(दि.10जून):- प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लेखन वाचन उपक्रम राबविण्याची गरज असून शाळा शंभर टक्के साक्षर करण्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी केले.शहादा येथे युवकमित्र परीवार संस्थेमार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत ५००० सचित्र बालमित्र पुस्तक वितरण उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात श्री.चौधरी बोलत होते.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचता यावी,गणिती आकडेमोड करता यावी यासाठी युवकमित्र परीवार संस्थतर्फ शहादा तालुक्यात ‘लेखन वाचन अभियान’राबविले जात आहे.याअंतर्गत तालुक्यातील १९३ जि.प.शाळांना मोफत पाच हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मा.आर.बी.घोरपडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.भानुदास रोकडे,गटशिक्षणाधिकारी मा. डी. टी. वळवी,हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष मा. हिरालाल माळी, ज्येष्ठ कवी मा.अजबसिंग गिरासे,साहित्यिक मा. करणसिंग तडवी,युवकमित्र संस्थेचे संस्थापक मा.प्रवीण महाजन,उपक्रम प्रमुख मा.रवींद्र बडगुजर,पत्रकार मा.कल्पेश राजपूत,मा.सुशील गव्हाणे हे यांच्यासह तालुक्यातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक मिळाल्याने अक्षर व अंकओळख होण्यास मदत होणार असून शंभर टक्के शाळा व विद्यार्थी साक्षर होणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.प्रास्ताविक रवींद्र बडगुजर यांनी केले तर आभार करणसिंग तडवी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित साळुंके,सुजाल पाटील,यश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

-पुस्तक खरेदीसाठी इंडीनेशिया येथील दात्याचे दातृत्व-
युवकमित्र च्या लेखन वाचन उपक्रमासाठी पुस्तक खरेदी करण्याकरिता मूळ चोपडा जि. जळगाव येथील रहिवासी मात्र नोकरीनिमित्त इंडोनेशिया येथील श्री.संतोष नथ्थु पाटील यांनी देणगी देऊन मीसुद्धा भारत देशाचे काहीतरी देणे लागतो हे सिद्ध केले.घोडलेपाडा शाळेचे शिक्षक रवींद्र बडगुजर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी संपूर्ण पाच हजार पुस्तके खरेदीसाठी निधी देणगी म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला.