कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!

29

🔹दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.१४जून):- आज कामगार चळवळीकडे धंदेवाईक द्रुष्टीने आणि आर्थिक स्रोत म्हणून पाहाणा-या लोकांना आता दूर ठेवले पाहिजे. नाहीतर हरिभाऊ नाईक यांच्या सारख्या ध्येयवादी कामगार नेत्यांचे विचार फक्त कागदावरच राहातील, असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी येथे दिवंगत कामगारनेते हरिभाऊ नाईक यांना श्रद्धांजली वाहताना काढले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी अध्यक्ष,महाराष्ट्र इंटकचे माजी सरचिटणीस,माजी राज्यमंत्री ज्येष्ठ कामगार नेते हरीभाऊ नाईक यांचे नुकतेच नागपूर येथे वार्धक्यात(९४) निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकच्या संयुक्तविद्यमाऩे मजदुर मंझील मध्ये मनोहर फाळके सभागृहात आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती.त्या वेळी सचिनभाऊ अहिर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हरिभाऊ नाईक यांच्या निधनाने कामगार चळवळीत कायम वैचारिक पोकळी जाणवत राहील, असेही सचिनभाऊ अहिर श्रद्धांजली वाहताना आपल्या भाषणात म्हणाले.

सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, हरिभाऊ नाईक यांनी किती जरी संकटे आली तरी गांधी विचार कधीही सोडला नाही. संपानंतर नेतृत्वपदी आलेल्या हरिभाऊ नाईक यांनी सरचिटणीस मनोहर फाळके यांच्या सहकार्याने गिरणी कामगारांमधील असंतोष दूर केला, हे‌ कार्य कदापि विसरता येणार नाही.

या प्रसंगी अनिल गणाचार्य,सुनिल बोरकर, दत्तात्रय गुट्टे, श्यामराव कुलकर्णी,दिवाकर दळवी,कैलास कदम,रेल्वे युनियनचे प्रवीण वाजपेयी यांनी सांगितले, हरिभाऊ नाईक कामगार चळवळीत स्वतःला वाहून घेत जगले म्हणूनच ते कायम लोकांच्या स्मरणात रहिले.

कार्यक्रमाला संजय हरिभाऊ नाईक (पुत्र),रत्नाकर चेडगे(जावई) खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कोल्हापूर, पुणे, नागपूर, नवी मुंबई, परळी-वैजनाथ आदी ठिकाणच्या इंटक नेत्यांनी कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली.या प्रसंगी प्रारंभी हरिभाऊ नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहाण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. निवृत्ती देसाई,आण्णा शिर्सेकर,राजन भाई लाड,संजय कदम, शिवाजी काळे, जी.बी.गावडे, मुकेश तिगोटे आदीं पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.