राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान – २०२२ पुरस्काराने श्री. देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार सन्मानित..

26
  • ✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

🔸आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुंबईत स्विकारला सन्मान!

मंगळवार(दि.१४जून):-जागतिक रक्तदाता दिनाच्या औचित्याने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने राज्यभरातील रक्तदान शिबीर संयोजक, शतकवीर रक्तदाते आणि रक्तदान केंद्रांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

यावेळी श्री. देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार, चंद्रपूर यांना राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान – २०२२ ने गौरविण्यात आले.

     राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

गेल्या सतरा वर्षांपासून घुग्घुस येथील श्री. देवराव दादा भोंगळे मित्रपरिवारातर्फे २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात दरवर्षी भव्य महारक्तदान शिबिराचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते.

मागच्या वर्षी कोरोणाचे संकट आणि त्यामुळे उद्भवलेली रक्ताची चणचण ओळखून मित्रपरिवाराने जिल्हाभर भव्य रक्‍तदान शिबीरे आयोजित केली. लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शक कार्यपद्धतीला साजेश्या अनेक उपक्रमांसह जिल्ह्यामध्ये घुग्घुस, कोरपना, राजुरा, बल्लारपूर, जुनगाव, भद्रावती, चंदनखेडा व वरोरा येथे महारक्तदान शिबीरे घेण्यात आली. याठिकाणी पार पडलेल्या शिबिरांमध्ये तब्बल १७५३ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले होते.

एवढ्या मोठ्या संख्येत एकाच दिवशी रक्तदान करून रक्तदात्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठीचं नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक रक्तदानाचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला. एकट्या घुग्घुस शहरात सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत १०१९ रक्तदात्यांचे रक्तदान पार पडले. 

या सर्वांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने “राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान – २०२२” या पुरस्काराने श्री. देवरावदादा भोंगळे मित्रपरिवारला सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, माझ्या वाढदिवसाच्या औचित्याने दरवर्षी मित्रपरिवार रक्तदान शिबीराचे आयोजन करत असतो. रक्तदानासारख्या पुण्यकर्मामुळे अप्रत्यक्षपणे कुणाच्या तरी मदतीला आपल्याला धावून जाता येतं. याचे समाधान निश्चितच सुखावणारे आहे. 

मागील वर्षी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्यानेचं जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच मित्रपरिवाराने ठिकठिकाणी महारक्तदान शिबिरं आणि इतरही जनसेवेचे कार्यक्रम घेऊन वाढदिवस सेवामय केला. यातील रक्तदान शिबीरांत प्रथमच १७५३ एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान पार पडले. त्यासाठी हितचिंतकांनी माझ्यावरील प्रेमापोटी मेहनत घेतली. याच सेवेची पावती म्हणजे हा आजचा पुरस्कार आहे. त्यामुळे आजचा हा पुरस्कार मी त्या सर्व रक्तदात्यांना, कष्ट घेणार्‍या मित्रपरिवाराला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो. सर्वांचे अभिनंदन करतो. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांनी केले.