खापरखेडातील जादुई एटीएम मशीन – खुल जा सिम सिमचा प्रकार

एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात अँटोमँटिक ट्रेनी मशीन असं म्हटल्या जाते. त्याला अशा प्रकारे ट्रेन केल्या जाते म्हणजे त्याची सिस्टम बनवल्या जाते की, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे असते, तेवढ्याचा आकडा टाकल्यानंतर तो तुम्हाला तेवढेच पैसे देत असतो. पण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपूरातून समोर आला आहे. तिथे एटीएम मधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम मधून ५०० रुपये विड्रॉल केल्यावर २५०० रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.

काय आहे नेमकं प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएम मधून ५०० रुपये विड्राल टाकल्यावर एटीएम मशीन मधून चक्क २ हजार ५०० रुपये विड्राल होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. खापरखेडा येथील शिवा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही किमया घडल्याचं उघड झालं आहे.

शिवा कॉम्प्लेक्समधील या एटीएममध्ये एक व्यक्ती गेला आणि त्याने ५०० रुपये विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम मशीन मधून चक्क पाचशे रुपयांच्या पाच नोटा म्हणजेच २५०० रुपये आले. हे पाहून त्या व्यक्तीला सुद्धा आश्चर्य वाटले. त्याने पुन्हा तसे करून पाहिले आणि हा संपूर्ण प्रकार मग मोबाइलमध्ये शूट केला. त्यावेळी सुद्दा २५०० रुपयेच विड्रॉल झाले. या अनोख्या प्रकारामुळे अनेक तरुणांनी अशाच पद्धतीने ५०० रुपयांचे विड्राल टाकून एटीएम मशीन मधून २५०० रुपये मिळविले. एवढेच नाही कुणी १०००० रुपये, तर कुणी ५०००० रुपयांपर्यंत उचल केली.

पाहता पाहता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि मग काय..? नागरिकांनी या एटीएम सेंटरवर एकच गर्दी केली. खापरखेडा येथील काही लोकांनी ॲक्सिस बँकेच्या एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे इतर मशीन मधून पैसे काढून निघून गेले. सिल्लेवाडा येथील एक तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात असताना कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला ५०० रुपये मागून १ हजार रुपये देतो असे सांगितले. त्या तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएम मधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.

जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस ॲक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर पोहोचले आणि त्यांनी शटर डाऊन करत एटीएम सेंटर बंद केले. एटीएम बँकेच्या अधिका-यांनी एटीएम मशीन तपासली असता तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं. मात्र, या तांत्रिक चुकीमुळे आतापर्यंत किती जणांनी अधिक पैशाची उचल केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

किती नागरिकांनी काढले पैसे? दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. मध्यरात्रीनंतर ही माहिती परिसरात पसरल्याने तीन वाजेपर्यंत नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी या एटीएम सेंटरकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर मोबाईलवर बॅंकेतून कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही. पैसे काढणा-या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली.

✒️शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)भ्रमणध्वनी:-७०५७१८५४७९

महाराष्ट्र, लेख

©️ALL RIGHT RESERVED