तुकारामगाथा व क्रान्तिगाथा बुडविणाऱ्यांच्या वारसदारांकडूनच लोकार्पण

परवा म्हणजेच दि. १४ जून २०२२ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात दोन इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. एक म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्यानंतर ज्या शिळेवर त्यांनी १३ दिवस उपोषण केले होते त्या ‘शिळा मंदिराचे’ लोकार्पण तर दुसरे राजभवन येथे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांची गाथा सांगणाऱ्या ‘क्रान्तिगाथा’ या भूमिगत दालनाचे लोकार्पण.

तुकोबांचा दंभावर(ढोंगावर) आणि भक्तिहीन पांडित्यावर विशेष राग होता. वेदपठणाचा अधिकार नसलेले शूद्र तुकोबा वेदांचा खरा अर्थ आम्हालाच समजतो असा दावा करत म्हणतात, ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भर माथा’ फक्त एका विशिष्ट जातीत जन्म घेतला नाही म्हणून त्यांना कीर्तनाचा आणि कवित्वाचा अधिकार नसल्याचे आव्हान दिले गेले. शुद्राने गुरु बनावे, मार्गदर्शन करावे, लोककल्याणाची चिंता करावी म्हणून त्यांचा अतोनात छळ करून त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्या गेल्या. तुकोबांना आयुष्यभर छळणारे, त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडविणारे मंबाजी, सालो -मालो आणि रामेश्वर भट्ट. ज्यांनी ह्या गाथा बुडविल्या व ज्यांच्यामुळे तुकोबारायांनी १३ दिवस उपाशी-तापाशी राहून आपला क्लेश व्यक्त केला, कडक उपोषण केले. १३ दिवस यातना सहन केल्या. ते उपोषण ज्या शिळेवर(दगडावर) बसून केले त्याच शिळेचे मंदिर निर्माण करून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या हस्ते करण्यात आले. तुकोबारायांनीं १३ दिवस उपोषण केले त्याबद्दल पंतप्रधान भाषणात म्हणतात त्यांनी १३ दिवस तपश्चर्या केली.

कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहून तुकोबांबद्दल बोलण्यापेक्षा मोदीमहिमाच गात राहिले. मा. पंतप्रधान, विरोधीपक्षनेते, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, तुषार भोसले सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले लोक. म्हणजेच मंबाजीच्या विचारधारेचे लोक. मंबाजींचेच वैचारिक वारसदार. म्हणजेच तुकोबांना छळणाऱ्या, तुकाराम गाथा बुडविणाऱ्यांच्याच हातून संत तुकारामांच्या मंदिराचे लोकार्पण होत असतांना तुकोबारायांच्या जीवाला काय यातना झाल्या असतील?
कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत विरोधी पक्षनेते उपस्थित असणे एकदा समजून घेता येईल. परंतु एकाच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष त्याच पक्षाचा वारकरी सेलचा प्रमुख देखील मंचावर उपस्थित राहतो याला काय म्हणावे? तो मंच धार्मिक न राहता पूर्णपणे एकाच पक्षाचा राजकीय मंच झाला होता. त्यात पंतप्रधानांचे भाषण म्हणजे सुद्धा राजकीय अजेंड्यांनी भरलेले. त्यात सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता म्हणणाऱ्या तुकोबांचा वेष परिधान करून, तुकोबांच्याच देहू गावात खोटेपणाचा कहर करत पंतप्रधान म्हणतात की, “सावरकर हे शिक्षा भोगत असतांना हाथकड्यांच्या चिपड्या बनवून तुकोबारायांचे अभंग गायचे.” खुद्द सावरकरांना सुद्धा ही माहिती नव्हती जी मा.मोदीजींनी दिली. कारण तसं असत तर सावरकरांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमध्ये कुठेतरी त्याचा पुसटसा उल्लेख आला असता. पण तस झालं नाही.

म्हणजे ज्यांचा तुकारामांच्या साहित्याशी कधी संबंधच आला नाही त्या सावरकरांचा खोटा संदर्भ मा. पंतप्रधानांना अशा प्रसंगी आठवतो पण महात्मा गांधींनी तुकोबांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर केले आणि महात्मा गांधींची जी बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो हा संदेश दर्शविणारी तीन माकडे आहेत तीसुद्धा तुकोबारायांच्या पापांची वासना नको दावू डोळा, त्याहूनि आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधिर करोनि ठेवी देवा लाल या अभंगातून घेतल्याचे खुद्द महात्मा गांधींनी लिहून ठेवले आहे हा संदर्भ त्यांना आठवला नाही. आठवला तरी ते सांगणार नाही कारण गांधी हा ह्यांच्या विचारधारेचा तुकोबानंतरचा सर्वात मोठा शत्रू.

देश प्रचंड धार्मिक द्वेषाने पेटलेला असतांना जे पंतप्रधान कमालीचे मौन बाळगून आहेत. शेतकऱ्यांना खलिस्तानी-पाकिस्तानी म्हंटल गेल्यावर आणि ७०० शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडल्यावर जे चकार शब्द बोलले नाहीत. ज्या पंतप्रधानांनी मुस्लिमांबद्दल “वो लोग अपने कपडोसे पहेचाने जा सकते है” असे शब्द वापरले आहेत तेच पंतप्रधान देहूच्या भाषणात म्हणतात “उच्च-नीच भेदभाव करणे आणि माणसा-माणसात फरक करणे खूप मोठे पाप आहे. हा संतांचा संदेश फक्त भगवतभक्तीसाठीच नाही तर राष्ट्रभक्ती साठीसुद्धा महत्वपूर्ण आहे.” किती हा विरोधाभास. पुढे भाषणात तर त्यांनी तुकोबांच्या अभंगाचा उल्लेख केला की, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..’ हा अभंग आपल्या पंतप्रधानांनी इतका मनावर घेतलेला दिसतोय की जे रंजले-गांजले नाहीत त्यांनासुद्धा चुकीच्या ध्येयधोरणांद्वारे, नोटबंदी, महागाई, बेरोजगारीने रंजले-गांजलेले करून टाकत आहेत. पुढे अशा रंजल्या-गंजल्यासाठी काहीतरी करतील असा अंदाज बांधायला सध्यातरी हरकत नाही.

दुसरा कार्यक्रम पार पडला तो मुंबईतील राजभवन येथे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांची गाथा सांगणाऱ्या ‘क्रान्तिगाथा’ या भूमिगत दालनाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. कायम तिरंग्याचा, राष्ट्रगीताचा आणि देशाच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या आणि स्वातंत्र्यलढ्यात कवडीचाही सहभाग न नोंदवता कायम ब्रिटिशांची एकनिष्ठ राहत चाकरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या हातून स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारकांची गाथा सांगणाऱ्या ‘क्रान्तिगाथा’ दालनाचे लोकार्पण होते. काय हा विरोधाभास? येथील भाषणात सुद्धा पंतप्रधानांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे महाराष्ट्रातील टिळक, चाफेकर बंधू, वासुदेव फडके आठवले पण भगतसिंगांसोबत देशासाठी फासावर जाणारे महाराष्ट्राचेच सुपुत्र शिवराम राजगुरू आठवले नाहीत.

पंतप्रधानांना इंग्रजांची सहावेळा माफी मागणारे व तुरुंगातून सुटून आल्यानंतर आयुष्यभर ब्रिटिशांशी प्रामाणिक राहून मरेपर्यंत ६० रु.पेन्शन घेणारे सावरकर दोनदा आठवले, अंदमानातील तुरुंग आठवला परंतु विनायक दामोदर सावरकरांनी मार्गारेट लॉरेन्स नावाच्या महिलेवर केलेला बलात्काराचा प्रयत्न आणि त्या बलात्काराच्या प्रयत्नात ४ महिने जिथे शिक्षा भोगली तो इंग्लंडचा तुरुंग आठवला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा-मादाम कामा आठवल्या परंतु ब्रिटिश पार्लामेन्ट मध्येसुद्धा ज्यांचा उल्लेख व्हायचा, ज्यांचा दरारा होता ते सातारा-सांगलीत ब्रिटिश सरकारच्या समांतर प्रतिसरकार चालविणारे महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील आठवले नाहीत. संपूर्ण जगावर राज्य असणारे ब्रिटीश सातारा-सांगली परिसरात हतबल झाले होते.

या ब्रिटिशांविरोधात लढणार्‍या प्रतिसरकारची विनायक दामोदर सावरकर व हिंदू महासभेने अनेक भाषणांमधून वारंवार गुंडांची टोळी म्हणून हेटाळणी केली आहे. का तर ते इंग्रजांच्या विरोधात लढत आहेत. यांना मदत करणे तर दूरच परंतु प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे दोन साथी जी.बी.लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांना २८ जुलै १९४३ रोजी दक्षिण सातार्‍यातील वाळवा तालुक्यात पकडण्यात आले. त्या भागातील हिंदू महासभेचे प्रमुख कार्यकर्ते सदाशिव कुलकर्णी व बाबुराव कुलकर्णी ह्यांनी पोलिसांना खबर देऊन नागनाथअण्णा आणि त्यांच्यासोबतच्या ४० साथीदारांना पकडून दिले. ह्या इंग्रजांच्या मुखबिरीची प्रतिक्रिया म्हणून सदाशिव कुलकर्णी आणि बाबुराव कुलकर्णी या दोघांचेही तुफानसेनेतर्फे हातपाय तोडण्यात आले. अभिनव भारत ची आठवण काढणाऱ्या पंतप्रधानांना ह्या हिंदू महासभेच्या व सावरकरांच्या कार्यकर्त्यांचा विसर पडला असावा. कारण क्रांतिकारकांचा खरा इतिहास हे लोक कायम झाकून ठेवतात. आणि स्वतः च्या नाकर्त्या नायकांना महापुरुषांच्या रांगेत बसविण्याचा प्रयत्न करतात.

आपल्या मातृसंस्थेने ज्यांना क्रांतिकारक मानलं बस तेच क्रांतिकारक आणि आपल्या मातृसंस्थेने ज्यांना महापुरुष मानलं बस त्यांचेच नाव घ्यायचे आणि इतरांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अप्रत्यक्ष अपमान करण्याची ह्यांची परंपरा जुनीच आहे. ह्यांना जी स्क्रिप्ट आपल्या मातृसंस्थेकडून लिहून दिली जाते हे लोक त्यात एका शब्दाचाही बदल करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हे लोक बदलणार नाहीतच परंतु ह्या लोकांना बोलावून त्यांच्या हातून तुकोबांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचे लोकार्पण आयोजित करणाऱ्यांची चीड येते.तुकारामांच्या गाथा आणि स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या क्रांतिगाथा ह्या दोन्ही महान गाथा बुडविणाऱ्यांच्याच हातात सध्या आपला देश आहे आणि ते हा देशसुद्धा बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला देश बुडविण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होवोत हीच तुकोबाचरणी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चरणी प्रार्थना.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, विदर्भ, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED