संरक्षण दलात ‘अग्निविर’

39

संरक्षण दलात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आणली असून या योजनेला ‘अग्निपथ’ असे नाव दिले आहे. या योजनेनुसार दरवर्षी चाळीस ते पन्नास हजार तरुणांची संरक्षण क्षेत्रात भरती केली जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात भरती झालेल्या या तरुणांना ‘अग्निविर’ असे नाव देण्यात येणार असून या तरुणांची चार वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर भरती होणार असून या तरुणांना सुरवातीचे सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना संरक्षण दलात पोस्टिंग दिली जाणार असून या तरुणांना तीस ते चाळीस हजार रुपये प्रतिमहा वेतन मिळणार असून चार वर्षानंतर सेवामुक्त झाल्यावर त्यांना ११ लाख रुपये एकरकमी मिळणार आहे तसेच कामावर असताना त्यांचा विमा उतरवला जाणार आहे. अग्निविर म्हणून संरक्षण क्षेत्रात भरती होणाऱ्या तरुणांचे वय साडे सतरा ते एकवीस या दरम्यान असणे गरजेचे आहे. अर्थात भरती झालेल्या सर्वच तरुणांना चार वर्षाने सेवामुक्त केले जाईल असे नाही भरती झालेल्या एकूण तरुणांपैकी १५ टक्के तरूणांना परमनंट कमिशननुसार १५ वर्ष सेवा करता येईल. चार वर्षाने सेवामुक्त झालेल्या तरुणांना पेन्शन मात्र मिळणार नाही त्यामुळेच या योजनेवर काहीजण टीका करीत आहेत त्यात काही माजी सैनिकही आहेत.

या योजनेला उत्तर भारतीय तरुणांचा मोठा विरोध आहे. ही योजना रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच परमनंट कमिशनची योजना चालू ठेवावी यासाठी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान येथील तरुण रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही झाली आहेत. या योजनेवर टीका होऊ लागल्यावर सरकारने चार वर्षानी सेवामुक्त झालेल्या तरुणांना पोलीस किंवा निमलष्करी दलात प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. अर्थात अशी योजना राबवणारा भारत पहिला देश नाही चीन, अमेरिकेसारख्या अनेक मोठ्या देशात ही योजना चालू आहे. नव्या योजनेमुळे तरुण व अनुभवी व्यक्तींचा तोल संरक्षण दलात साधला जाईल आणि देशातील बेरोजगारीही कमी होईल असा दावा सरकारने केला आहे. अर्थात मोदी सरकारने ही योजना आणण्यामागे वेतन आणि पेन्शनचा बोजा कमी करणे हे ही एक कारण आहे हे लपून राहिले नाही. आज संरक्षण दलाचे ५.२ लाख कोटीचे वार्षिक बजेट आहे. या बजेटचा ५० टक्के हिस्सा वेतन आणि पेन्शन वाटण्यावरच जातो. या योजनेमुळे सरकारचा वेतन व पेन्शनवरील बोजा कमी होणार असला, तरुणांना रोजगार मिळणार असला तरी यातून काही प्रश्न निर्माण होतात. संरक्षण क्षेत्रातील तिन्ही दलातील जवानांचे संरक्षण दलाशी भावनिक नाते निर्माण झालेले असते. केवळ चार वर्ष सेवा करणाऱ्या अग्निवीरांचे संरक्षक दलाशी असे नाते निर्माण होईल का? संरक्षण दलातील व्यक्तीला जवान असे संबोधले जाते. ती व्यक्ती देशासाठी प्राण देण्यास तयार असते, अग्निविर जवानांची जागा घेऊ शकेल का? संरक्षण दलात शिस्त कठोरपणे पाळली जाते. अनेक बाबीसंदर्भात गुप्तता पाळली जाते अनेक बाबींचे सार्वजनिकिकरण टाळले जाते.

सरावाने आणि अनुभवाने या गोष्टी साध्य होतात केवळ चार वर्ष सेवा करणाऱ्या अग्निवीरांना हे साध्य होईल का? परमनंट कनिशन मिळालेल्या जवानांनी काही वर्ष खडतर प्रशिक्षण घेतलेले असते त्यामुळे केवळ सहा महिने प्रशिक्षण घेतलेले अग्निविर जवानांची जागा घेऊ शकतील का? केवळ सहा महिने प्रशिक्षण घेऊन ते संरक्षण दलात निपुण होतील का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत त्यामुळेच या योजनेवर टीका होऊ लागली आहे. सरकार मात्र या योजनेवर ठाम आहे अर्थात ही योजना कितपत यशस्वी झाली हे पाहण्यासाठी किमान चार वर्ष वाट पाहावी लागेल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)