संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्काम ठिकाणांची*

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

🔹पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

म्हसवड(दि.17जुन):-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्काम ठिकाणाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दत्त घाट
नीरा नदी , लोणंद, तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद व बरड, या ठिकाणाची वारकरी व भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली.

या पाहणीप्रसंगी आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व त्या त्या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी दत्त घाट, निरा नदी, पाडेगाव ते पालखी तळ लोणंद यांची पाहणी केली. यावेळी श्री पाटील म्हणाले, पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम आहे. पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे यांची व्यवस्था करण्यात यावी. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा जिल्ह्यातील पालखी तळ व मार्गावरील रस्त्याची डागडुजी, स्वच्छता, पालखी तळावर पुरेशी तात्पुरती शौचालये, शौचालयाच्या ठिकाणी पाणी आदी सुविधा करण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्याव्या अशा सूचनाही श्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

पालखी सोहळ्यादरम्यान पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेऊन पालखी सोहळा यशस्वी करावा, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.पालखी तळावर महिलांसाठी स्नानगृह उभे करावीत. विसाव्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी रस्ता रॅम्प तयार करण्यात यावा. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणी विजेचे खांब, तारा यांची तपासणी, पालखीच्या वेळी खासगी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचेही नियोजन करण्यात यावे. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी पुरेशी आरोग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिले.