इश्क… शिकविणारा कबीर

44

सभोवतालच्या समाजामध्ये माणसामाणसांमध्ये वाढत चाललेल्या द्वेष आणि विखाराच्या या काळामध्ये जिथे माणसांच्या मनातील दरी विस्तारित जात असताना, वैश्विक सद्भावासाठी प्रेमाच्या विवेकी आवाजाने ओथंबून वाहणाऱ्या कबीरासारख्या कवीला समजून घेणे कधी नव्हे येवढे प्रासंगिक आहे. पुढे कबीराचा हा प्रेमरुपी विवेकी आवाज संत दादू दयाल,दरिया साहेब,चरणदास,पिपा इ.नी जगभर पोहचविला.

भक्तीच्या प्रांतात देशभरात अनेक संतांनी कालानुरूप लोकशिक्षणाचं काम केलं. हे काम करत असताना सगुण-निर्गुण, आतलं-बाहेरचं, बुद्धिप्रामाण्य-ग्रंथप्रामाण्य या सर्व चर्चाविश्वातून त्यांना जावे लागले आहे. कधी कधी हा संघर्ष अत्यंत तीव्र तर कधी कधी त्याची धार सौम्य होती. “खरंच मानवी जीवन जगण्यायोग्य आहे का?”
किंवा “या जीवना व्यतिरिक्त मरणोत्तर जीवन अस्तित्वात आहे का? या अध्यात्माच्या आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात कथ्याकुट करत तर्काची तर्कट होईपर्यंत वादविवाद झाले आहेत.”ब्रह्म सत्य, जगत मिथ्या” म्हणत मानवी जीवनालाच मिथ्या म्हणणा-या आणि ब्रह्म शोधणा-या या कळपाला पंधराव्या शतकात मानवी जीवन सुंदर आहे.फक्त ते सौंदर्य अनुभवण्यासाठी “आत्मभान” ही पूर्व अट आहे असे ठणकावून सांगण्याचे धाडस करणारा संत कवी कबीर. या आत्मभानाला कबीर “आत्म-खबर” म्हणतो. आत्मभानाचा संबंध प्रेमाची जोडताना कबीर तत्त्वज्ञानाच्या पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, सांख्य, योग, वैशेषिका या शाखांची पारंपारिक ग्रंथिक चौकटही नाकारतो. आत्मभानाच्या शोधात त्याला प्रेमाचा प्रकाश सापडला असल्याचं तो म्हणतो,

“पंजरि प्रेम प्रकास्या,अंतरि भया उजास।
मुख कस्तुरी महमही,बानी फुटी बास।”

कबीर सांगतो, प्रेमाने माझं शरीर प्रकाशमान झालय. माझ्या आतला “मी” प्रेमाने तेजाळून गेला आहे. हा आयुष्याचा हवा हवासा परिमळ मी आता सर्वत्र अनुभवतो आहे. कदाचित हेच प्रेमानं
तेजाळलेलं आत्मभान “मानुष प्रेम भयउ बैकुंठी.” म्हणणाऱ्या सुफी कवी मलिक मंहमद जयासीला जीवनाचा प्रकाश घेऊन गेल असावं. कबीर तर इथपर्यंत म्हणतो की प्रेमाविन जीवन म्हणजे खिन्न आणि उदास घरात राहण्यासारखच आहे. प्रेमभावनेने आत्मभान समृद्ध होतं, या अनुभवाचा मी “साखी”(साक्षीदार) आहे, असेही कबीर म्हणतो.
कबीराच्या प्रेमाचा हा प्रवास साचेबंद चौकटीतला नाही किंवा तो एका ठिकाणी थांबून अडकणाराही नाही उलट तो प्रचंड प्रवाही आहे.सुफींच्या भाषेत “इश्क मजिजीपासून ते इश्क हकिकीपर्यंत”
(वैयक्तिक प्रेमापासून वैश्विक सद्रभावापर्यंत) जाणारा आहे. “लव्ह” ला जिहाद म्हणून आपलं राजकारण शिकणा-यांच्या आणि समूह हत्याकांड घडवणा-यांचे जाहीर सत्कार करणाऱ्यांच्या द्वेषी आणि खुनशी गर्दीमध्ये,कबीराचं हे विवेकी प्रेम शोधणं म्हणजे निश्चितच कठीण उद्योग आहे. कबीराच्या प्रेम कवितांमध्ये त्याचा विवेक शोधने हे फारच कसोटीच काम आहे. त्याच्या कवितांना न्याय द्यायचा असेल तर रसिकही त्या कविता वाचतांना जागृक असणे आवश्यक ठरते, अन्यथा कमालीच्या (कबीराची कन्या) शब्दामध्ये,

” जन कबीर का सिखरी घर, राह सलैलि गैल।
पाव न टिके पिपलीका,लोगन लादे बैल।”

अशी अवस्था होऊ शकते.

मोक्षाच्या प्राप्तीसाठी संघटित धर्मांनी जे लौकिक मार्ग सांगितले ते कबीरांनी अक्षरशः उडवून लावले. त्याने मोक्षासाठी प्रेमाला विवेकाची जोड द्या असं म्हटलं. विवेकाच्या मार्गावरुन प्रेमाने केलेली वाटचाल किती वेदनादायी असते. त्या मार्गाच्या प्रत्येक वळणावर प्रेमाला कशा प्रकारे जीवघेण्या कसोट्यांना उतरावं लागतं याचं मार्मिक वर्णन कबीर करतो,

” कबीर येहु घर प्रेमका, खाला का घर नही। सीस उतारै हाथि करि, सौ पैसे घर माही।”

कबीर म्हणतो, हे प्रेमाचं घर आहे तुझ्या आत्याचं घर नाही.या घरात यायचं असेल तर आधी तुझं शीर कापून हातात घ्यावं लागेल. कबीराच्या प्रेमाची ही दाहकता आहे.कबीर येथे प्रेमभावनेला वैश्विकतेशी जोडतांना दिसतो.हे करतांना पुढे येणाऱ्या अनंत अडचणी बाबत त्याचा विवेक मात्र कुठेही क्षणभरही ढळतांना दिसत नाही, हे विशेष.संत कवी कबीर यांनी आपल्या अनेक कवितांमध्ये प्रेम आणि विवेकासोबतच बुद्धिप्रामाण्यवादाला अत्यंत महत्त्व दिलं. धर्माच्या नावावर माणूसपण नाकारून कर्मकांडाचे अवडंबर माजवणाऱ्यांना त्याने बुद्धिप्रामाण्यवादाचे खडे बोल सुनावले.पण बऱ्याचदा त्याच्या प्रेमभावनेच्या कवितांचा दाखला देत बुद्धिप्रामाण्यवादाच्या मार्गाचा आग्रह धरणा-यांना डिवचण्यासाठी वापर होताना दिसतो. आपल्या वाचनातील आकलन मांडणाऱ्याला चिमटा काढण्यासाठी कबीरांच्या ज्या दोह्याचा सर्वाधिक वापर होतो तो म्हणजे,

” पोथी पढि पढि जग मुआ, पंडित भया न कोय।
एकै आखर पीव का,पढे सो पंडित होय।”

कबीर म्हणतो,जीवनभर ग्रंथ वाचल्याने पंडित होता येत नाही. पण प्रेमाशी संबंधित अक्षर जरी वाचलं तरी पंडित होता येतं. या ओळींमध्ये वास्तविक अधिक बुद्धिप्रामाण्य आहे, असे सांगणारे केवळ या ओळी सांगून नामनिराळे होतात. पण वरील दोह्याच्या आधीचा दोहा ज्याच्या संदर्भाशिवाय हा दोहा पुर्ण होत नाही तो असा.,

” कबीर पढिबा दुरि करि,आथि पढुया संसार।
पीड न उपजी प्रीत सू, तो क्यों करि पुकार।”

कबीर म्हणतो, सार जग वाचन करतय. पण जर वाचणाऱ्याच्या मनात दुःख आणि वेदना यांच्याप्रती सहानुभूती नसेल. त्यावर प्रेमाची फुंकर घालण्याची त्याची वृत्ती नसेल तर वाचनाचा काय फायदा?कबीराच्या काव्यात व्याकरणाचे पॅरामीटर्स शोधण्यापेक्षा कबीराच्या अंतःकरणाचे पदर शोधणे हे रसिकासाठी आणि जगासाठी अधिक हिताचे ठरेल. सगळ्याच संघटित धर्म धारणेला कबीराने आपल्या शब्दांनी,प्रश्नांनी अनेक हादरे दिले आहेत. कुराण आणि वेदांच्या परे जाऊन तो वेदनेला थेट भिडणारा कवी आहे. जगाची वेदना शमवायला कबीराने प्रेमाचा “लुकाठा” (मशाल) हाती घेतला आहे. बुद्धिप्रामाण्याच्या प्रकाशाला कबीराने करुणेची जोड दिली. संघटित धर्माच्या कोणत्याही प्रतीकात्मक कचाट्यात न सापडता,

” कबीर हिंदू मूये राम कहि,मुसलमान खुदाई।
कहै कबीर सो जीवता,दुइ मे कदै न जाई।”

कबीर म्हणतो, मरताना हिंदू राम म्हणतात कींवा मुस्लिम खुदा. पण मी हे दोन्ही टाळतो. कबीर मुळात धर्म वाटणारा,प्रतीकं वाटणारा नव्हताच. तो विश्व सद्भावासाठी विवेकी प्रेमाचं व्यापक अवकाश निर्माण करू पाहणारा विश्व सहोदार्याचा प्रतिनिधी होता.याच प्रेमासाठी कबीर म्हणतो,

” हम घर जाला अपना, लिया लुकाठा हात।
अब घर जालू तास का, जो चले हमारे साथ।”

✒️राहुल बरडे(संपर्क:-8275049863)