वरोरा व मुल येथील उपजिल्हा रूग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

25

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30जून): लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रम हा केंद्र शासनाचा आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय यांचे मार्फत संस्थेमधील प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह यांचा दर्जा उंचविण्याचा दृष्टीने आयपीएचएस (इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्ड) व एनक्यूएएस (नॅशनल कॉलिटी एशुरन्स स्टॅंडर्ड) मानांकनानुसार मे-2018 मध्ये सुरु करण्यात आले. लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल या संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) या कार्यक्रमाचा मुळ उद्देश गर्भवती महिलांना सन्मानपुर्वक वागणुक देणे तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन प्रसुती सुरक्षितपणे करणे तसेच मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी करणे होय.

त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमातर्गत संस्थास्तरावर प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया गृह करीता क्वॉलिटी सर्कल स्थापन करण्यात आले असून यामध्ये वैद्यकिय अधिक्षक, स्त्रिरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भुलतज्ञ, अधिपरिसेविका व परिसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. क्वॉलिटी सर्कल यांचेमार्फत संस्थास्तरीय मुल्यमापन करून आरोग्य संस्थेतील त्रुटी काढण्यात आले. सदर त्रुटींची पुर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय कोचिंग चमुमार्फत मुल्यमापन करण्यात आले. सदर मूल्यमापन अहवालानुसार, 70 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त आरोग्यसंस्थांना राज्यस्तरीय मानांकनाकरीता पाठविण्यात आले.

राज्यस्तरीय मानांकनाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या आरोग्यसंस्थाची निवड करण्यात आली. तद्नंतर सदर संस्थेची मानांकनानुसार पडताळणी करणेकरीता केंद्रशासनामार्फत दोन सदस्यीय चमू पाठविण्यात आले. सदर चमुमार्फत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने तसेच मातामृत्यु दर शून्यावर आणल्याने तेथील प्रसुतीगृहाला व शस्त्रक्रियागृहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बाबत केंद्रशासनाकडून 2 मार्च 2020 रोजी पत्राद्वारे जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर कळविण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने रु.2 लक्ष प्रति वर्ष असे सलग 3 वर्ष प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रति विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे. उपरोक्त संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळणेकरीता उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील वैद्यकिय अधिक्षक, परीसेविका प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह येथे अधिकृत अधिपरीचारीका व वर्ग 4 चे कर्मचारी यांनी संस्थेकरिता केलेले प्रयत्न तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सदर संस्थेला भेटी देऊन केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा या सर्व बाबींमुळे सदर संस्थेला मानांकन मिळणे शक्य झाले.

राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरीता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, लक्ष कार्यक्रम अधिकारी डॉ. बंडू रामटेके, स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती श्रीरामे, जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पराग जिवतोडे, आयपीएचएस समन्वयक डॉ. यशश्री मुसळे, संस्थास्तरावरील वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. गोवर्धन दूधे, उपजिल्हा रुग्णालय मुल डॉ. सुर्यकांत बाबर तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल येथील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमामुळे सामान्य जनतेला शासकिय रुग्णालयात होणारे फायदे:

शासकिय रुग्णालयाची प्रतिमा उच्च दर्जाची होईल. प्रसुती दरम्यान गर्भवती महिलेला तिच्या इच्छेनुसार प्रसुती करता येईल व याकरीता गर्भवती महिलेला सन्मानपुर्वक वागणुक दिली जाईल. यामुळे शासकिय रुग्णालयात प्रसुतीच्या संख्येमध्ये वाढ होईल.

गुणवत्तापुर्वक सुविधा दिल्याने मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी होईल. गुंतागुंतीच्या वेळेस वेळीच धोका ओळखुन रुग्णांना मोफत संदर्भ सेवा देण्यात येईल. प्रसुतीदरम्यान प्रसंगानुसार शस्त्रक्रिया करण्यात येईल. खाजगी संस्थेपेक्षा उच्च दर्जाच्या सेवा शासकिय संस्थेत मोफत घेता येईल