निकालाची वाढती टक्केवारी ; संख्यात्मक की गुणात्मक ?

24

दहावीचा निकाल नुकताच लागला. अपेक्षेप्रमाणे यावर्षीही दहावीचा निकाल चांगला लागला. यावर्षी दहावीचा निकाल ९७ टक्के लागला. बारावीचा निकालही दहावी सारखाच चांगला लागला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष लेखी परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला त्यात ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यावर्षी प्रत्यक्ष लेखी परीक्षा झाल्याने ही आकडेवारी दोनने घटली आहे इतकेच! अर्थात ही आकडेवारी केवळ मागील दोन वर्षाचीच आहे असे नाही तर मागील पाच सात वर्षाच्या दहावी, बारावीच्या निकालाची टक्केवारी पाहिली तर दरवर्षी सरासरी ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. फक्त २०१९ साली निकालाची टक्केवारी घसरली होती त्यावर्षी ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते कारण त्यावर्षी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला होता. त्यावर्षी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्यात आले नव्हते त्यामुळे त्यावर्षी खरी गुणवत्ता पुढे आली असे म्हटले गेले. यावर्षी कोरोनामुळे पूर्णवेळ शाळा भरू न शकल्याने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली शिवाय लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला त्याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झाल्याचे निकालातून दिसते.

शिवाय विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परिक्षाकेंद्र आणि पर्यवेक्षकही शाळेतीलच असल्याने त्याचाही विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे दिसून येत आहे. या निकालाचे स्वागत करतानाच ही टक्केवारी म्हणजे गुणवता आहे का असा प्रश्न पडतो. निकालाचे फुगलेले आकडे पाहिले की राज्यात गुणवत्तेचा महापूर आला आहे असे वाटते पण ही गुणवत्ता गुणात्मक आहे की संख्यात्मक याचाही शोध घ्यावा लागेल. कारण टक्केवारी वाढली म्हणजे गुणवत्ता वाढली असे होत नाही. उलट यामुळे परीक्षांचे महत्व कमी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याने शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तीन दशकांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांना भीती वाटत होती आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेत भरघोस गुण कसे मिळवायचे हे माहिती झाले आहे.

या भरघोस गुणांमुळे आणि होणाऱ्या कौतुकामुळे विद्यार्थी फाजील आत्मविश्वासाला बळी पडण्याची देखील शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतात, ते विद्यार्थी बारावीनंतर काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. कारण बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट सारख्या परीक्षेत महाराष्ट्र खूपच मागे आहे. दहावीच्या परीक्षेत दिसणारा निकालाचा फुगवटा तिथे मात्र दिसत नाही,असे का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. जीवनात ज्ञानाला सर्वाधिक महत्व आहे. आपली शिक्षण पद्धती ज्ञानकेंद्रीत नसून परीक्षा केंद्रित आहे त्यामुळेच विद्यार्थी गुणवान होण्याऐवजी मार्क्सवादी होत आहेत. आज देशाला मार्क्सवादी विद्यार्थी नकोत तर गुणवान विद्यार्थी हवेत. कारण संख्यात्मक निकाल हा उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठीच असतो गुणात्मक विकास हा माणूस घडवण्यासाठी असतो.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५