वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ समारंभ संपन्न

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि. 21जून):-“आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शरीर व मन दोन्हीही निरोगी ठेवण्यासाठी योगासने मदत करतात तसेच शारीरिक व मानसिक आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त, आरोग्यदायी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत. योगासने जास्तीत जास्त भावनिक शांती देऊन शरीरातील हानिकारक विषारी द्रव्ये काढून टाकतात व शरीराचे विकार दूर करतात”, असे प्रतिपादन निवृत्त पोलिस अधिकारी मा. श्री शिवराज बाबासाहेब माने यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथील वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 21 जून 2022 रोजी सकाळी ठीक 6: 30 वाजता विविध योगासने व प्राणायाम करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.

श्री शिवराज माने यांनी प्राणायामाचे महत्व विशद करून प्राणायामाचे विविध प्रकार कपालभाती, भस्त्रिका अनुलोम-विलोम, इत्यादीची माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच योगाचे सर्वात उपयोगी व प्रभावी रूप म्हणजे सूर्यनमस्कार असे प्रतिपादन करून दररोज सर्वांनी सूर्यनमस्कार करावेत असे आवाहन करून सूर्यनमस्कार आणि विविध योगासने यांची प्रात्यक्षिकासह माहिती देऊन ती सर्व उपस्थितांकडून करवून घेतली.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रमुख पाहुणे मा. श्री शिवराज माने यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव सर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर पी. पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. योग दिन कार्यक्रमासाठी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. आर. ए. केंगार, उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे, प्रा. सौ. एस. पी. पाटील, प्रा. एस. एस. बोंगाळे याचबरोबर महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED