ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे यांची निवड

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21जून):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या रा.ज. बोढेकर स्मृति ग्रामसाहित्य लेखन पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण खोब्रागडे मुल यांची निवड करण्यात आलेली आहे. यांनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे.तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत जुनासुर्ला येथे २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले . त्यांचा झाडीबोलीत मोरगाड आणि लिपन हे ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवणारे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत . यश खेचून आणू दारी हा ललीतलेखसंग्रह प्रकाशित आहे .

नुकत्याच झालेल्या परिषदेच्या वार्षिक सभेत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील दरवर्षी नवोदित लेखक-कवींना सदर पुरस्कार देण्यात येत असतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवस्त्र आणि ग्रामगीता आहे. सदर पुरस्काराचे वितरण शाहु महाराज जयंती दिनी येत्या २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ४:०० वाजता चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात प्रदान करण्यात येणार आहे . तसेच या ठिकाणी ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांच्या स्मृती सुगंधाची गुंफण या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण खोब्रागडेचे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सरचिटणीस अँड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, देवराव कोंडेकर,संजय वैद्य, प्राचार्य भाऊ पत्रे, नामदेव गेडकर, नारायण सहारे, डॉ. बानासुरे , यवनाश्व गेडकर, आदींसह अरुण झगडकर , नंदकिशोर मसराम , किशोर आनंदवार , अनिल नैताम , संदीप येनुगवार यांनी अभिनंदन केले आहे.