चला विठ्ठलाशी बोलू या

▪️आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा विशेष लेख

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! हा आहे गजर. देशात कीर्तनाची परंपरा ही संत नामदेव महाराज यांनी सुरू केलेली आहे.त्यामुळे कीर्तनकार ज्या आसनावरून कीर्तन/ प्रबोधन करतात त्यास संत नामदेवांची गादी असं म्हणतात!

*पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।*
*व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम। *नाम विठोबाचे घेईन मी वाचे।*
*बीज कल्पातीचे तुका म्हणे।*

या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारकरी धर्मामध्ये पंढरपूरच्या वारीचे फार महत्त्व आहे.इतर कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही.पर्यटन करायला हरकत नाही! मुखामध्ये सतत फक्त विठ्ठलाचे नाव असावे. ज्याला शक्य असेल त्याने उपवास म्हणून एकादशी करावी, फराळ म्हणून शाबुदाना खावा असं म्हटलं नाही बरं!वारीमध्ये असणारा वारकरी हा मुख्यतः शेतकरी कुटुंबाचा घटक असतो. वारकरी दिंडी म्हटले की गावोगाव प्रवास करने,मुक्काम आले,थांबणे आले,सोबत पंगती आल्या.एकमेकांसोबत चालणे,बसणे -उठणे,फुगड्या खेळणे हे सर्व आले.सर्वांचा मेळा असतो हा उत्सव! यामध्ये जर एखादा वारकरी दर्शवली आहे! वारकरआपल्या घरी,गावात सुद्धा स्वतः पंढरीचा पांडुरंग विठ्ठल तुम्हांला भेटायला येतो,हे तुम्हाला ज्ञात आहेच की!

*कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी*. ही संत सावता महाराजांची भूमिका योग्य आहेच! विठ्ठल आपल्या श्रमात आहे,आई वडिलांच्या सेवेत आहे, हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे!महाराष्ट्राला वारकरी विचारधारेची खूप मोठी परंपरा आहे. संत नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचला,याला सर्व बहुजन संतांनी पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केला. जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी याला कळस चढविला असे म्हटले जाते,ते सत्यच आहे.संत नामदेव एका अभंगात म्हणतात…

*तीर्थ विठ्ठल,क्षेत्र विठ्ठल।*
*देव विठ्ठल,देवपूजा विठ्ठल।*
*माता विठ्ठल, पिता विठ्ठल।*
*बंधू विठ्ठल,गोत्र विठ्ठल।*

*गुरु विठ्ठल,गुरुदेवता विठ्ठल। निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल।* संत नामदेव महाराज विठ्ठल हेच एकमेव बहुजन समाजाचे दैवत आहे. इतर कोणतेही देव-देवता हे बहुजन समाजाचे दैवत नाहीत.याबाबत आणखी संत नामदेवांचा अभंग आहे.

*आमचा विठ्ठल प्रचंड दुसऱ्या देवाचे न पाहू तोंड।*
*एका विठ्ठलावाचून न करू आणिक भजन*।
*आम्हा एकविद भाव। कडा ना म्हणू इतरा देव।*
*नित्य करू अभ्यास।*
*म्हणे नामा विठू दास।*

या अभंगामधून स्पष्टपणे विठ्ठलाशिवाय इतर जे लोक विविध देवी-देवतांच्या नावावरती कर्मकांड करून आहारी गेलेले आहेत ते चुकीचे आहे.कारण त्यांना जे कर्मकांड अपेक्षिले जाते ते चुकीचे आहे.अनेकजण वेगवेगळ्या तीर्थाला जातात कुठे केस दान देतात तर कुठे इतर काही.अनेक कथित देवी देवता यांना नारळ, हार फुले,अगरबत्ती,लाडू मोदक,कपडे,तेल असं काहींना काही लागतं पण पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल असा आहे की ज्याला यापैकी काहीच लागत नाही! जो स्त्री पुरुष असा कोणताच भेद करीत नाही.ज्याला सोवळं ओवळ हे काही काही लागत नाही. अठरापगड बहुजनांच्यासाठी जो सदा स्वागत करीत असतो एकमेव विठ्ठल.जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा गाथेमधील अभंग ..

*विठ्ठलावाचोनी ब्रह्म जे बोलती ते वचन संती मानू नये। विठ्ठलावाचूनि ज्या ज्या उपासना। अवघाची जाणा श्रमची तो। विठ्ठलावाचूनि सांगतील गोष्टी।वाया ते हिपुटी होती जाणा। विठ्ठलावाचुनी जे काही जाणती। तीतुल्या वीत्पत्ती वाउगीया। तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा ।येर तो पसारा वाउगाची।।*आमच्या जे घरात जो इतर पसारा-कचरा आहे,त्याला आम्ही तसंच ठेवणार का?उघडे नागडे,गांजाफुके,वाकडे- तिकडे, अतिरीक्त किंवा वेगळेच अवयव असणारे यांच काय करणार ? हे ठरवावं लागणार आहे!*सेंदरी हेंदरी दैवते।कोण ती पूजे भुतेखेते। आपल्या पोटा जी रडते।मागती शिते आवदान।*आपुल्या इच्छा आणिका पिडी।काय ती देईल बराडी।कळो ही आली तयाची जोडी।अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।*ही दैवते कशी असतील जी आपल्या पोटासाठी नैवद्य मागतात! त्यांना कोंबडे बकरे यांचे बळी लागतात! यासाठी ते इतरांना पीडा म्हणजे रोगी करतात ! एवढी तरी बुद्धी आपल्याला असावी.

आमचा देव कोणता आहे जो दीन,पीडित दुबळे बहुजनांचे दुःख जाणतो त्यांना आपले मानतो तोच आमचा देव आहे. तोच आमचा पंढरीचा पांडुरंग आहे. तो आम्हाला जवळ करतो. आमच्यावर माया करतो.आमची दुःख दूर करतो.असा देव हा तुमच्या आमच्यात म्हणजेच माणसांत आहे. अशाप्रकारे संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाचे स्थान निश्चित केले आहे. बहुजनांचा देव विठ्ठल अतिप्रचंड, शक्तिशाली आहे. आम्हाला पुजाऱ्यांच्या नियंत्रणात असणाऱ्या देवाची गरज नाही.अशा देवांचे तोंड देखील आम्हाला पाहायचे नाही. त्यांना आम्ही देव म्हणणार नाही. अशा प्रकारचा सडेतोड बाणा संत नामदेव महाराजांच्या अभंगातून दिसून येतो.बहुतेक समाज चुकीच्या मार्गाने जात आहे, खऱ्या देवापासून दूर जात आहे. अनेक बापू,अम्मा,माँ, मठाचे साधू-स्वामी लोकांना अंधश्रद्धेच्या वाटेने नेत येत आहे.विषमतेची पेरणी करीत आहेत.स्त्रियांना गौण लेखून त्यांच्यावर पुन्हा एकदा मनुस्मृतीने लादलेली बंधने लादत आहेत.सतीप्रथा, केशवपन यांचे समर्थन करून विधवा स्त्रीयांना तुच्छतेने वागणूक देत आहेत! हा वार वाईट,ही दिशा वाईट, ही वेळ वाईट अशी ही अंधश्रद्धा पसरवित आहेत.विषमतावादी पोथ्या,पुराणे,ग्रंथ पारायण केलं तर चांगलं असं बाबा अन त्यांचे भक्त इतरांना नादी लावत आहेत! लोक त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत!

समाजाला खऱ्या देवाकडे घेऊन जाण्यासाठी,लोकांची अंधभक्ती पासून मुक्तता करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी सुरू केलेल्या कीर्तन या समाजप्रबोधन साधनांचा वापर करीत असे.संत नामदेव, संत तुकाराम महाराजांनी कपोलकल्पित देव -देवतेला, सनातनी भटांनी निर्माण केलेल्या जाचक रुढीला मूठमाती दिली.तशीच आम्हांला ही जे सेंदरी हेंदरी दैवते आहेत,त्यांना मूठमाती द्यावी लागणार आहे! बहुजन समाजाला ठणकावून सांगितले, सर्व जगच विठ्ठलमय आहे. अभंगगाथेच्या माध्यमातून अनेकांचे माथे सरळ झाले आहेत!त्यामुळे प्रत्येक घरी संत नामदेव व संत तुकाराम महाराज यांची *गाथा* असावीच.तिचे नियमितपणे वाचन चिंतन, मनन व आचरण जास्तीत जास्त प्रमाणात करावे लागणार आहे. कारण संत तुकाराम महाराजांच्या गाथेला तत्कालीन भटशाही प्रचंड घाबरत होती, म्हणून तर त्यांनी संत तुकाराम महाराजाना तत्कालीन भटांनी शिक्षा करून गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती.त्या गाथेत समता स्वातंत्य,न्याय,बंधुता या मूल्यांचा पुरस्कार आहे! जो मनुस्मृतीच्या समर्थकांना नको आहे.त्यांना त्यांची व्यवस्था हवी आहे,जी माणसा माणसांत भेद करते,स्त्रियांना गुलाम बनवते, काही माणसांना पशुपेक्षाही हीन वागणूक देते. व्रतवैकल्य, पूजा-अर्चा, धूप-अगरबत्ती, आराधना,दान दक्षिणा होम-हवन,यज्ञयाग इत्यादीच्या माध्यमातून देव प्रसन्न होतात, असं फसवतात! ते सर्व थोतांड आहे,हे पुरावेसह सिद्ध केले.

*भेदाभेद भ्रम अमंगळ।*
*अवघी एकाचीच वीण।*
*तेथे कैचे भिन्नाभिन्न।*

अभंग वाचून समजून घेतले की हे सर्व सहज लक्षात येते.
सर्व बहुजन संत व संत तुकाराम महाराजांनी आपली एकनिष्ठता केवळ विठ्ठलाप्रती अर्पण केली आहे. विठ्ठलाशिवाय अन्य आमचा देव नाही. आमचा देव भेदाभेद मानत नाही.*एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम। आणिकापे काम नाही आता। मोडूनिया वाटा सूक्ष्मदुस्तर। केला राज्यभार चाले ऎसा।*जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांच्या मार्गावर आपण चालत आहोत

*बोलू ऐसे बोले।जेणे बोले विठ्ठल डोले।प्रेम सर्वांगाची ठाई।वाचे विठ्ठल रुक्माई।*
*नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।*

संत नामदेवांच्या अभंगउक्ती प्रमाणे आम्हाला कार्य करावे लागणार आहे. आमच्या बोलण्यात वागण्यात केवळ विठ्ठल असावा.तसेच अज्ञान अंधःकार,अंधश्रद्धा,कर्मकांडाला नष्ट करण्यासाठी आणि ज्ञानाचा दीपक लावण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. हे करणे आपले कर्तव्य आहे.ती आपली नैतिक जबाबदारी आहे.*धर्माचे पालन।करणे पाखंड खंडन। हेचि आम्हां करने काम। बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। नाही भीडभार तुका म्हणे सानथोर।।*सत्य सांगण्यासाठी कुणाची भीडभाड राखायची गरज नाही. योग्य शब्दांचा वापर करून लोकांना प्रबोधित करणे गरजेचे आहे. शेवटी एवढेच आपल्याला म्हणावं लागणार आहे .

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे।ऐणे सोसे मन झाले हावभरे परती माघारे घेत नाही। बंधनापासून उकलेल्या गाठी। देता आली मिठी सावकाश। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले। कामक्रोधे केले घर रिते।।आमच्या बोलण्यात पाहण्यात आणि करण्यात विठ्ठल असावा. माझी मनस्थिती अशी झाली आहे की,फक्त विठ्ठलाचेच नाव घ्यावेसे वाटते. विठ्ठल हाच माझा जीवभाव आहे.हीच माझ्या मनाला लागलेली हाव आहे. ह्या इच्छेमुळे मनाला दुसरे काहीही नको.विठ्ठलाला घातलेल्या मिठीमुळे माझी सर्व बंधनातून सुटका झाली आहे. सर्व देह विठ्ठलमय झाला आहे. त्यामुळे काम व क्रोध या विकारांनी हे शरीर सोडले आहे. संताच्या अभंगाचा अर्थ आम्हाला आमच्या आचरणामध्ये आणण्यासाठी तो समजून घ्यावा लागणार आहे. नाहीतर संत तुकाराम महाराज म्हणतात*अर्थेविना पाठांतर कासया करावे।व्यर्थची मरावे घोकुनिया।घोकुनिया काय वेंगी अर्थ पाहे?अर्थ रूप राहे होऊनिया।तुका म्हणे ज्याला अर्थे आहे भेटी।नाही तरी गोष्टी बोलू नका।।*

✒️रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी सत्यशोधक वारकरी महासंघ, महाराष्ट्र)मो:-9420705653

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED