उध्दवजी, पुरंदरचा तह आणि शिवरायांना आठवा !

30

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे. उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता. राजांनी पाची पातशाह्यांना जेरीस आणत स्वराज्य उभारले होते. स्वराज्य मुलखामुलखात दौडत होते. स्वराज्यावरची प्रत्येक चाल परतवून लावली जात होती. औरंगजेबाला जेरीस आणून सोडले होते. तो स्वराज्य उध्वस्त करण्यास टपला होता.

नामवंत सरदार भल्या मोठ्या फौजा घेवून स्वराज्यावर पाठवत होता. शाहीस्तेखान सत्तर हजाराची फौज घेवून स्वराज्यावर चालून आला होता पण जाताना तीन तुटकी बोटे घेवून परत गेला होता. शिवरायांनी या आक्रमकांना माती चारली होती. वैतागलेल्या औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहांना स्वराज्यावर चाल करण्यास पाठवले होते. तो पुरंदरवर चालून आला. पुरदरला वेढा टाकला. मावळ्यांनी पुरंदर लढवला पण त्यांचा प्रतिकार टिकला नाही. मुरारबाजी धारातिर्थी पडले. मिर्झाराजे जयसिंहासमोर शिवरायांना माघार घ्यावी लागली. अखेर शिवरायांना तह करावा लागला. या तहामुळे शिवरायांना त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे गमवावे लागले. स्वराज्यातले तब्बल २३ किल्ले व चार लक्ष होन औरंगजेबाला द्यावे लागले होते. तसेच चाळीस लाखाची खंडणी व वर्षाला तीन लाखाचे हप्ते लादले गेले. संभाजी राजांना मिर्झाराजांकडे ओलीस ठेवावे लागले. शिवरायांच्याकडे केवळ बारा किल्ले आणि लाख होन उरले.

प्रचंड त्यागातून, बलिदानातून उभारलेले स्वराज्य संपते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती पण शिवरायांनी त्यातूनही स्वराज्य ताकदीने उभे केले. राजे आग्र्याला गेले. तिथे भर दरबारात अपमान होताच भर दरबारात कडाडले. जिथे मान उंच करून बोलण्याची मुबा नव्हती तिथेच त्यांनी स्वाभिमानाची डरकाळी फोडत दिल्लीचे तख्त हादरवून सोडले. संभाजी राजांना सोडवलेच पण गेलेले सगळे किल्ले पाहता पाहता स्वराज्यात आणले. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे.

आज उध्दव ठाकरेंची अवस्था शिवरायांसारखीच झाली आहे. त्यांनाही दिल्लीश्वरांनी जेरीस आणले आहे. योगायोगाची बाब म्हणजे पुरंदरचा तह ११ जूनला झाला आणि एकनाथरावांची बंडाळी २१ जुनला झाली. ११ जून आणि २१ जून अवघ्या दहा दिवसांचा फरक. पुरंदरच्या तहाला ४३५ वर्षे पुर्ण झाली. ४३५ वर्षानंतर तसाच बाका प्रसंग शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे. जून महिन्यातल्याच या दोन्ही घडामोडी घडल्या आहेत. दिल्लीश्वरांनी त्यांची शिवसेना पुरती उध्वस्त केली आहे. दिल्लीश्वरांसमोर त्यांचे मावळे लढले नाहीत तर फितूर झाले. या फितूरांनी दिल्लीश्वरांशी हातमिळवणी करत उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. आमचीच शिवसेना खरी असल्याचे ते आता बोलू लागले आहेत. या दोन्ही घटनात कमालीचे साम्य आहे. छत्रपतींनी स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला नंतर पुरता लोळवला होता. त्याचे कंबरडे मोडले होते. पुढच्या काळात त्याची महाराष्ट्रात मराठ्यांनीच कबर खोदली. औरंग्याने जंगजंग पछाडले पण त्याला स्वराज्य संपवता आले नाही.

स्वराज्य संपवण्याची स्वप्ने पाहत पाहत तोच संपला, मातीत मिसळला पण त्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी शिवरायांचे स्मरण करायला हवे. त्यांनी कंबर बांधून शिवसैनिकांच्या जोरावर हे दिल्लीश्वरांचे आक्रमण परतवून लावायला हवे. आमदार विकले गेले असतील, फितूर झाले असतील पण त्यांच्याकडे लढणा-या जातीवंत व कडव्या शिवसैनिकांची फौजच्या फौज आहे. ही फौज येत्या काळात सर्व विकाऊ लोकांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे या सर्वांना शिवसैनिकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. शिवसैनिकांनी यातले बहूतेक लोक भुईसपाट केले आहेत. उध्दव ठाकरेंनी पुरंदरचा तह आणि शिवरायांचा प्रताप आठवावा. त्यांचे स्मरण करून दिल्लीश्वरांचा बंदोबस्त करावा.

उध्दव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ले केले आहेत. त्यांनी “आमचे हिंदूत्व शेंडी आणि जाणव्याचे नाही !” असे म्हणत संघावर निशाणा साधला होता. काही दिवसापुर्वी संघाला थेट शिंगावर घेतले होते. देशाच्या राजकारणात राहूल गांधीनंतर इतक्या ताकदीने संघाला थेट शिंगावर घेण्याची हिम्मत कुठल्या नेत्याने दाखवली नव्हती. उध्दव ठाकरेंच्या याच हल्ल्याचा हा हिशोब आहे. ठाकरे संघावर तुटून पडू लागल्याने, संघाचा कावा उघड करू लागल्याने त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेतृत्वच मुळासकट उखाडून काढण्याचे कारस्थान रचले गेले आहे. या शिंदेंच्या कारस्थानाला भाजपाची पुर्ण ताकदीने साथ, फुस आणि रसद आहे. भाजपाची साथ असल्याशिवाय हे शक्यच नव्हते. साम, दाम, दंड व भेद निती वापरून सगळे आमदार गोळा केले गेले आहेत. मागची अडीच वर्षे मंत्रीपदाच्या खुर्च्या उबवताना या फितूर लोकांना हिंदुत्वाची आणि विकासाची आठवण झाली नाही. सत्ता चापून वरपताना त्यांना हिंदूत्व आठवले नाही. मग आत्ताच कसे काय आठवले ? पडद्यामागे काय काय ठरलय ? काय काय नाट्य घडलय ? सांगता येत नाही. इडीची आणि बेडीची भिती घालून यातल्या अनेकांना शिवसेनेपासून वेगळं केले गेले असण्याची दाट शक्यता आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख तुरूंगात आहेत. अनिल परब चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत. जिथे राज ठाकरेंची बुलंद तोफ गारठली तिथे हे बिच्चारे आमदार काय करणार ? ते ही इडीच्या भितीने गारठले असणार.

तुरूंगात जाण्यापेक्षा मंत्री झालेलं, सत्तेत गेलेलं काय वाईट ? असा विचार करून ते भाजपासोबत गेले असतील. त्यातले काही मंत्रीपद आणि कोटी कोटीच्या उड्डाणालाही भुलले असतील. हे कारस्थान एका दिवसातले नाही. हा कट गेल्या अनेक दिवसापासून रचला गेलाय. यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सामिल आहेतच पण नरेंद्र मोदी व अमित शहासुध्दा सामिल आहेत. त्यामुळेच बंड केलेली सगळी सेना सुरतलाच गेली व सुरतमधून गुवाहटीला गेली. सगळे फुटीर व फितूर आमदार भाजप शासीत राज्यातच का गेले ? हैद्राबाद, चेन्नईला का गेले नाहीत ? तिकडे त्यांचा पाहूणचार, सरबराई कोण करतय ? एकनाथ शिंदे यांनी अखेर फुटीर आमदारांना भाजप महाशक्ती असल्याचे सांगितले आहेच. म्हणजे हे सगळे कारस्थान याच तथाकथित महाशक्तीचे आहे हे उघड सत्य आहे. मध्यप्रदेशात, कर्नाटकात केले गेलेले “ऑपरेशन लोटस” महाराष्ट्रात केले गेले आहे. मध्यप्रदेशात ते फसले पण महाराष्ट्रात यशस्वी होताना दिसतय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तुटून पडणा-या, संघाची वैदीकशाही उघडी पाडू पाहणा-या व प्रबोधनकार ठाकरेंच्या वाटेवर जाऊ पाहणा-या उध्दव ठाकरेंना राजकारणातूनच पुर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेना मनूवादी हिंदूत्वापासून बाजूला गेली, ब्राम्हणशाहीच्या जोखडातून बाहेर पडली तर राज्यात अडचण होईल. संघाचे इरादे यशस्वी होणार नाहीत याची पुरती जाणीव असणा-या संघाने उध्दव ठाकरेंचा गेम केलाय. शिवसेनेच्या खांद्यावर बसून राज्यभर वाढलेल्या, पसरलेल्या भाजपाने व संघाने शिवसेनेचेच पाय तोडायचे कारस्थान रचले आहे. अजगर पाळला की तो गिळणारच हे सेनेच्या लक्षात नाही आले. उध्दव ठाकरेंनी हे संघ व भाजप पुरस्कृत कारस्थान उलथवून लावण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यासाठी त्यांनी शिवरायांचा प्रताप आठवायला हवा. शिवरायांचे मावळे जसे लढले तसे शिवसैनिक लढवायला हवेत. अंगात रग, धग असणारा झुंजार शिवसैनिक हे आव्हान पेलू शकतो. या नव्या सत्तापिपासू औरंगजेबांना तो मातीत गाढू शकतो. ती धमक, ती आग, ती रग त्याच्याकडे आहे म्हणूनच फुटीर आमदार सुरत आणि गुवाहटीला पळून गेलेत. शिवसैनिकांची भिती व धाक नसता तर ते महाराष्ट्रातच थांबले असते.