गंगाखेड बसस्थानकाच्या नवीन इमारतीची लवकरच होणार पायाभरणी

29

🔹आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्यास अखेर यश

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23जून):-गेल्या काही वर्षापासून गंगाखेड शहरातील बसस्थानकाच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वत्र घाण, दुर्गंधीचे साम्रराज्य निर्माण झाले आहे. जुनी इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू शकते, अशा वारंवार तक्रारी येत असल्याने स्वत: आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी बसस्थानकास भेट देऊन पाहाणी केली होती. त्यानंतर बसस्थानक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना १७ मे २०२० रोजी पत्र लिहून बसस्थानक इमारतीचे अत्याधुनिक पध्दतीने बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून आ.डॉ.गुट्टे यांनी वेळोवेळी स्मरण पत्र पाठवून तसेच अनेकदा प्रत्यक्ष भेटून बसस्थानक इमारत बांधकामाचा पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्यास यश आले असून गंगाखेड बसस्थानक इमारतीच्या बांधकामास अंतिम मंजुरी मिळाली असून याबाबतची बांधकाम निविदा सुध्दा काढण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या इमारतीची लवकरच पायाभरणी होणार आहे.

आ.डॉ.गुट्टे यांनी गंगाखेडसह पूर्णा आणि पालम येथे नवीन बसस्थानक इमारतीची मागणी केली आहे. त्यामध्ये पूर्णा बसस्थानक इमारतीच्या बांधकाम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. पालम येथील बस स्थानक इमारत बांधकामास मंजुरी मिळाली असून रक्कम या कामाबाबतचा निधी सुद्धा प्राप्त झाला आहे. मात्र जागा उपलब्ध नसल्याने तूर्तास इमारत बांधता येणार नाही. परंतु जागेची शोधाशोध सुरू असल्याचे संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
गंगाखेड हा पर्यटन व तीर्थस्थानासाठी प्रसिध्द तालुका आहे. नृसिह पोखर्णी व संत जनाबाई दर्शनासाठी हजारो भाविक-भक्त दररोज ये-जा करीत असतात. तसेच शहरात जिल्ह्यातील सर्वात मोठी व जुनी बाजारपेठ असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून लोकांची चांगली वर्दळ असते. तालुक्यातील १०५ गावातूनही मोठी संख्या दररोज बसने प्रवास करीत असते. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीचा सर्वांना त्रास सहन करावा लागत होता. रंग उडालेल्या भिंती, पडझड झालेले छत, मोडलेल्या खिडक्या अशा जीर्ण अवस्थेत इमारत अडकली होती. मात्र, आता नवीन बांधकामास मंजुरी मिळाल्याने लवकरच आधुनिक सोई-सुविधांसह बसस्थानक सज्ज होणार आहे.

दरम्यान, पायाभुत सुविधा आणि मुलभुत प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रस्तावित इमारत मंजूर करून गंगाखेड तालुक्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल तालुक्यातील अनेक सरपंच, पोलिस पाटील, सर्वसामान्य नागरिक, शिक्षक, विविध संस्थाच्या पदधिकारी व खास करून गंगाखेडला शिक्षण घेण्याकरिता बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ.डॉ.गुट्टे यांचे आभार मानले आहेत. 

*विधानसभेतही मांडला होता तारांकित प्रश्न*  
गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही ठिकाणी बसस्थानक इमारत मंजुरीसाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे वारंवार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. परिणामी गंगाखेड बसस्थानक इमारतीसाठी ५ कोटी रूपायांची मंजुरी मिळाली आहे. मात्र, या निधीत केवळ इमारत बांधता येईल. मग वाहनतळाचे काय? त्यामुळे गंगाखेड बसस्थानकातील वाहानतळासाठी आणखी २ कोटी रूपये शासनाकडे मागणार असल्याचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आवर्जून सांगितले