खटावचे जवान सूरज शेळके यांचे लडाखमध्ये वीरमरण

🔹कुटुंबावर मोठा आघात ; गावावर शोककळा

✒️सातारा,खटाव(नितीन राजे)

सातारा(दि.25जून):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील , खटाव येथील जवान ,सूरज प्रताप शेळके (वय २३) विरमरण आले.
सैन्य दलात आपली सेवा बजावत असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लडाखमध्ये आकस्मित निधन झाले. असून त्यांचे निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, गावावर शोककळा पसरली आहे.

जवान सूरज शेळके यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांना काल सायंकाळी लडाख रेजिमेंटकडून कळविण्यात आली . सूरज शेळके यांचे प्राथमिक शिक्षण खटाव जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण शहाजीराजे महाविद्यालयात झाले होते. त्यानंतर ते २०१८ साली लष्करात भरती झाले होते. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ते प्रत्यक्षात कर्तव्यावर रुजू झाले होते. सध्या ते १४१, फिल्ड रेजिमेंटमध्ये लान्स नाईक या पदावर देशसेवा करत होते.

त्यांची नेमणूक लडाखमध्ये झाली होती. सेवा बजावताना त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित जवळच्याच लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. जवान सूरज शेळके अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील प्रताप शेळके आई सुवर्णा मोलमजुरी करतात. भाऊ गणेश पदवीधर असून तोदेखील लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत आहे. जवान सूरज हे दोन महिन्यांपूर्वी सुट्टीवर खटावला आले होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED