राजर्षी छत्रपती शाहू महाराज समतेचे महानायक!!

▪️आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजाना कोटी कोटी प्रणाम!!

राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रजेचे दुःख ते आपले दुःख म्हणून वाटून घेणारे, दलितांचे कैवारी, स्त्री उद्धारक, धर्मसहिष्णू, प्रजाहितदक्ष, आरक्षणाचे जनक, विविध कलागुणांना वाव देणारे, सर्व जातीच्याधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह स्थापन करणारे, अष्टपैलू लोकनायक, धैर्यवान, लोकाभिमुख कार्य करणारे, महाराष्ट्रभर शैक्षणिक , सामाजिक आर्थिक, वैचारिक औद्योगिक क्रांती घडवून आणणारे, साहसाचे दुसरे नाव, अष्टपैलू व्यक्तिमत्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज !!

राजर्षी शाहूंचे मूळ नाव यशवंत आबासाहेब घाटगे होते. जन्म इसवी सन 1874 मध्ये झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीला वारस राहिला नाही. म्हणून राजघराण्याशी पदर जुळत असल्यामुळे यशवंतरावांना दत्तक घेण्यात आले.1884 साली मातोश्री आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्याच दिवशी राज्यारोहण समारंभ झाला. राजकोट, धारवाड येथे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण सर जेम्स फ्रेजर याच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

राजर्षी शाहू म्हणजे तोच बाळ यशवंत होता जो पहिल्यांदा राजदरबारात आल्यावर छातीठोकपणे सांगतो की, मी राजा होण्यासाठी या ठिकाणी आलो. तेव्हा सर्वांना त्यांच्यातील धमक व चमक लक्षात आली. पुढेही राजगादीवर येताच राजर्षी शाहूंनी प्रजेच्या हिताचे असे काही कार्य करण्यास सुरुवात केली की, थोड्या कालावधीत सर्वांना राजर्षी शाहू महाराज आपलेसे वाटू लागले.त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली. दीन दलितांसाठी अस्पृश्यांसाठी कार्य करणारा असा राजा पुन्हा होणार नाही.
राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्व उठावदार होते. उंच व धिप्पाड शरीरयष्टीत उदार व दयाळू अंतकरण वसत होते. छत्रपती शाहूंच्या अश्वारोहण कौशल्य वाखाणण्याजोगे होते. म्हणूनच म्हणावसं वाटतं की, साहसाचा दुसरे नाव म्हणजे राजर्षी शाहू होय. रानडुकराची शिकार करणे त्यांना आवडत असे. घोड्यावर बसून भाल्याने पळत्या रानडुकराची शिकार करणे हे धाडसी कार्य ते करत होते. महाकाय अशा वाघाची निशस्त्र शिकारही ते करत. महाराजांच्या शिकारीचे अनेक किस्से आहेत ते ऐकून वाचून असे वाटते की महाराज म्हणजे अदम्य साहस पराक्रम!!

राजा तोच असतो जो लोकांच्या मनावर राज्य करतो! छत्रपती राजश्री शाहू महाराज लोकांच्या मना मनामध्ये दृढ नातं निर्माण करणारे प्रजाहितदक्ष राजे होते! प्रसंगी सामान्य लोकांत मिसळून राजश्री शाहू नि राज्यकारभार केला. शिवाजी महाराजां प्रमाणे स्वराज्य हे आपणा सर्वांचे आहे हा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण केला. शाहू महाराजांच्या रूपात जनतेला आपला हक्काचा राजा मिळाला होता. म्हणून जनतेला महाराजांकडून खूप अपेक्षा होत्या. राजाने राज्यकारभार अशारीतीने करावा की प्रजेच्या मनावर राजाचे नाव कोरले जावे. असेच कार्य राजश्री शाहू महाराजांचे होते. राजर्षी शाहू महाराजांनी अधिकार ग्रहण केले तेव्हाच त्यांनी आपली प्रजा सुखी संतुष्ट असावी. प्रजेचे कल्याण व्हावे, राज्याचे कल्याण करण्यासाठी सर्व अधिकारी वर्गाने सहकार्य करावे यासाठी राजे आग्रही होते. प्रजेच्या कल्याणासाठी उद्धारासाठी राजाची तळमळ होती. ती त्यांच्या प्रत्येक कार्यातून आपल्या दृष्टीस पडते.

शाहू महाराजांना बहुजनांचे राजे म्हटले जाते. ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला होता. त्यावेळी सर्वत्र उच्चवर्णीयांचे प्रस्थ होते. दलित, पीडित , बहुजनांची संख्या राज्यकारभारात नगण्य होती. दलित,पीडित, बहुजन, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढी व परंपरा यामध्ये खितपत पडला होता. ‘भाकरी खाणे व बैल हाकलणे’ एवढेच काम राज्यातील दिन दलित पीडित बहुजन समाजातील 80 टक्के लोक करत होते. दलित, पीडित, शोषित,भटक्या विमुक्त , जाती जमाती यांची आर्थिक सामाजिक प्रगती नगण्य होती. बहुजन समाज गुलामगिरीत जीवन जगत होता. राजश्री शाहू राजेंना या परिस्थितीची प्रकर्षाने जाणीव झाली होती. ही परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी माझ्या राज्यातील प्रत्येक जाती समूहाच्या लोकांना शिक्षणाचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी राजे आग्रही होते. शिक्षणाचा हक्क मिळाल्यास या लोकांना गुलामगिरीची जाणीव होईल आणि ते त्याविरुद्ध बंड करतील असा महाराज विचार करत होते.

महाराष्ट्राची सामाजिक, धार्मिक व्यवस्था न्याय व्हावी यासाठी महाराजांनी चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध उठाव केला. महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. महात्मा फुले यांनी ज्या पद्धतीने अस्पृश्य निवारण करण्याचा प्रयत्न केला तो आदर्श राजर्षी शाहूंनी घेतला.आपल्या संस्थानातील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.अस्पृश्यामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या संस्थानातच नाही तर महाराष्ट्रभर सामाजिक सुधारणांची चळवळ त्यांनी आरंभली होती.’मी पदावरून गेलो तरी चालेल’ परंतु बहुजन समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही यासाठी त्यांनी सनातन मंडळी, मित्रपरिवार यांचा विरोध सहन केला. स्वातंत्र्याची पहाट होण्याअगोदर येथील अस्पृश्य, शूद्र लोक जागे झाले पाहिजे. नाहीतर या भोळ्या-भाबड्या जनतेला स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही. आणि सर्व उच्चवर्णीय लोकांच्या हातात सत्ता जाईल व बहुजन समाज तळागाळातील समाज हा नेहमीसाठी दारिद्र्यात खितपत राहील. इंग्रज भारतात आहे तोपर्यंत येथील शूद्रानी,बहुजनांनी जागृत झाले पाहिजे.त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ समजला पाहिजे असाच विचार महात्मा फुले हि करत होते. त्यासाठीच इंग्रजांना माऊली म्हणत होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला राजर्षी शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले.

ग्रामीण जनतेकडून सक्तीने अथवा मोफत वस्तू घेऊ नयेत असा जाहीरनामा 14 एप्रिल 1894 रोजी महाराजांनी काढला होता. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असा शिवाजी महाराजांचा जाहीरनामा होता तसाच राजर्षी शाहू महाराजांचा जाहीरनामा होता. त्यामुळे संस्थानातील जनतेला बराच दिलासा मिळाला.राजर्षी शाहू महाराजांनी अशी उल्लेखनीय कामगिरी केली होती म्हणून जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. प्रजेचा विश्वास त्यांनी संपादन केला होता . शेती , शिक्षण , उद्योग प्रशासन या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. शिक्षणामुळेच येथील शोषित पीडित लोकांना आपल्या दयनीय परिस्थितीची जाणीव होईल म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. सरकारी शाळेत अस्पृश्यांना सामावून घेण्याचा आदेश काढला. मुलीच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले . सत्यशोधक शाळा, पाटील शाळा काढल्या शिक्षणामुळे समाज परिवर्तनाची चक्रे जलदगतीने फिरू लागली.जातीभेद नष्ट व्हावा म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी धनगर मराठा जातीचे संबंध जोडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. एवढंच नाही तर दवाखाना, शाळा , कचेऱ्या राजवाडा, राजाची पंगत दलितांसाठी खुली केली. कुणाच्याही गिधड धमक्यांना महाराज घाबरले नाही!

मागासवर्गीयांसाठी 50 टक्के जागा राखीव 26 जुलै 1902साली सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी महाराजांनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण देणारे शाहू महाराज एकमेव राजे असावेत. एवढा मोठा निर्णय घेतल्यामुळे महाराजांना खूप टीका सहन करावी लागली. गंगाराम कांबळे नावाच्या दलिताला उपहारगृह काढून देतात व त्याला सांगतात हॉटेलमध्ये दर्शनी ठिकाणी माझी खुर्ची ठेवत जा. स्वतः अस्पृश्याच्या हातचा चहा पितात आणि आपल्या अधिकार्याला ही प्यायला लावतात.जातिभेद हा माणसाने आपल्या स्वार्थासाठी केला आहे.मानवता हाच खरा धर्म आहे ! याचा आदर्श निर्माण करतात . सर्वांना समानतेने जगण्याचा संदेश देणारे महाराज म्हणजे युगपुरुष होय!वेदोक्त प्रकरणानंतर महाराजांना विषमतेची अधिक जाणीव झाली. मी एक राजा असून मला शूद्र म्हटलं गेलं तर माझ्या गोरगरीब प्रजेला कर्मठ ब्राह्मण कशी वागणूक देत असेल, असा विचार शाहू महाराजांनी केला. वेदोक्त प्रकरणानंतर कोणत्याच ब्राह्मणाकडून त्यांनी पूजा-अर्चा करून घेतली नाही. अस्पृश्यता निर्मूलन केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असा क्रांतिकारक विचार महाराजांनी मांडला!

अस्पृश्यांना, बहुजनांना सरकारी नोकरीत सामावून घेतले. एवढेच नाही तर राजदरबारातील वेगवेगळ्या पदावर अस्पृश्यांची नेमणूक केली. वकिलाच्या सनदा ही अस्पृश्यांना दिल्या.ज्या तरुणांना डॉक्टर होण्याची इच्छा आहे त्यांना मदत केली. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करणे म्हणजेच खरे राष्ट्र कार्य आहे असा महाराजांचा विचार होता.शोषित , पीडित, बहुजना बरोबर आपल्या संस्थानातील स्त्रियांवर अत्याचार होऊ नयेत याचा विचारही शाहू महाराज करतात. आपल्या संस्थानातील स्त्रियांवर अत्याचार होऊ नये म्हणून. अत्याचारांना प्रतिबंध घालणारा कायदा ऑगस्ट 1919 मध्ये लागू केला.’स्त्रियांना क्रूरपण वागविण्याचे बंद करण्याविषयी चा नियम’ या नावाचा कायदा मंजूर करतात. काडीमोड अथवा घटस्फोट कायदा, जोगतीण प्रतिबंध कायदा 17 जानेवारी 1920 देवाच्या नावावर सोडलेल्या स्त्रियांना पुढे अत्यंत घृणास्पद वागणूक दिली जात होती. याला प्रतिबंध करण्यासाठी जोगतीनीं प्रतिबंध कायदा केला. रूढी परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांवर होणारे अत्याचार बंद करण्यासाठी महाराजांनी कायदे केलेत.

पुनर्विवाह नोंदणी कायदा जुलै 1917 विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचे स्वातंत्र्य देणारा हा कायदा होता. काही उच्चवर्णीय जातीत आजही विधवा पुनर्विवाह होत नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. महाराजांचे कार्य किती द्रष्टेपणाची होते याची यावरून प्रचिती येते. आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह कायदा जुलै 1919 जातिभेद मोडण्यासाठी असा कायदा केला होता . आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह स्वातंत्र्य त्या काळात शाहू महाराजांनी दिले होते. काळाच्या कितीतरी पुढे जाऊन कार्य करणारे शाहू महाराज होते!तीन ऑगस्ट 1918 रोजी महाराजांनी अस्पृश्यांवर लादलेली हजेरी पद्धत बंद केली. माणुसकीला काळीमा फासणारी ही हजेरी पद्धत बंद केल्यामुळे गुन्हेगारी कमी झाली. महाराजांनी अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी जन्म घेतला होता असे वाटल्यावाचून राहत नाही.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला घेऊन महार वतनाची उच्चाटन केले. जमिनीच्या थोड्याशा तुकड्यासाठी महार लोक गुलामीत जगत होते. या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करण्यासाठी महाराची वतने नष्ट करून त्यांना सन्मानाने जगण्यास प्रेरित केले. महार वतन खालसा केल्यामुळे गावच्या सरकारी कामाच्या सक्त्ती तुन महारांची मुक्तता झाली. परंतु या जागेवर रोखीने वेतन देऊन दुसर्‍याची नेमणूक करावी लागेल. सरकारी खजिन्यावर ताण पडेल असे अधिकाऱ्यांनी सुचविले. तेव्हा महाराज म्हणाले, ” माझा खजिना याबाबतीत रिता झाला तरी चालेल मला त्याची पर्वा नाही” असं म्हणणारा राजा खरच किती महान असेल याची आपल्याला कल्पना येते.!

एक नाही ! दोन नाही! तर तब्बल तेवीस वस्तीगृह कोल्हापूर शहरात काढून कोल्हापूर शहराला वस्तीगृहाची जननी बनवणारे राजर्षी शाहू महाराज होते . 1897साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. तेव्हा शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वस्तीगृह काढले होते. या वसतिगृहात सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी रहात होते परंतु याठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ लागली म्हणून शाहू महाराजांनी 1911 साली वस्तीगृह बंद केले. सर्व जातीसाठी त्यांनी नंतर स्वतंत्र वसतिगृह काढली. प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली पाहिजे असा त्यांचा उद्देश होता. शाहू महाराजांचे कार्य एवढे प्रभावी होते की , त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन यशवंतराव चव्हाण यांसारखे अनेक प्रभावी कार्यकर्ते निर्माण झाले.शाहू महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बोर्डिंग सुरू केले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कुराण या मुस्लीम धर्म ग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याची योजना त्यांची होती परंतु ते काम अपूर्ण राहिले. हिंदू-मुस्लीम ऐक्य प्रस्थापित केले .पेशवाईच्या काळापासून वेठबिगारी पद्धत होती. वेठबिगाऱ्याला दिवस-रात्र सरकारी कामाशिवाय गावातील लोकांसाठी वेठबिगारी करावी लागे. घरातले कोणी मरून पडले तरी यातून वेठबिगाऱ्याची सुटका नव्हती. अशी जुलमी पद्धत महाराजांनी बंद केली.

अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा नेता असावा. अशी महाराजांची इच्छा होती. खरेतर महाराजांनी अस्पृश्यांसाठी एवढे कार्य केले होते कि ते अस्पृश्यांचे नेते झाले होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रभावी नेता अस्पृश्यांना मिळाला यांचा राजर्षी शाहूं महाराजांना आनंद झाला होता. माणगावच्या परिषदेत महाराजांनी ही भावना व्यक्त केली होती. डाक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करावी!!
राजर्षी शाहू महाराज गुणग्राहक राजा होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात नव्हे तर महाराष्ट्रभर सर्व कलांना प्रोत्साहन दिले. मल्लविद्या , संगीत, तमाशा , नाट्यकला इत्यादी कलांना व कलावंतांना प्रोत्साहन दिले. पेंटर बंधूंनी कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र सिनेमा या नावाचे सिनेमा गृह स्थापन केले. सर्वच कलेना आश्रय दिल्यामुळे कोल्हापूर शहर लवकरच कलापूर म्हणून प्रसिद्ध झाले. कलेच्या क्षेत्रात शाहू महाराजांच्या काळात अनेक प्रसिद्ध कलावंत नावारूपास आले.

गुणवंत खूपच कमी असतात आणि त्यांचे गुणगान करणारे विरळच! मनाने गुणवंताचा सत्कार करणारे कमीच असतात. गुणवंताचा सत्कार करण्यासाठी निरोगी मन लागते. राजर्षी शाहू महाराज हे गुणवंताचा सत्कार करणारे राजे होते.जनतेच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानणारे व त्याचे निवारण करण्यास सदैव तत्पर असणारे राजर्षी शाहू महाराज त्यांच्या शैक्षणिक, राजकीय, आर्थिक , औद्योगिक कार्यामुळे ते आजही आपल्यात जिवंत आहेत. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असे शाहू महाराजांचे कार्य होते.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !!

✒️श्रीम.मनिषा अंतरकर saiantarkar@gmail.com

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED