एमपीएससीच्या केवळ परीक्षा पद्धतीतच बदल नाही तर अभ्यासक्रमातही बदल

▪️यातील अपयशी विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करू नये?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एमपीएससीनं या संदर्भात पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या पत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात ३ बदल करण्यात आले आहेत.

आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण ९ पेपर असतील. त्यातील भाषा पेपर १ मराठी, भाषा पेपर २ इंग्रजी हे प्रत्येकी ३०० गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ हे एकूण ७ विषय प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ असतील.

सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन ४ हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. तसेच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना १ वैकल्पिक विषय निवडता येईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षेकरीता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

पूर्व परीक्षेतील बदल राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक २ सी-सॅट अर्हताकारी करण्यात आला आहे. नवीन बदलाची अंमलबजावणी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणा-या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपासून केली जाणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ अर्थात सी-सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.

या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी-सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारसीही एमपीएससीने स्वीकारल्या आहेत.

यशासारखं यश नाही हे जरी खरं असलं तरी त्यामागे अनेक अपयशी विद्यार्थी आहेत. त्यांचा विचार फारसा होताना दिसत नाही. आणखी एक वर्षं हे तीन शब्द हलवून सोडतात. त्या कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा लांबल्या होत्या व लांबल्या आहेत. त्यामुळे परीक्षेचं चक्र आणखी बदललं आहे. त्यामुळे अपयशी विद्यार्थ्यांचा विचार व्हायला हवा. या निकालानंतर जे विद्यार्थी मुलाखतीत पास होऊ शकले नाही, त्यांना जास्त दु:ख झालं असेल. पण जे विद्यार्थी पूर्व आणि मुख्य परीक्षेत पास होऊ शकले नाहीत, त्यांच्या खपल्याही नक्कीच निघाल्या असतील. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपयश आलं तर खरंच काय करायला हवं?

सर्वप्रथम अपयशाचा खिलाडू पद्धतीने स्वीकार करावा आणि नेमकं हेच कठीण असते. पण त्याला पर्याय नाही. निकाल जाहीर झाला की तो बदलणार नसतो त्यामुळे स्वतःला बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. अपयश भोगावाच लागेल, म्हणून तो भोगून घ्या. सर्व प्रकारच्या भावनांचा निचरा होऊ द्या, जवळच्या व्यक्तींशी बोला, मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. थोडा ब्रेक घ्या आणि एकदा हे सगळं पार पडलं की मग अपयशाचा विचार करू नका. त्याचा काहीही फायदा होणार नसतो. हे सगळं बोलायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण आहे. पण ते करावंच लागेल. त्यामुळे कोणतीही गोष्ट मनात राहत नाही. आपण मोकळे होता आणि भविष्याचं चित्र थोडं स्पष्ट दिसू लागतं.

निकालांचे कवित्व संपल्यावर गुणतालिका येतील, ती नीट पहा. कमी मार्क मिळाले तर ते का मिळाले? याचं विश्लेषण करा. मुळात ती गुणतालिका त्रयस्थपणे पहा. त्यात भावनिकरीत्या गुंतून जाऊ नका. अगदी कमी फरकाने पोस्ट गेली असेल तर दु:खाचा पुन्हा एकदा उमाळा येण्याची शक्यता असते, तो टाळा. आपण यादीत नाही हे स्वीकारा. पुढे काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. स्वत:बद्दल कठोर भूमिका घ्या. थोडक्यात काय तर भविष्याचा विचार करा.

स्पर्धा परीक्षा ही प्रकिया वेळखाऊ आहे, याचा आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेलच. पूर्व, मुख्य, तर कुणी मुलाखतीच्या म्हणजे अंतिम टप्प्यातून बाहेर पडतो. तिन्ही प्रक्रियेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही त्रासदायकच असते. निकालाच्या दिवशी विशेषत: पूर्व आणि मुख्य परीक्षेतून बाहेर पडलेल्यांना एक प्रकारची उत्सुकता आणि एक प्रकारचा गंड निर्माण होतो. नकळत तुलना होते आणि अभ्यासावरचे लक्षच उडते. तेव्हा आपले कोणी मित्र मैत्रिणी यादीत असल्यास त्यांचे मनापासून अभिनंदन करा आणि पु्न्हा अभ्यासाला लागा. ‘जलो मगर दीप के समान..’

कोण कसा लायक नव्हता? कोण फक्त आरक्षणाच्या भरवशावर तिथपर्यंत पोहोचला आहे, कोणाचा वशिला होता का? यावर मित्र-मैत्रिणींत, व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा टाळा. त्याने फक्त मानसिक त्रास होतो. त्यापेक्षा पुढील वर्षी आपला त्या यादीत कसा समावेश होईल याचा विचार करून त्याची आखणी करा. हल्ली एमपीएससी करणा-या विद्यार्थ्यांकडे काही लोक तुच्छतेने पाहतात. तुम्ही अपयशी झालात की, ही लोक पुन्हा त्यांच्या जीभेचा पट्टा सुरू करतात. पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

अनुकरण करा पण जरा जपून..आता जे विद्यार्थी यादीत आले आहेत, त्यांचा सत्कार समारोह होईल. त्यात ते टिप्स सांगतील, युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करतील, वर्तमानपत्रात लेख लिहितील. त्यात फार स्वत:ला गुंतवून घेऊ नका. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं, प्रत्येकाची अभ्यासाची शैली वेगळी असते. त्याचा फायदा तुम्हाला होईलच असं नाही. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा. खूप व्याख्यानं ऐकू नका. त्यामुळे गोंधळून जाण्याची शक्यता निर्माण होते. पहिला प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आधीच जर व्यवस्थित, नियोजनबद्ध अभ्यास करत असाल तर त्यांच्या एखाद्या एक-दोन गोष्टी अंमलात आणण्यास हरकत नाही. पण आपली संपूर्ण युद्धपद्धती बदलू नये.

मंदीतच संधी असते हे लक्षात ठेवा. एकदा एक मानसशास्त्रज्ञ त्यांच्या एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेच्या एका विषयात नापास झाले. त्यांना साहजिकच खूप दु:ख झालं. आपण आता आयुष्यातूनच उठलो अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले की , “तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या परीक्षेच्या एका विषयात एकदा नापास झाला आहेस, पण याचा अर्थ तू आयुष्यात नापास झालेला नाहीस.” बघा! या वाक्यावर फोकस करा, हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. तेव्हा कोणत्याच टप्प्यावरचे अपयश अंतिम नसते. अंतिम असते ते यश, जे आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नक्कीच मिळेल.

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)भ्रमणध्वनी:-७०५७१८५४७९

महाराष्ट्र, यवतमाळ, लाइफस्टाइल, लेख, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED