✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(1जुलै):-सलून चालकांच्या मागण्या आणि आंदोलनानंतर शासनाने काही अटींवर सलूनला परवानगी दिली असली तरी कटिंग करायला जाताना ग्राहकांनी स्वत:ची किट नेल्यास त्यांची कटिंग आणखी सुरक्षित होऊ शकणार आहे. त्यासाठी अशी किट नागपूरच्या प्रशांत राज नावाच्या अभियंत्याने तयार केली आहे.
लॉकडाउनच्या काळात सरकारने इतर अनेक व्यवसायांप्रमाणे सलूनवरही बंदी घातली. नंतरच्या काळात अन्य वस्तूंची दुकाने सुरू झाली तरी सलून बंदच होते. त्यामुळे सलूनचालकांनी आंदोलने केली, तर कुठे सलूनचालकाने आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने २८ जूनपासून सलूनला परवानगी दिली आहे.
मात्र, त्यातही फक्त कटिंगसाठीच ही परवानगी आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या त्वचेशी थेट संबंध येईल, असे कोणतेही प्रकार करायला बंदी आहे. त्यामुळे सलूनचालकांनी त्यांना घालून दिलेल्या अटींचे पालन करीत आपली दुकाने सुरू केली आहेत. सलूनचालक खबरदारी घेत असले तरी ग्राहकांनीही स्वत:ची खबरदारी घ्यावी म्हणून प्रशांत राज यांनी ही किट तयार केली आहे. या किटमध्ये कंगवा, अॅप्रॉन, हॅण्डग्लोव्हज, वस्तरा, नॅपिकन, दोन सॅनिटायजर पाऊच, मास्क आदी साहित्य असणार आहे.
हे सर्व साहित्य ‘युज अॅण्ड थ्रो’ म्हणजे फक्त एकदाच वापरायचे आहे. अॅप्रॉन ग्राहकाने घालायचा आहे, तर सॅनिटायजरचे एक पाऊच कटिंग करणाऱ्याला द्यायचे आहे. सलूनचालक खबरदारी घेत असले तरी आपणही आपली खबरदारी घेतली पाहिजे म्हणून ही किट तयार केल्याचे प्रशांत सांगतात. सात वस्तू असलेल्या या किटची किंमत ६० रुपये आहे. यातील अॅप्रॉन ते घरीच तयार करतात. बाकी वस्तू घाऊक बाजारातून घेऊन त्यांनी या किटमध्ये ठेवल्या आहेत. नफ्यापेक्षा ग्राहकांची सुरक्षितता हाच आपला यामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही किट प्रशांत राज यांच्याकडे उपलब्ध आहे. १६८, सुर्वेनगर जयताळा रोड येथे ते राहतात.

नागपूर, बाजार, महाराष्ट्र, राज्य, लाइफस्टाइल, हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED