पाकिस्तान आर्थिक गर्तेत!

आशिया खंडातील देशांना त्यातही भारताच्या शेजारी असलेल्या देशांना मदतीच्या नावाने कर्ज देऊन त्यांना आपले बटीक बनवण्याचे आणि आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करण्याचे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होताना दिसत आहे. भारताचे शेजारी असलेले श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या देशांमध्ये मदतीच्या नावाखाली हजारो कोटींची गुंतवणूक चीनने केली आहे. ही गुंतवणूकच या देशांच्या मुळावर आली आहे कारण मदतीच्या नावाखाली चीनने या देशांना हजारो कोटींचे कर्ज दिले आहे. या कर्जांमुळेच हे देश आर्थिक गर्तेत बुडाले आहेत. चीनने दिलेल्या कर्जांची हप्ते फेडण्यात हे देश अपयशी ठरत असल्याने या देशांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. चीनच्या नादी लागल्यानेच श्रीलंकेची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे. गेल्या वर्षांपासून श्रीलंका भीषण आर्थिक संकटात आहे. त्यातूनच तिथल्या लोकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि असंतोषाची परिणीती म्हणजे तेथील सत्ताबद्दल. अर्थात सत्ताबद्दल होऊनही श्रीलंकेची अर्थव्यवस्था सुधारलेली नाही. आता पाकिस्तनची अवस्थाही श्रीलंकेप्रमाणे होऊ लागली आहे.

श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानही चीनच्या नादी लागून आर्थिक दिवाळखोरीत पोहचला आहे. पाकिस्तानमध्येही आता सत्तांतर झाले असून इम्रान खान यांच्या जागेवर शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली आहे. पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाले असले तरी त्यांची अर्थव्यवस्था मात्र पूर्वीपेक्षा अधिक रसातळाला गेली आहे. त्यातून पाकिस्तानला बाहेर कसे काढावे असा प्रश्न पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना पडला आहे. आज पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागला आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदयाकडून मिळणारा अर्थपुरवठा खंडित झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने पाकिस्तानला नवीन कर्ज देण्यास नकार दिला आहे. चीन पाकिस्तानला थोडीबहुत आर्थिक मदत करत आहे ती ही कर्जाच्या रूपाने याचाच अर्थ चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तान दबत चालला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नवीन शक्कल लढवली असून त्यांनी आता पाकिस्तानमध्ये काही वस्तूंवर सुपर टॅक्स लावला आहे. इंधन, लोखंड, पोलाद, सिमेंट यासह अनेक महत्वाच्या वस्तूंवर पाकिस्तानने सुपर टॅक्स लावला आहे.

विशेष म्हणजे हा सुपर टॅक्स दहा टक्के इतका आहे. या सुपर टॅक्समुळे पाकिस्तानच्या तिजोरीत काही रक्कम जमा होईल असा विश्वास पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आहे. हा सुपर टॅक्स फक्त श्रीमंत आणि कंपन्यांवर लावला गेला आहे असे सरकार कडून सांगण्यात येत असले तरी त्याचा फटका ग्राहकांनाच बसणार आहे कारण कंपन्या हा टॅक्स ग्राहकांकढुनच वसूल करणार आहेत त्यामुळे आधीच गगनाला भिडलेली महागाई आणखी वाढणार आहे त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा यासाठी पाकिस्तानी नागरिक रस्त्यांवर उतरत आहे. सरकार मात्र या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा भडका लवकरच होईल असे जाणकार सांगत आहे कारण पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाचे दर तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. काही केल्या महागाई कमी होत नसल्याने सुपर टॅक्स सोबतच पाकिस्तानने काही विचित्र निर्णय घेतले आहेत. पाक सरकारने जनतेला चहा कमी पिण्याचे आव्हान केले आहे. कारण चहापत्ती आयात करणे पाक सरकारला कठीण झाले आहे.

पाकमधील सिंध राज्याच्या सरकारने विजेची बचत करण्यासाठी कराचीसह सर्व मोठ्या शहरातील शॉपिंग मॉल्स, बाजारपेठा व उपहारगृह रात्री ९ नंतर बंद करण्यास सांगितले आहे. रात्रीच्या विवाह समारंभावर देखील बंदी घातली आहे. पेट्रोल वाचवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची वेगळी सुट्टी देण्यात आली आहे. देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाक सरकारने असे निर्णय घेतले आहेत तरीही या निर्णयामुळे तेथील परिस्थिती सुधारेल याची सुतराम शक्यता नाही. या उपाययोजना म्हणजे दात कोरून पोट भरण्याचा प्रकार आहे. मुळात आपल्यावर ही परिस्थिती का ओढवली याचा विचार पाकिस्तानने करायला हवा. चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवणे, आंतरराष्ट्रीय समुदयाकडून, जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करण्याऐवजी दाहशतवाद्यांसाठी करणे. लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी दहशतवादी संघटनांना पाठबळ देणे असे प्रकार पाकने केले आहेत त्यामुळेच पाकिस्तान आज आर्थिक गर्तेत बुडाला आहे.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED