शिवसेनेच्या वाटेवर अण्णा द्रमुक!

31

महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंडाळी झाली असून मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची धोक्यात आणली आहे. आगामी दोन ते तीन दिवसात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडून नवीन सरकार स्थापन होऊ शकते कारण राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दक्षिणेतील तामिळनाडू मधील अण्णा द्रमुक या पक्षातही शिवसेनेप्रमाणेच दोन प्रमुख नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले असून दोन पैकी एक नेता आपल्या समर्थक आमदरांसह बंड करून पक्षात फूट पाडू शकतो. अण्णा द्रमुक हा तमिळनाडू मधील महत्वाचा पक्ष. या पक्षाच्या नेत्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या हयात असताना राष्ट्रीय राजकारणात देखील हा पक्ष महत्वाची भूमिका बजावीत असे. जयललिता हयात असताना त्यांची या पक्षावर एकहाती कमांड होती कारण त्या स्वतः खूप लोकप्रिय होत्या. त्यांनी मुख्यमंत्री असताना मध्यान भोजन योजना, अम्मा कॅन्टीन या सारख्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवल्या. पक्षाची कमान देखील त्यांनी उत्तमपणे सांभाळली.

त्यांच्या विरोधात बंड करण्याचे तर सोडाच पण पण त्यांच्याविरुद्ध ब्र शब्द काढण्याचीही हिम्मत कोणामध्ये नव्हती मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व कोणी करायचे यावरुन दोन गट पडले आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर मोदी सरकारच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या ई के पलानिस्वामी यांनी पक्षावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र मागील विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षाने ई के पलानिस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दारुण पराभव केला आणि एम के स्टॅलिन हे मुख्यमंत्री बनले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ई के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर पक्षातून उघड नाराजी व्यक्त होऊ लागली. नाराज आमदारांचे नेतृत्व पक्षातील जेष्ठ नेते ओ पनीरसेल्वम हे करत असून त्यांनी ई के पलानीस्वामी यांना उघड आव्हान दिले असून पक्ष वाचवण्यासाठी त्यांनी नेतृत्व सोडून द्यावे असे म्हटले आहे. पलानीस्वामी मात्र अण्णा द्रुमकचे नेतृत्व सोडायला तयार नाहीत त्यामुळे ते संधी मिळेल तिथे आपल्या आमदारांसह शक्तिप्रदर्शन करीत आहेत. गेल्या आठवड्यात पक्षाची कार्यकारणी व सर्वसाधारण परिषद या दोहोंची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कोणताही निर्णय होऊ नये म्हणून पनीरसेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

मात्र जेंव्हा प्रत्यक्ष बैठक सुरू झाली तेंव्हा पलानीस्वामी यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. बैठकीत गोंधळ घालत असलेल्या आपल्या समर्थकांना पलानीस्वामी यांनी रोखले नसल्याने पनीरसेल्वम समर्थकांनी जशास तसे उत्तर दिले. बैठकीनंतर पनीरसेल्वम हे रागारागाने बाहेर पडले व त्यांनी आपल्या आमदारांसह लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा केली याचाच अर्थ पनीरसेल्वन हे तामिळनाडूचे एकनाथ शिंदे बनू पाहत आहे. अर्थात हा संघर्ष लवकर शमेल असे वाटत नाही. शिवसेनेप्रमाणेच अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून फूट पडणार आहे. प्रादेशिक अस्मिता सांगून राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि अण्णा द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षात जे काही चालू आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वासाठी योग्य नाही हे मात्र नक्की. जर हे असेच चालू राहिले तर भविष्यात प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५