जबलपुर – चांदाफोर्ट सुपरफास्ट ट्रेनला नागभीड येथे थांबा द्या – संजय गजपुरे

77

🔸निवेदनाची दखल घेत खास. अशोक नेते यांचा रेल्वेमंत्रालयाकडे पाठपुरावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.29जून):- गाडी क्र. २२१७४ / २२१७३ जबलपुर – चांदाफोर्ट – जबलपुर त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन ३० जुन पासुन सुरु होत आहे . पण गोंदिया ते चांदाफोर्ट या २५२ किमी. मार्गावर या गाडीला एकही थांबा नसल्याने वाढता असंतोष असुन दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी नागभीड येथे या गाडीचा थांबा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन खास. अशोकभाऊ नेते यांना दिले आहे.

ही सुपरफास्ट गाडी आठवड्यातून प्रत्येक मंगळवार , गुरुवार व शुक्रवारी धावणार असुन जबलपुरहुन सकाळी ५.४५ वा. निघुन दु. १३.४५ वा. चांदाफोर्ट स्टेशनवर पोहोचणार आहे. तर दु. १४.५० ला चांदाफोर्टहुन निघुन रात्री २३.३५ ला जबलपुर स्टेशनवर पोहोचणार आहे. या गाडीला मदनमहल , नैनपुर , बालाघाट व गोंदिया असे चारच थांबे देण्यात आले आहेत . तर गोंदिया – नागभीड – चांदाफोर्ट या २५२ किमी. मार्गावर एकही थांबा देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरील प्रवाशांसाठी या गाडीचा लाभ होणार नसल्याने प्रचंड असंतोष असुन याची दखल घेत संजय गजपुरे यांनी खास. अशोकभाऊ नेते यांना निवेदन देत या मार्गावरील एकमेव जंक्शन असलेल्या नागभीड जंक्शन स्टेशनवर या गाडीचा थांबा देण्याची मागणी केली आहे.

यावेळी उपस्थित आरमोरीचे आमदार क्रिष्णाजी गजभे व गडचिरोली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष किसनजी नागदेवे यांनीही ही मागणी उचलून धरली . निवेदनाची दखल घेत खास. अशोकभाऊ नेते यांनी त्वरीत भ्रमणध्वनी वरुन रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक व रेल्वेमंत्रालयात संपर्क करुन आदिवासीबहुल व जंगलव्याप्त गडचिरोली लोकसभा क्षेत्रात एकही थांबा नसल्याने नाराजी व्यक्त करीत या मार्गावरील नागभीड व वडसा या महत्वपुर्ण स्टेशनवर या गाडीचा थांबा देण्याबाबत चर्चा केली . याबाबत सकारात्मक चर्चा झाली असुन लवकरच निर्णय अपेक्षित आहे. यासंदर्भात खास. नेते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मेलद्वारे पत्र पाठविले आहे .

गोंदिया – नागभीड – चांदाफोर्ट या मार्गावरील कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर ट्रेन अजुनही सुरु करण्यात न आल्याने दैनंदिन प्रवास करणारे चाकरमानी व प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड बसत असुन वेळेचाही अपव्यय होत आहे . याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ खास. अशोकभाऊ नेते यांच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांची भेट घेणार असुन पॅसेंजर ट्रेन सुरु करण्यासोबतच या मार्गावरुन धावणाऱ्या जलद ट्रेनचा थांबा नागभीड जं. व वडसा या स्टेशनवर मिळण्यासाठी व इतरही मागण्यांसाठी चर्चा करणार आहेत.