डॉ. मनमोहन सिंग, माजी प्रधानमंत्री यांचा वर्धा जिल्हा दौरा – एक अनुभव

34

✒️इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे(नि.)

चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी, वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊन एक महिनाही होत नाही तर संदेश आला की प्रधानमंत्री वर्धा जिल्यात 30 जूनला येणार आहेत. वर्ष 2006 ची गोष्ट आहे. मी रुजू झालो व लगेचच राज्यपाल येऊन गेले होते.

2. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील आत्महत्यांने सर्वत्र हळहळ, अस्वस्थता निर्माण झाली होती. या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले होते. म्हणून, वर्धा जिल्ह्यातील “वायफड” या गावी प्रधानमंत्री काही शेतकरी कुटुंबाना त्यांचे घरी जाऊन भेटतील व नंतर काही शेतकऱ्यांशी संवाद साधतील. शेतकरी आत्महत्या मागील कारणे कोणती, त्यावर उपाययोजना कोणत्या? हे प्रत्यक्ष जाणून घेणे, शेतकऱ्यांचे सांत्वन करणे, धीर आधार देणे, उपाययोजना जाहीर करणे हा या भेटीमागील उद्देश होता.

3. प्रधानमंत्री दौऱ्याची संपूर्ण व्यवस्था करणे, यशस्वी करणे ह्याची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते, म्हणून ती माझी होती. जेमतेम आठवडा हाताशी होता. प्रोटोकॉल प्रमाणे चेक लिस्ट,अधिकारी यांना कामाचे वाटप, जबाबदारी निश्चिती, रोजचा आढावा, माहिती संकलन, जिल्ह्याचे प्रश्न व समस्या, हेलिपॅडची तयारी वर्धा व वायफड दोन्ही ठिकाणी, स्थळांना रोजच्या भेटी, व्हेहिकल्स ची गरज, कारशेड, काटेकोरपणे, सर्व बारीकसारीक बाबींची पूर्तता, सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, राहण्याची-जेवणाची व्यवस्था, मीडिया, प्रोटोकॉल प्रमाणे राजकीय नेत्यांना निमंत्रण वगैरेचा आढावा रोज होत होता.

4. “वायफड” साठी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. हिकरे यांना नेमले होते. घरच्या भेटी साठी तीन शेतकरी कुटुंब निवडले, संवादासाठी 30 शेतकऱ्यांची यादी तयार झाली. सर्व समाज घटकातील शेतकरी, महिला शेतकरी सह, निवडले गेले. प्रतिनिधी स्वरूपात PM यांचेशी बोलण्याची संधी मिळावी अशाप्रकारे सर्व समावेशक यादी तयार केली. श्री हिकरे यांनी छान काम केले. मात्र, स्थानिक मंत्री यांना विचारून यादी अंतिम केली नाही म्हणून मंत्र्याने माझी तक्रार मुख्यमंत्री यांचेकडे, सेवाग्राम बापूकुटीस PM भेट देत असताना केली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माझेकडे पाहिले व हसले. विषय तेथेच थांबला. या मंत्र्याने, तत्पूर्वी आम्हास कधीही विचारणा केली नव्हती.

5. जिल्हा परिषद शाळेतील खोली मध्ये “प्रधानमंत्री सोबत शेतकरी संवाद” घेण्याचे ठरले. अतिशय साधेपणाने संवाद कार्यक्रम व्हावा, कसलाही बडेजाव नाही, शाळेत जशी व्यवस्था असेल तीच वापरावी, खुर्च्या टेबल सुद्धा. प्रधानमंत्री यांचे प्रधान सचिव यांनी फोन करून मला सांगितले की, प्रधानमंत्री फार साधे आहेत, त्यांना साधेपणा पसंद आहे, तेव्हा काळजी करू नका, असा धीर मला दिला, त्यामुळे माझा व टीमचा उत्साह वाढला. प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या दौरा होताः- 30 जून 2006 ला सकाळी 11 वाजता सेवाग्राम च्या हेलिपॕडवर आगमन, बापू कुटीस भेट, तेथेच लंच व थोडा आराम, दुपारी 3 वाजता वायफड येथे आगमन, व शेतकऱ्यांशी संवाद, असा दिवसभऱ्याचा कार्यक्रम होता. वायफड हे गाव सुद्धा PMO ने निश्चित करून आम्हास कळविले होते. कलेक्टर म्हणून मला विचारण्यात आले नव्हते तरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वायफड गाव भेटीवरून मला दोष देणे सुरू केले होते. नंतर त्यांना वास्तव समजले तेव्हा चूप झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री व विभागीय आयुक्त यांना सर्व घटनांची माहिती मी नियमितपणे देत होतो. त्यांच्या स्थळांना भेठी सुद्धा झाल्या होत्या. मात्र, काही निर्णय जिल्हाधिकारी यांनाच घ्यावे लागतात, ते आम्ही घेतले.

6. दिनांक 30 जून ला वायफड ला दौरा होता. जेथे संवाद कार्यक्रम ठेवला होता त्या जिल्हा परिषद शाळेच्या कम्पाऊंड भिंतीबाहेर झोपडी बांधून एक कुटुंब राहत होते. माझे चेकलिस्ट मध्ये ही झोपडी हटविणे नव्हते. झोपडी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधली होती. सुरक्षिततेचा मुद्धा घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून 28 जून ला ही झोपडी हटविण्यात आली होती. दिनांक 29 जूनच्या वृत्तपत्रात ठळक बातम्या की, प्रधानमंत्री दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात गरीब कुटुंब उद्ध्वस्त केले. खरं तर मी असा कोणताही आदेश दिला नव्हता. काही पत्रकार मला भेटले, प्रश्नांचा भडिमार केला. मी सांगितले, मी वायफडला जात आहे, योग्य निर्णय घेईन, गरीबावर अन्याय होणार नाही. मी वायफडला गेलो. पाहिले व आदेश दिला की झोपडी जिथे होती तिथेच चांगली आजच बांधून द्या. त्या कुटुंबास आश्वस्त केले. सर्व यंत्रणा कार्यरत होतीच. हेलिपॅडवर चार हेलीकॉप्टर उतरतील अशी व्यवस्था करायची होती. एकाची वाढ ऐनवेळी झाली होती. हेलिपॕड साईट वरून पुन्हा जिल्हा परिषद शाळेत आलो तेव्हा झोपडी पूर्णपणे व मजबूत बांधून झाली होती व कुटुंब तेथे राहायला सुद्धा गेले होते. नाहीतरी कम्पाऊंड भिंतीला पडदा बांधणार होतोच, तेव्हा तसाही झोपडीचा अडथळा नव्हताच, त्यामुळे हटविणे आवश्यक नव्हते. या घटनेमुळे मीडियाला मात्र मुद्दा मिळाला होता. अर्थात, पुन्हा बांधून दिल्यावर जिल्हा प्रशासनाचे कौतुकही झाले. या प्रसंगात, चूक माझी नव्हती तरी, नैतिक जबाबदारी तर स्वीकारावी लागलीच. असे अनेक प्रसंग जिल्ह्यात घडले. “आणखी, एक पाऊल” या माझ्या पुस्तकात काही घटना आल्यात, काही लिहायच्या राहून गेल्या.

7. “शेतकरी संवाद” हा मुक्त होता. फक्त वेळेचे बंधन ठेवले होते. 30 शेतकऱ्यांशी, महिला शेतकरी सह दीड तास प्रधानमंत्री यांच्यासोबत संवाद झाला. शेतकरी नेते विजय जावंधिया सुद्धा या 30 मध्ये होते. काहीही scripted नव्हते. कलेक्टर म्हणून माझ्या सक्त सूचना होत्या की शेतकरी यांना बोलू द्या, सांगू द्या, जे त्यांना सांगायचे आहे. वास्तव समजून घ्यायचे असेल तर जे पीडित आहेत, दुःखी आहेत, त्यांना त्यांचा प्रश्न मांडू दिला पाहिजे. वरिष्ठांच्या, किंवा CM0 यांच्या ही याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. आमचे विभागीय आयुक्त लिमये सर यांनी उचित मार्गदर्शन करून, आमच्यावर सगळं सोपवलं होतं. प्रधानमंत्री यांनी शांतपणे, आपुलकीने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वायफडच्या अलीकडेच डोरली नावाचे गाव आहे. येथील युवक जारोंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी, “डोरली गाव विकणे आहे” या नावाने रस्त्यावर निदर्शने केलीत. एकूणच, दौरा व्यवस्थित व यशस्वीपणे पार पडला. सर्व अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी नीटपणे पार पाडली. सायंकाळी 5 वाजता वायफड वरून PM यांचे हेलिकॉप्टर टेकअॉफ झाले. नागपूरला सुखरूप लॕन्ड झाले. आम्ही रिलॕक्स झालोत.

8. दुसऱ्या दिवशी 1 जुलै 2006 ला, विदर्भातील 11 ही जिल्हाधिकारी यांचे, राजभवन नागपूर येथे “भारत निर्माण” यावर सादरीकरण झाले. प्रधानमंत्री यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी यांचे सादरीकरण पाहिले, संवाद केला. मी सुद्धा सादरीकरण केले. भारत निर्माण कार्यक्रम म्हणजे (i) ग्रामीण रस्ते, (ii) ग्रामीण पाणीपुरवठा, (iii) ग्रामीण विद्युतीकरण, (iv) सर्वांसाठी शिक्षण, (v) ग्रामीण आरोग्यसेवा (vi) ग्रामीण टेलिफोन सेवा (vii) पडीक व वन जमीन, हे प्रमुख विषय यावर मी, 10 slides सादर करून जिल्ह्याची माहिती सादर केली व प्रधानमंत्री यांनी जिल्ह्यास भेट देऊन आमचे मनोबल वाढविले यासाठी आभार मानले. आता, कुठे आहे “भारत निर्माण कार्यक्रम “? हा कार्यक्रम सातत्याने पुढे घेऊन जाता आले असते तर ग्रामीण विकासाला गती प्राप्त झाली असती. चांगले जुने सोडून तेच कार्यक्रम नवीन नावाने येऊ लागले.

9. राजभवनच्या या बैठकी नंतर 3750 कोटीचे, तीन वर्षासाठी विदर्भ शेतकरी साठी, package ची घोषणा झाली. मी व्यक्तिशः प्रधानमंत्री यांचे साधेपणाने खूप प्रभावित झालो .आम्ही, शेतकरी हितासाठी तळमळीने व प्रामाणिकपणे काम केले. ज्या ज्या विभागावर package अमलबजावणीची प्राथमिक व संपूर्ण जबाबदारी होती, प्रयत्न करूनही, ते कुठे ना कुठे चुकले, कमी पडले, हे नाकारता येत नाही. कामाची व्याप्ती फार मोठी होती, विषय भावनिक होता, वरिष्ठांची अनावश्यक घाई होती. माझ्या अनुभवानुसार, शेतकरी आत्महत्या हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक, असा विविधांगी प्रश्न आहे. मी लिहिलेल्या “आणखी, एक पाऊल” या पुस्तकात “शेतकऱ्यांचा एकेक जीव जपण्यासाठी” या नावाने एक प्रकरण आहे. या दौऱ्यात मी खूप गोष्टी शिकलो. माझ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात, राष्ट्रपती कलाम सर, उपराष्ट्रपती शेखावत जी, येवून गेले. राष्ट्रपती कलाम सर यांचेशी, त्यांचे लंच सुरू असताना, 10-15 मिनिटे बोलता आले, खूप प्रेरणादायी चर्चा ठरली. जिल्हाधिकारी म्हणून तो privilege मिळाला.

_*माझे प्रशासकीय अनुभव सविस्तर वाचण्यासाठी स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले ‘आणखी एक पाऊल’ व ‘प्रशासनातले समाजशास्त्र’ ही पुस्तके वाचा. संपर्क – 9823338266*_

           ✒️ इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे (नि)
                       मो. 09923756900

                                                         दि:-30 जून 2020


🔹लेखक हे भारतीय सनदी सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व अन्य रचनात्मक विषयावर अभ्यास आहे.फुले आंबेडकरी चळवळीत सक्रीय सहभाग असतो.