बंडखोरांनो तुम्ही कोणत्या हिंदुत्वासाठी गेलात?

शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोर गटाद्वारे आम्ही हिंदुत्वासाठी सेनेतून फुटून भाजपसोबत जात असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. आपणसुद्धा काहीकाळ ईडीचे इडापिडास्त्र विसरून हे बंडखोर खरे बोलत असल्याचे मान्य करू पण हे आमदार तब्बल अडीच वर्षानंतर कोणत्या हिंदुत्वासाठी फुटले ह्याचा ह्याच बंडखोरांनी शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे.

सर्वात आधी ह्या बंडखोरांनी हे लक्षात घेतले पाहीजे की तुम्ही सेना वाढविण्यासाठी मदत केलीत यात शंका नाही परंतु ज्यांनी शिवसेना स्थापन केली, तीचा दरारा राज्यभरात निर्माण केला त्या स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या मुलाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन उघडपणे त्रास देऊ शकतात तर तुम्ही लोक किस खेत की मुली? हे आज समजून घेतलं तर तुमचा उद्या तुम्ही सुरक्षित करू शकता नाहीतर भविष्यात तुमचा कुणीच वाली नाही हे लक्षात घ्या. ज्यांचं बोट धरून राज्यात भाजप मोठी झाली त्याच सेनेला आज ती संपवायला निघाली आहे कारण ह्या भाजपला दुसरी कोणतीही स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष नकोय. त्यांना आपल्या हिंदू मतात वाटेकरू नकोय. अशी कोणती संघटना किंवा पक्ष असेल तर तो एकतर भाजपच्या हाताखाली असला पाहिजे नाही तर तो पक्ष किंवा संघटना किंवा व्यक्ती ही संपली पाहिजे. हे भाजप-आरएसएस च धोरण आहे. असे अनेक राज्यातील मित्रपक्ष भाजपने खिळखिळे केले आहेत. हे धोरण अंमलात आणण्यासाठी देशातील प्रत्येकच पक्षात आणि संघटनेत आरएसएसचे लोक छुपे अजेंडे घेऊन वावरत आहेत. फक्त पक्ष-संघटनाच नव्हे तर प्रशासनात देखील त्यांचे लोक आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. ३५ बंडखोर आमदार महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत सरकारला खबर नसते, महाविकास आघाडीचे सरकार असूनसुद्धा सरकारातील प्रत्येक मंत्री-आमदारावर आरोप करण्यासाठी किरीट सोमैय्या व फडनवीसांना सरकारी कागदपत्र वरचेवर उपलब्ध होतात यावरून प्रशासनात त्यांची पाळेमुळे किती घट्ट रोवल्या गेली आहेत हे लक्षात येईल.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजप आणि आरएसएसला हिंदुत्वाशी काहीएक घेणेदेणे नाही. त्यांना त्यांचे छुपे अजेंडे राबविण्यात जे लोक अडचण ठरतील त्यांना ते वापरून अगदी सहज बाजूला काढून फेकतील किंवा संपवतील. याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रवीण तोगडिया. आज जे बंडखोर फुटलेत त्यापैकी किमान ९०% आमदारांवर किंवा त्या आमदारांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई झाली आहे किंवा त्यांना इडीची नोटीस आली आहे. ही अशी कारवाई झालेल्यांपैकी किती आमदार मुस्लिम आहेत? किती ख्रिश्चन आहेत? कुणीच नाही. मग सगळे कोण? तर हिंदू. त्यातही अशे सगळे हिंदू जे आपल्याला ज्या पक्षाने सर्वकाही दिलं त्या पक्षाला हिंदुत्वासाठी लाथ मारू शकतात. मग तुमच्यासारख्या कट्टर हिंदूंवर केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीतील इडीतर्फे कारवाई का? २०१४ म्हणजे जेव्हापासून हे मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून ह्यांनी किती मुस्लिमांवर कारवाई केली? दाऊद इब्राहिम ला का भारतात परत आणल्या जात नाही? का त्याची पाळेमुळे खोदून त्याचं साम्राज्य धुळीस मिळविल्या जात नाही? वारंवार हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या ओवेसी वर का कारवाई होत नाही? केंद्र शासनाच्या सर्व कारवाया बघितल्या तर एकटे नवाब मलिक सोडून सर्व हिंदूंवर कारवाया, हिंदूंवरच धाडी, हिंदूंचीच संपत्ती जप्त, हिंदूंवरच दबाव निर्माण करून जबरदस्ती पक्षप्रवेश करवून घ्यायचा हे सगळं उघड उघड सुरू आहे तरीही हिंदूंच्या लक्षात येत नाही.

तुमच्याच पक्षाचे आमदार, खासदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील जयंती साहू, तमिलनाडुमध्ये डीएमके प्रमुख हिंदू नेते एम.के. स्टालिन यांची मुलगी सेंथमराय व पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी (हिंदूच) यांच्या घरी छापा मारला गेला. आताही उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी काय काय केलं जातंय हे बघतोच आहोत.आज संजय राऊत काही बोलले की लगेच दुसऱ्या दिवशी ईडीचा समन्स येतो यावरून तुमचे भविष्यात काय हाल होणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे मुस्लिमांच्या नावाने खडे फोडायचे, शिव्या द्यायच्या आणि कृती मात्र हिंदूविरोधी करायची असेच गेली ८ वर्षे सुरू आहे. इतर पक्षातील हिंदू नेते हे हिंदू नाहीत काय? या देशातील इतर पक्षातील हिंदू नेते संपवल्या जात आहेत हे तुमच्या कधी लक्षात येणार आहे?

काश्मिरातील हिंदू सातत्याने मारल्या जात आहेत. त्यांना हे सुरक्षा पुरवू शकत नाहीत म्हणून ते काश्मीर सोडत आहेत. राम मंदिर बांधायला पैसा जनतेतून जमा केला जातोय तर राम मंदिरासाठी घेण्यात आलेल्या जमीन खरेदीत हे लोक घोटाळा करतात. रामभक्तांच्या पैशात भ्रष्टाचार करतात, हे कोणते हिंदुत्व आहे? राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला देशातील प्रथम नागरिक राष्ट्रपतींना दलित आहेत म्हणून बोलावलं जात नाही. का ते हिंदू नाहीत? राममंदिराची जी समिती नेमल्या जाते त्यावर एक विशिष्ट जात सोडून इतर कोणत्याही जातीच्या सदस्यांना घेतले जात नाही, का? मंदिरासाठी दान सर्व जातींचे चालते, मंदिरासाठी इतर जातींचे बलिदान चालते पण जेव्हा कमिटी बनवायची तेव्हा इतर जाती चालत नाहीत, का? ते हिंदू नाहीत? कर्नाटकातील बेंगळुरू शहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर काही कर्नाटकी विकृतांनी शाई ओतली. परंतु ही घटना घडल्यानंतर एकाही भाजप-संघाच्या नेत्याला या घटनेचा साधा निषेध करावासा वाटला नाही? उलट कर्नाटकच्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणतात, “शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ही साधी गोष्ट आहे. त्यावर एव्हडा गदारोळ कशाला?” याविरुद्ध भाजपचा एकही नेता बोलत नाही? हे ह्यांचे हिंदुत्व. जर हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांच्या नावावर भाजपने मते मागितली त्या छत्रपती शिवरायांना हे लोक किंमत देत नाहीत तर तुम्ही कुठे लागता? ह्याचा विचार आताच करून ठेवा. उद्या जर ही तुमची योजना अपयशी ठरली तर तुम्ही सगळे बंडखोर कसे भ्रष्ट अन पैसेखाऊ आहात आणि तुमच्यासारखे व्यभिचारी आम्हाला नको होते असा प्रचार तुमच्याविरोधात भाजपकडूनच होणार आहे हे लक्षात ठेवा. जे उद्धव ठाकरेंचे नाही झाले ते आमचे काय होणार? असाच तुमचा प्रचार हे लोक करणार आहेत.

ज्या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांकडे तुम्ही गेला आहात न त्यांनीच म्हणजे भाजप-आरएसएसच्या नेत्यांनीच कारगिल युद्धाच्या वेळी शहिद जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार केला होता. ह्याच भाजप-आरएसएसचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीचा एकूण ५८००० (अठ्ठावन हजार कोटी) च्या घोटाळ्याचा आरोप आहे. जो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देशाच्या इतिहासात कधीच असे झाले नाही की भारतीय सरकारवर भारतीय जवानांना मारण्याचा आरोप लागला असेल. पण तो पुलावामा हल्ल्याच्या वेळी विरोधी पक्षाकडून लावण्यात आला. ह्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. ह्या हल्ल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी डीएसपी देवेंद्र सिंग याला आतंकवाद्यांसह कारमधून जात असताना जम्मूत अटक केली गेली. जम्मू पोलिसांकडून त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं गेलं आणि दिल्ली पोलिसांनी ९० दिवसात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र (चार्जशीट) दाखल न केल्याने त्याला जामीन देण्यात आला. ४० हिंदू जवान ज्यात मारले गेले त्या प्रकरणातील आरोपीला जमानत देणार ह्याचं हिंदुत्व प्रसंगी तुमचे बळी घ्यायलासुद्धा मागेपुढे बघणार नाही हे लक्षात असू द्या.

स्वातंत्र्यानंतर देशात हिंदूंची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती. मुघलांनी ६०० वर्षे तर इंग्रजांच्या १५० वर्ष या देशावर राज्य केल्यानंतर या देशातील हिंदूधर्म कधीच संकटात सापडला नाही. परंतु गेल्या ८ वर्षात कट्टर हिंदुत्ववादी सरकारने हिंदू धर्म संकटात आहे सांगून- सांगून सर्वार्थाने संपन्न असलेला हिंदू भिकेला लावलाय. भयंकर कोरोनाची साथ असतांना कुंभ मेळ्याची परवानगी या सरकारने दिली आणि हजारो हिंदूंचा हकनाक बळी गेला. शेकडोंनी बेवारस कुत्र्यांसारखी हिंदू साधू-संतांची प्रेते गंगा नदीतून वाहत आली. त्यांना नदी काठी पुरले जाते आणि ती पुरलेली प्रेते कुत्रे उकरून त्याचे लचके तोडताहेत अश्या क्लेशदायक प्रसंगाची तर मुघल काळातल्या इतिहासातही नोंद नाही. पालघरच्या साधूच्या हत्येला मविआ सरकारला दोष देतांना तुम्ही विसरता की त्यानंतर लगेचच म्हणजे २७ एप्रिल २०२० रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे मंदिरात झोपलेल्या दोन साधूंची मंदिरात घुसून हत्या केली गेली. त्यानंतर ११ मे २०२० रोजी उत्तर प्रदेशातील वृंदावनमधील साधु तमाल कृष्ण दास ह्यांच्यावर गुंडांनी मंदिरात घुसून जीवघेणा हल्ला केला गेला. ह्या आणि अशा देशातील असंख्य घटनांसाठी सुद्धा उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार आहे काय?

बोलावलं नसतांना आपले पंतप्रधान पाकिस्तान नवाज शरीफ ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जातात, तिथे बिर्याणी खातात, त्यांना भेटवस्तू देतात. इकडे शेतकऱ्यांचा पुरेपूर माल असतांना पाकिस्तानातून साखर आयात करतात. एक लस घेण्यासाठी एका एका हिंदूला जीवाचा कीती आटापिटा करावा लागलाय हे आपण सर्वांनी अनुभवलंय. तेव्हा आपल्या देशातील हिंदू मरत असतांना पाकिस्तानच्या मुस्लिमांना प्राधान्य दिलं गेलं. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ने तयार केलेले ४.५ कोटी लसीचे डोज भारतातील हिंदूंचे लसीकरण बाकी असतांना पाकिस्तानला पुरविले गेले. हे ह्यांचे हिंदुत्व. दवाखान्यांमध्ये इलाजच्या नावाखाली लाखो रुपयांनी हिंदू लुटला गेला तर स्मशानात सुद्धा २५ ते ७५ हजार रुपये प्रेताचे क्रियाकर्म करण्यासाठी घेतले जात होते. तेव्हा ह्यांचे हिंदुत्व झोपले होते का? पंतप्रधानांनी देशातील एक एक करून अनेक सरकारी संस्था खाजगीकरणाच्या नावाखाली विक्रीला काढल्यात आणि त्यात काम करणारे लाखो हिंदू टप्प्या-टप्प्याने बेरोजगार झाले. या सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला. या महागाईचा फटका कुणाला बसतोय? या देशातील २०% इतर धर्मियांना की ८०% हिंदूंना? आज पेट्रोल ११६ रुपये लिटर झालं ते काय फक्त मुस्लिमांसाठी? की ख्रिश्चनांसाठी? ह्यावेळी त्यांना हिंदू आठवत नाही.
कोरोना, महागाई, आर्थिक मंदी या सर्व संकटात सुद्धा संधी शोधत पंतप्रधानांनी पी.एम. केअर्स नावाने खाजगी फंड स्थापन करून तो सरकारी आहे असे सांगुन लोकांना फसवले. हा हिंदूंचाच पैसा हिंदूंच्याच कामी आला नाही त्यामुळे लाखो हिंदूंना अपुर्‍या वैद्यकिय सुविधांअभावी कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. याच जिवंत उदाहरण म्हणजे अमदाबादचे विजय रमेशभाई पारीख यांनी ट्विटर वर आपण पीएम केअर्स फंडात दिलेल्या २.५१ (दोन लाख एक्कावन हजार) लाखाच्या चेकचा फोटो टाकत सांगितले की, “माझ्या आईला बेड न मिळाल्यामुळे ती वारली. अडीच लाखाच दान माझ्या आईला एक बेड देऊ शकत नाही तर आता तुम्हीच मला सल्ला द्या की तिसर्‍या लाटेत बेड मिळविण्यासाठी मला किती दान द्यावं लागेल जेणेकरून मी माझ्या आप्तांना गमावणार नाही.”

युती सरकारच्या काळात भाजपकडून शिवसेनेला दिल्या जात असलेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीकरिता उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा देणारे शिंदे आज त्याच भाजपसोबत जाण्याची भाषा करत आहेत. शिंदे-केसरकर सारखे बोटांवर मोजता येणारे लोक पुन्हा महत्प्रयासाने आमदार होतीलही परंतु बाकीच्यांचे काय? महाराष्ट्राच वाटोळं करण्याची जी संधी तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांना देताय त्यासाठी इतिहासात तुमचं नाव काळ्या अक्षरात लिहिल्या जाणार हे नक्की.अनैसर्गिक आघाडी म्हणून मविआ सरकारला हिणवणाऱ्यांना फडणवीस आणि अजितदादा यांचा पहाटेचा शपथविधी कसा नैसर्गिक वाटतो? आतंकवादी व पाकिस्तानबद्दल सहानुभूती असलेल्या महेबूबा मुफ्ती सोबत भाजपची काश्मीरमध्ये झालेली युती कशी नैसर्गिक वाटते? हे आश्चर्य आहे. देशाच्या इतिहासात सर्वात जास्त सैनिक या मागील ८ वर्षात सीमेवर मारले गेलेत व मारले जात आहेत. त्यांपैकी बहुतांश सैनिक हे हिंदूच आहेत. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश हे सर्व हिंदूच इथे मारले गेले. ब्रिजगोपाल हरकिसन लोया नावाच्या सीबीआयच्या स्पेशल कोर्टाच्या हिंदू न्यायाधीशांची हत्या होते. या प्रकरणातील भक्कम पुरावे उपलब्ध असूनसुद्धा त्याचा तपास लागत नाही. बंगाल निवडणुकीवेळी ममता बॅनर्जी ज्या हिंदूच आहेत त्यांना स्त्री असून अगदी खालच्या थराला जाऊन बदनाम केलं गेलं, महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या आणि पुराच्या अतिशय कठीण काळात उद्धव ठाकरेंसारख्या हिंदू नेत्याला मदत करण्याच सोडून शक्य होईल तिथून त्रास दिला गेला. जो आजतागायत सुरूच आहे. देशातील हिंदू अपुर्‍या आरोग्य सुविधा, महागाई, बेरोजगारी, उपासमार, अस्मानी-सुलतानी संकटं याने मरतोय, त्याचे जगण्याचे वांदे झालेत आणि या देशातील हिंदूंचे हे वांदे ज्यांच्यामुळे झालेत त्याच हिंदुत्ववाद्यांच्या दावणीला तुम्ही स्वतःहून स्वतः ला बांधून घेतलत ह्याला इडापिडा म्हणावं की ईडिपीडा?

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED