अशी पण ‘लोकशाही’….!

31

काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. रात्रीच्या साडेनऊ वाजता ते जनतेशी दूरदर्शनवरून संवाद साधत होते. मनावर ओझे होते; हे स्पष्ट जाणवते होते.पण भविष्याची चिंता कुठेच नव्हती. उलट उद्यापासून शिवसेना भवनात जाऊन पुन्हा नव्याने काम करू, असे ते आत्मविश्वासाने सांगत होते. बोलण्यात कोणावर राग दिसावा इतके जोशात पण ते नव्हते. फक्त आपल्याच लोकांनी दगा दिल्याची खंत ते बोलून दाखवत होते. एक मतदार म्हणून मला इतकेच कळाले की महाविकास आघाडी सरकार पडले. ज्यांना दुःख व्हायचे होते त्यांना झाले, ज्यांना पेढे वाटायचे त्यांनी ते वाटलेही. मुळात दुःख कशाचे आणि आनंद कशाचा मला हेच कळत नव्हते. दुःख- चांगले चाललेले सरकार पाडून राज्याची व्यवस्थित घडी उगाच मोडली म्हणून करावे की महाविकास आघाडी पडली म्हणून करावे. आनंद साजरा महाविकास आघाडी पाडली म्हणून करावा की वर्षातून दोनदा सरकार बदलले म्हणून राक्षसी उन्माद साजरा करावा? हे ज्याच्या त्याच्या परीने सुख दुःखाचा विळखा होता.

मुळात अब्राहम लिंकन यांची लोकशाही राहिली कुठे आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली लोकशाही कुठे आहे. लोकशाहीचा पाळणा म्हणे, तो झुलवायचा सोडून द्या- जो येतो तो दोर कापतो. जो येतो तो आपल्या सोयीने हलवतो नाहीतर गुणाने बसतो. लोकशाही राज्यशास्त्राच्या अभ्यासापुरतीच आहे. राज्यशास्त्र अभ्यासून जेव्हा विद्यार्थी राजकारणात उतरेल तेव्हा कळेल, पुस्तकी लोकशाही व माणसातील लोकशाही यात जमीन अस्मानचा फरक आहे. पुस्तके लिहणारी माणसेच, आणि त्यात लिहलेले बदलणारीही माणसेच.

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणतात. का? तर प्रेमानंतर लग्न व्हावे व सुखी संसार सुरू व्हावा म्हणूनच न! म्हणजे तुम्ही अरेंज मॅरेज करा,किंवा प्रेमविवाह, नाहीतर पळून जाऊन मंदिरात लग्न करा! म्हणजे एकरूप होण्यासाठी वाट्टेल ते करा. पण, नन्तर चाललेले लग्न मोडून उद्धवस्त होऊ नका. तुमच्यासोबत मुलांची पण आबाळ होईल. प्रत्येक पक्षाला जोड-तोड करण्याचा 2019 मध्ये चान्स होता. पर्याय पण खूप होते. काही शासकीय, कायदेशीर तर काही बेकायदेशीर, नैतिकता सोडून! अवलंब करायचा होता तेव्हा! जो शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केला. पण, अडीच वर्षे नीट चालल्यावर काड्या करणे जरुरी होते का? यात हितसाधूंचा काय फायदा असेल ते असेल, पण महाराष्ट्रातील जनतेचा नक्कीच नाही. म्हणजे जनता ही निख्खळ पोरकट व वेडी वाटली यांना. एक लोकशाही असते, आपण निवडून देऊन आपले लोकप्रतिनिधी विधिमंडळात पाठवणे व दुसरी असते याच लोकप्रतिनिधींची खाजगी, उठलं-सुटलं की म्हणेल तिकडे पळणे. आपण कशासाठी निवडून दिले यांना? तर आमच्या मतदारसंघाचा विकास पाहायला. हे करतायत काय, तर स्वतःचाच विकास.

पैसा असेल, भीती असेल नाहीतर इतर वैयक्तिक स्वार्थ किंवा जनतेच्या विकासासाठी म्हणे! हे पळाले. पळाले तर तिथंही टिकतील याचा भरोसा नाही. यांची धाव सुरूच राहील. पण, पुन्हा जर आपणच यांना निवडून देत असू तर ते विकासासाठी मतदान नव्हते तर ते यांना पळण्यासाठी दिलेली परवानगीच समजा!

मीडिया पण ‘भूकम्प’ म्हणून चटणी मीठ लावून सांगत आहे. भूकम्प शब्द यांना इतका सोपा वाटुच कसा शकतो. भूकम्प तर तुमच्या बोलघेवडेपणाचा आला आहे. मतदारांच्या भावनेशी तुम्हाला काय देणे घेणे आहे. तुम्ही तुमची फक्त टी.आर.पी. सांभाळा; आणि हे सर्व आमच्यासाठी करत आहात, हे दाखवत असाल तर कृपया तुम्ही आम्हाला मूर्ख समजून स्वतः मूर्ख आहोत हे तरी सांगू नको. अनाथ होणे म्हणजे माय बाप नसणे एवढेच नसते. पूर्ण नातीचं गायब होणे असते. तुम्ही ते नाते गायब करायला निघाले, म्हणजे तुम्ही तर मुळावर घात करणारेच की! आता नवीन सरकारचा जल्लोष करा, आणि तो तुम्हीच साजरा करा. लाळ घोटा नाहीतर…काहीपण करा! पण आमच्यासाठी ‘बेधडक’ तेवढे म्हणू नका!

मला कोणाचा कळवळा आलेला नाही. कोणाचाच नाही. फक्त वाईट याचे वाटते की, संधीसाधू असण्याची पण एक हद्द असते. जी हद्द सम्पते हे दाखवते. यांची हद्द जवळ आली की, हे पुढे पुढे त्या हद्दीला ढकलून आपण किती बेशरम आहोत हे सांगतात. आम्हाला तर काही हद्दच नाही. ते पुन्हा येणार, मत मागणार, काही पैसे वाटणार, काही अरेरावी करणार, काही विकासाच्या बाता करून गोड बोलणार! आपली मतदार म्हणून हद्द संपणार, आणि बेहद होऊन मत देऊन मोकळे होणार! यात विचार केला का कुठे? मी मत कोणाला करतोय आणि का करतोय? नाहीच! पण त्यांनी नक्कीच विचार केला, की हे मूर्ख आहेत आणि यांना आपण कधीही मूर्ख बनवू शकतो.

माणूस विश्वासाच्या व निष्ठेच्या लायक प्राणी नाही; हे पुन्हा एकदा यानिमित्ताने कळाले. सरकार 5 वर्ष झाले की संपुष्टात येते आणि मध्येच पायउतार झाले की कोसळते. पण असे जेव्हा मध्येच कोसळते तेव्हा कोणी हसत असतील पण लोकशाही फक्त रडते.

काय माणसे रे तुम्ही

आदिमानव बरी तुमच्या परी

शिस्त होती म्हणून माणसे झाली

बेशिस्त वागून व बेईमानी करून मतांशी आमच्या

तुमच्यापेक्षा जनावरे बरी

ही म्हणण्याची वेळ आली….

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206