कृतज्ञता हा मानवी जीवनाचा पाया : मा. श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू)

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.2जुलै):-“शिक्षक हा विद्यार्थांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करत असतो. शिक्षक, विद्यार्थी ही संस्थेची समृद्धी आहे. महाविद्यालयात सेवा करताना साहित्यिक प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा शिक्षक व विद्यार्थांना झाला. त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली.” असे गौरवोद्गार श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) यांनी काढले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील जेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, ‘क्रांतिबा’ नियतकालिकाचे संपादक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ आण्णा केंगार यांच्या ‘सेवानिवृत्ती सत्कार व शुभेच्छा’ समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) पुढे म्हणाले की, “सेवानिवृत्ती समारंभात हितचिंतकांनी कुटुंबीयांनी आढावा घ्यावा. या भावनेने सेवानिवृत्ती कार्यक्रम होत असतात. सेवा करण्याऱ्या सेवकांचे जीवन स्थिर व्हावे. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा जीवनपट उलगडून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा हा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ होत आहे.”सत्कारमूर्ती प्रा. डॉ. रघुनाथ केंगार सत्कारास उत्तर देताना म्हणाले की,”आनंद आणि विरह अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ निर्माण झाला आहे. 41 वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापन सेवेत आनंद मिळाला. स्वतःच्या ज्ञानावर आणि बुद्धीवर जीवन जगता आले. आनंद हा पैशावर अवलंबून नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. गरिबीत असताना पैशाची स्वप्ने पडत होती. अडचणींच्या वेळी अनेकांनी मदत केली. आदरणीय पी. डी. पाटील साहेब, संस्थेचे चेअरमन मा. नामदार श्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू), सर्व प्राचार्य, सर्व स्टाफ आणि कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतकांप्रती मी कृतज्ञता, आभार व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या संस्थेत मला सेवा करण्याचे भाग्य मिळाले.”

महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी प्रस्ताविक सादर करताना म्हटले की, “प्रा. डॉ. केंगार सर हे विनयशील विद्यार्थीप्रिय प्रामाणिक शिक्षक होते. यशस्वी कुटुंबप्रमुख, यशस्वी प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्राबाहेर विविध क्षेत्रात ते मार्गदर्शन करत होते.”या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात मा. श्री प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. आर. आर. थोरात, प्रा. आर. ए. कांबळे,ग्रंथपाल श्री एम. एस. पाटील, श्री हणमंत कराळे, प्रा. प्रभाकर पवार, साहित्यिक श्री सुरेशकुमार शिंगटे, उद्योजक श्री शशिकांत पवार, श्री माणिक बनकर, श्री नवनाथ जावीर, शास्त्रज्ञ प्रा. महेश हेगडे, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी सरांच्या आठवणी सांगत मनोगते व्यक्त केली. डॉ. केंगार सरांनी पुढील आयुष्यात मूळ धरून ओलावा धरून ठेवावा व आत्मचरित्र लिहावे अशी भावना व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमास माजी प्राचार्य श्री बी. एन. कालेकर, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. गोफणे, सहसमन्वयक प्रा. एस. व्ही. जोशी, प्रा. संजय सरगडे (सातारा), शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे प्रा. तवर सर, श्री ढेरे सर , श्री ज्ञानेश्वर तरडे, प्रा. लक्ष्मण साठे (कोल्हापूर), प्रा. संतोष बोंगाळे तसेच माण, खटाव, आटपाडी तालुक्यातील व नरवणे गावातील अनेक हितचिंतक व नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. एस. आर. सरोदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. सौ. एस. आर. भादुले यांनी सूत्रसंचालन केले. आणि प्रा. आर. पी. पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
या सत्कार समारंभास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी विद्यार्थिनी तसेच नातेवाईक, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED