मानवी विकासासाठी मोहीम उभारावी.अभ्यासकांनी भूतकाळ स्मरावा, समझदारांनी वर्तमान जाणावा आणि आकलन झालेल्यांनी भविष्य ओळखावे, परंतु कोणतीही व्यक्ती ही भूतकाळाच्या अनुभवातून वर्तमानाला स्वीकारीत नाही, तसेच अनुभवाची करकचून गाठ बांधून आपण स्वतः आणि दुसऱ्यांना सुध्दा भविष्यासंबंधी दिशाभूल करून ठेवत असते. जगात वेगवेगळ्या देशात कमी जास्त प्रमाणात फरक असला तरी सर्व ठिकाणी परिणाम मात्र एकच आहे. प्रत्येक व्यक्ती शिक्षण, प्रशिक्षण आणि संस्कारातून व्यवहारी आणि जिवन जगण्यालायक बनत असते. भूतकाळातून वर्तमानात येणे म्हणजे विकास नव्हे आणि भविष्याचे पुन्हा वर्तमानात रूपांतर झालेले असतांना सुध्दा मानव समाज प्रश्न आणि समस्यांनी वेढलेला आहे. भौतिक विकास अल्पसंख्य लोकांच्या उपभोगाचा असून बहुसंख्य लोकांवर हा त्यांचा अन्यायच ठरतो. अल्पसंख्यांकांप्रमाणे बहुसंख्य हे मानवच असल्याने त्यांच्या विकासातील अडसर ‘अमानवीयता’ हा असून भौतिक दृष्ट्या प्रत्येक मानवाचा ‘समान’ विकास व्हावा हा प्रश्न अल्पसंख्यांकांसमोर आहे. अल्पसंख्यांकांचा भौतिक विकास होऊन, त्यांनी आपल्या सोयीचा भूतकाळ घेऊन आणि वर्तमानकाळातील कर्म ठरवून भविष्याकडे वाटचाल करण्याचा निर्णायक अधिकार स्वतःकडेच राखून मानवते विरोधात त्यांनी हा ‘द्रोह’ च केला आहे. यातून पृथ्वीवरील मानवी सभ्यतेचा विकास नाही, तर विध्वंस होणे निश्चित आहे. दिव्यपुरुष,महापुरुष,संत-थोर पुरुष यांचे कर्तृत्व आणि त्यांचे ‘आदेशवचन’ हे मानवी विकासाचे विचार काळाच्या ओघात अल्पसंख्यांकांनीं क्रियाहीन करावे आणि बहुसंख्यांकांनी आपल्या दुर्बलतेमुळे पोटाची समस्या घेऊन त्याचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरावे, ही अवस्था काळ-दर-काळ सतत कायम राहिलेली आहे.

असे किती वर्तमानकाळाचे भूतकाळ बनले आणि भविष्यकाळाचे वर्तमानकाळ बनले,तरी वंशीय,वर्गीय व आर्थिक,सामाजिक समता स्थापित होऊ शकली नाही. विचारी आदेशवचनांना घेऊन बहुजनांनी मोहीमच उघडली नाही. या विरोधात जे काही प्रयत्न झाले, ते केवळ वर्तमानात वेदना होतात म्हणून ज्या ‘हालचाली’ झाल्या त्या मनुष्य हानीला कारण ठरून सुध्दा भूतकाळात जमा झाल्या. भविष्यकाळात शिरलेल्या वर्तमानकाळाने त्या हालचालींना स्मरले, परंतु जाणीव शून्यतेतून त्यांना भविष्य ओळखता आले नाही,म्हणून बहुजनांचा आजचा वर्तमान अगतिक बनून व दिशाहीन होऊन तो त्यात केवळ जगत आलेला आहे. याच्या भविष्याचे कोणतेही स्वप्न आणि तसे ध्येय दिसत नाही.

आज वर्तमानात सुध्दा बहुजनांनी अल्पसंख्यांकां विरोधात केवळ लढाई सदृश्य स्थिती बनवून ठेवली आहे. अशी लढाई कधी होणेच नाही, कारण सबळाकडे दुर्बळाला शरण जावेच लागते. दुर्बळ तर सबळांचा गुलाम ठरतो. ही दुर्बळता घालविण्यासाठी लोकतांत्रिक बहाली म्हणजे आर्थिक,सामाजिक पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी बहुजनांना आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उपयोग करता येऊ शकला नाही. तो कसा बरे अल्पसंख्यांकांसोबत लढाई करू शकणार आहे. बहुजन केवळ आर्थिक, सामाजिक दृष्ट्या दुर्बळ नाही तर आपल्या आंतरिक विभाजनामुळे दुर्बळ आहे, जी दुर्बळता आपल्या आर्थिक, सामाजिक समस्यांविरोधात लढा देण्यास बहुजनांना उभे राहू देणार नाही. जाती आणि पोटजातींनी विभाजित असलेला बहुजन समाज आपली जात सोडत नाही याची कारणे शोधून त्यावर काम व्हावे. अल्पसंख्यांकांना त्यांच्या ध्येयात यशप्राप्ती मिळवून देऊन आणि ती टिकवून ठेवण्यासाठी दिलेली मोकळीक ही बहुसंख्यांकांची लढाई सदृश्य ‘हालचाल’ भूतकाळात जमा होईल, चळवळीने याची दक्षता घेतली पाहिजे. एकेकाळी चाललेल्या ‘सामाजिक सुधार बनाम राजकीय सुधार’ या विचार संघर्षात ‘राजकीय सुधार’ या मताचा झालेला विजय जो आज सुध्दा टिकून आहे. सैद्धांतिक दृष्ट्या प्रथम ‘राजकीय सुधार’ हा विचार समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अयोग्य असूनही लागू होतो आणि आजपर्यंत त्याचे परिणाम हे प्रत्येक काळातील बहुजन, दलित हालचालींना भूतकाळात जमा करतात आणि आजही करीत आहेत.

बहुजनांचा आणि सामाजिक, आर्थिक दृष्ट्या अति मागास असलेल्या दलित, आदिवासी अल्पसंख्यांकांचा आजचा संघर्ष सुध्दा समाज सुधारणेचा नसून राजकीय सुधाराचाच आहे, जो स्पष्ट झालेला आहे. आपल्यातील त्रुट्या आणि दोष तसेच कायम ठेवून राजकीय सत्ता प्राप्त करता येणे शक्य नाही.राजकीय सिद्धांताचा हा दोष अजून किती काळ चळवळीने पुढे ढकलत न्यावा ? आणि आपल्या चळवळी किंवा हालचाली किती काळ भूतकाळात जमा होऊ द्याव्या ? ही समज वर्तमानातील लोकांना यावी. पुढे उभी राहणारी चळवळ भूतकाळात जमा निश्चित होणार नाही, याची वंचित समाजाला कोण ग्वाही देणार ? वर्तमानकाळ हा सुधारणांचा काळ आहे, भूतकाळ हा सुधारणांचा आधार आहे आणि भविष्यकाळ हा सुधारणांतून झालेल्या विकासाचा काळ आहे. आजच्या चळवळीने होऊन गेलेल्या महापुरुषांच्या आदेश वचनांचा उपयोग करून दिवस सुरक्षित करावा, या काळसूत्रानुसार कोणत्याही सार्वजनिक मोहिमेने मार्गक्रमण करणे भाग आहे, अन्यथा यश शक्य नाही.

मोहिमेचे यश हे समाजाचे सर्वांगीण परिवर्तन आहे म्हणून सामाजिक सुधार व्हावा ही आवश्यकता मोहिमेचा विषय असावा. चळवळ म्हणून अन्य कोणत्याही मनुष्य वर्गाविरोधात तो लढा नसावा. सामाजिक सुधार हा सामाजिक प्रबोधनापासून नक्कीच सुरू होतो परंतु तो तेथेच खोळंबून राहू नये. समाजाला दिलेल्या सामाजिक शिक्षणातून आणि केलेल्या संस्कारातून येणाऱ्या प्रतिक्रियेच्या रूपाने समाज आचरण करणार नाही. त्यासाठी संत, महापुरुषांच्या शिकवणीचा मागील शेकडो वर्षाचा भूतकाळ याला साक्षी आहे. जो विचार आचाराचा सुधार बुध्दांनी समाज मनावर केला, आजपर्यंत समाज त्यानुसार आचरण करण्यास असमर्थ ठरला आहे,देशभरातील संतांनी आपले जीवन समाजाला शिकवण देण्यात नष्ट केले, अन्य सर्व महापुरुषांनी समाज सुधारणेची मोहीम राबविली, बुध्दांना पुनर्जीवित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या जीवन आणि कर्तृत्वातून समाजाने धडे घेतले, परंतु ते आजपर्यंत गिरविले नाही. ही शोकांतिका आमची आजची आहे. समाजाला बिकट परिस्थितीची जाणीव होऊनही त्यांनी प्रतिपादिलेल्या सिद्धांतांचे अनुसरण न करता, त्याचे गुणगान आणि भक्ती करून बाबासाहेबांना पूजण्याचेच परिणामशून्य काम झाले आहे. भूतकाळ समाजाने स्मरण करावा, त्यानुसार स्वतःला घडवावे आणि त्या विचार-आचरणातून त्या सिद्धांत, तत्वांच्या अनुसरणातून आपला विकास करून घ्यावा असे आजच्या मोहिमेत काम करणाऱ्या सामाजिक शिक्षक तथा कार्यकर्त्यांनी समजून आणि समाजाला तसे समजावून प्रश्न सुटणार नाही. केवळ भूतकाळाचा आधार हे संपूर्ण उत्तर नाही, तो तर वर्तमानकाळाचा अर्थात सुधाराचा आधार आहे. भूतकाळावर पूर्ण विसंबून राहून वर्तमान काळ अगतिक बनविणे म्हणजे पुढील विकास पूर्ण थांबून भविष्यकाळ अंधारमय आणि जीवन केवळ संघर्षमय बणून जाणे होय.

समाज जीवनच एक कर्तव्यपूर्ण व्यवस्था आहे, म्हणूनच समान अधिकाराची व्यवस्था इथे आवश्यक ठरते. मोहिमे मधील कार्यकर्त्याने शिकवण,प्रबोधन करून समाजाला बहाल अधिकारची सुरक्षा करणे भाग आहे, अन्यथा समाजाला कर्तव्य सांगून अधिकारपूर्ती होत नसेल, तर कर्तव्याच्या अनुसरणातून परावृत्त होऊन तो विखंडीत होईल. खंडप्राय समाजामध्ये व्यक्तीचे राजकीय व्यक्तिगत स्वातंत्र्य धोक्यात येते आणि ते हिरावल्या जाते. समाज अखंडित कसा राहील या निमित्तच समाजप्रबोधन आणि त्यांना शिकवण दिली जात असते. समाजमन शिकवणीनुसार आचरण करणार नाही, कारण त्यांच्या संयुक्तिक इच्छा आणि आवश्यकता पूर्ती झाली नाही. अशी इच्छा व आवश्यकता पूर्ती करणे हे त्या अधिकाराची सुरक्षा करणे होय. प्रत्येक समाजाने मोहीम उभी केली पाहिजे, जेणेकरून राजकीय शक्तीला कसोटीवर ठेवणे शक्य होईल. अशाप्रकारे प्रत्येक समाज आपापल्या स्तरावर विकसित करण्यासाठी मोहीम राबवित असतांना हा मार्ग मानवी सभ्यतेला सुरक्षित करून मानवी विकासाकडे नेणारा आहे, जे मानवाचे मानवी ध्येय आहे. मानवी सभ्यता ही मानव विकासातून जाईल तेंव्हा पृथ्वीवरून विध्वंसन प्रवृत्ती नष्ट होऊन, सकारात्मक जीवन निर्माण आणि सुरक्षा पध्दतीची स्थापना होईल, हे मानवी सभ्यतेच्या जिवंत प्रक्रियेतून जीवश्रुष्टीमध्ये प्रघात पडणार आहे. असा मानवी भविष्यकाळ घडण्यासाठी प्रथम आजचा वर्तमानकाळच महत्वपूर्ण भूमिका राबविणार, तेंव्हाच अशा भविष्याकडे मानवी सभ्यता जाऊ शकते. म्हणून वर्तमानातील समाज अखंड राहण्यासाठी दुष्प्रवृत्तीपासून सतप्रवृत्तीची सुरक्षा, दूषप्रवृत्तीचे निर्दालन आणि सतप्रवृत्तीचे निर्माण व वाढ करावी लागेल, असे कर्म करण्यासाठी मोहीम राबवावी लागेल, कोणत्याही मानवी वर्गांविरोधात लढा उभारावा लागणार नाही. आज जगात मानवाने मानवांविरोधात लढे उभारलेले आहेत, जे केवळ विध्वंसच घडवून आणणारे आहेत. त्यामधून मानव हितकारक, विकासक कोणतीही निर्मिती होणे नाही. मानवाने मानवाला नष्ट करू नये, तर त्याने वाईट प्रवृत्तीला नष्ट करावे.

मानव मानवाचा शत्रू नाही, तर त्याचा शत्रू त्याच्या मनातील विकार आहेत. सजीवांच्या जीवन सुरक्षेसाठी मोहीम उभारावी आणि मानवी शत्रू नष्ट करण्यासाठी आत्मलढा उभारावा. मनुष्य वृत्ती ही कमी-जास्त प्रमाणात विकारयुक्तच असते, अशा विकारांविरोधात हा आत्मलढा असावा. या ध्येयावर उभारलेल्या मोहीम भूतकाळाच्या मुलाधाराला अनुसरूनच यशस्वी होऊ शकतात. अशा सुत्रबद्धतेतूनच मानव मानवी ध्येय गाठू शकणार आहे. अन्य अजून कोणता मार्ग आहे काय ?

धन्यवाद……

✒️विजय बी.गवई(म्हारळ,शहाड,तालुका कल्याण,जिल्हा-ठाणे.
संस्थापक/अध्यक्ष-सार्वभौम समाज समता संस्कार (S4).
८८०५४२६४९३

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED