दगडालाही जेव्हा पाझर फुटतो…!

32

कोविड-19 च्या काळात, आमच्या 1 ते 4 प्राथमिक शाळेसाठी एक दिवस आड करून शाळेत जाण्याचे नियोजन ठरले होते. नियोजनाप्रमाणे मला आज शाळेत जायचे होते. शाळेत जात असताना मला 2-4 गावे ही माझ्या रस्त्यामध्ये लागतात. त्यातल्या काही गावांच्या दरम्यान दर एक साल आड रस्ता दुरुस्तीचे काम कुठे न कुठे चालू असतेच! असेच सध्या महाताळा ते चक्री ( दोन्ही जिल्हा नांदेडमधील गावे!) रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. रस्ता दुरुस्ती म्हटलं की, डांबर, दगड, गीटी, खडक आशा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव हा आलाच! त्यामुळे तुमच्या-आमच्यासाठी सबंध महाराष्ट्रामध्ये काही हे नवीन नाही. परंतु, यातली एक जुनीच गोष्ट जी मी नेहमी पहायचा, ती नव्याने,नव्या दृष्टीने माझ्यासमोर येत होती. ती बाब म्हणजे या रस्त्यांसाठी लागणारे दगड फोडणाऱ्या लोकांची जमात. होय! इथे मुद्दाम मी ‘जमात’ हा शब्दप्रयोग वापरला, कारण ‘जात’ म्हणलो असतो तर वाद झाला असता; आणि मला काही इतक्यात तशा वादात पडायची अजिबात इच्छा नाही. असो!

मी या दोन गावामध्ये होणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला आलेली ही जमात काही नव्याने पाहत नव्हतोच! संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असताना सुरुवातीला जर कोणी तिथे कामाचे बस्तान मांडत असेल तर ही लोकं असतात. ज्यांना त्या पूर्ण रस्त्यांच्या कामामध्ये कोणी तसे क्रेडिट देत असेल की नाही! हे मलाही माहीत नाही. हे लोक त्या रस्त्याचा पाया असून खरा पाया तयार करण्याचे काम करतात. यांच्याकडे जाता-येता कोणी पाहत असेल की नाही? रस्त्यावर मेंढ्या जशा मध्येच येतात,आणि आपण कसेबसे रस्ता क्रॉस करून पुढे जातो, तसेच या लोकांनाही बघले जाते. रोज दिसतात, आपण रोज पाहून न पाहिल्यासारखे करतो, आणि आपल्या कामाला पुढे निघतो.

मी पण काही तुमच्यापेक्षा वेगळा अजिबातच नाही बर! तुमच्यासारखाच एक! आता जरा लिहायला लागलो, तेव्हापासून जराशा संवेदना माझ्या जागृत झाल्यात इतकेच! दगड फोडणाऱ्यांवर मी एक कविता लिहली आहे, जी फेसबुकवर आपल्याला नक्कीच वाचायला मिळेल. इतक्यात या जमातीबद्धल सहानुभूती वाटण्याचे कारण हेच की, मी माझ्या शाळेला जात असताना हे लोक सकाळ,दुपार, संध्याकाळ दगड फोडत असताना पाहायचो. ज्यात 10 वर्षांच्या पोरांपासून ते 60 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत कामे करणारी माणसे मी पाहिली. ज्यात स्त्रियांना वेगळे मापदंड निश्चितच नव्हते. इथे खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता अनुभवायला मिळाली.

नेमका उन्हाळ्याचा पारा सुरू झाला होता. जो आम्ही नाजूक म्हणवल्या गेलेल्या माझ्या शरीराला जरा लवकरच जाणवू लागला. ज्या दिवशी मी शाळेकडे निघालो होतो, नेमके त्याच दिवशी मी हेल्मेट सोबत न्यायला विसरलो होतो. मला हेल्मेट वापरायची सवय असल्यामुळे मी त्या हेल्मेटच्या आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बाबीपेक्षा, त्या हेल्मेटने धूर,वारा,ऊन व पाऊस यापासून संरक्षण याला मी जास्त महत्त्व द्यायचा. आजही तसेच महत्त्व मी हेल्मेटला देतो. आता माझी हेल्मेटवाणी सम्पवतो, व आपल्या मुख्य विषयाकडे वळतो.

आज मी हेल्मेट न आणल्यामुळे मला उन्हाचा पारा जास्तच जाणवत होता. डोळ्यांची जळजळ व डोक्याची फडफड ( म्हणजे माझी डोकेदुखी) सुरू झाली होती. बेचैन होऊन, उन्हाळी लागल्याचा आभास, वरती तहान लागून तोंड कोरडे पडायला सुरुवात झाली. दुपारनंतरचा तो दिवस माझा अगदी वाईट गेला. त्या दिवशी मी दगड फोडणाऱ्या या लोकांकडे तितकेसे निरखून पाहिले नाही. पण नन्तरच्या दिवशी सकाळी पुन्हा माझ्या धोपट मार्गाने येत असताना, मी दगड फोडणाऱ्या या बांधवांकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिले. आता हे लक्ष काही भारताच्या पंतप्रधान किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नव्हते. एका सामान्य माणसाचे होते. ज्या सामान्य माणसाच्या लक्ष दिले किंवा न दिल्याने त्या दगड फोडणाऱ्या बांधवांच्या जीवनात कसलाही फरक पडणार नव्हता. तरीसुद्धा मी त्यांकडे एका सहानुभूतीच्या भावनेने पाहिले. हे असे पहाण्यामागचे एकमेव कारण म्हणजे मला आदल्या दिवशी लागलेले ऊन होय. बाकी नवीन काही नाही.

अंगावर 1000 रुपये मीटरचे शर्ट व तितक्याच पैशाची पॅन्ट असताना, आणि केवळ 25 मिनिटांच्या रस्त्यामध्ये मला ऊन लागू शकते; तर अंगावरती अर्धे कपडे, आणि ते पण मामुली, कोणीतर बनियान घातली असेल; काही उघडेपण होते. यांना ऊन लागत नसेल का? केवळ उन्हात उभे राहायचे नाही किंवा गाडी घेऊन इकडून तिकडे फिरायचे पण नाही. तर तिथे उभे राहून कठोर मेहनत घ्यायची होती. मग यांना उन्हाच्या झळा लागत नसतील का? हे मला न राहवून विचार यायला लागले.

मी तिसऱ्या दिवशी त्यातल्या एका व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. त्यांच्या समस्या एक माणूस म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीकडून मला कळले की ट्रॅक्टरची दगडाची एक ट्रिप फोडण्यासाठी त्यांना 500 रुपये मिळतात. या 500 रूपयासाठी एक तर उन्हात मरमर मरा! कधी दगड उडून अंगाला इजा पोहचवू शकतो, डोळ्यातपण तो दगड शिरू शकतो. याची कुठलीही पर्वा न करता ही माणसे जीवावर उदार होऊन काम करत होती. मी जेव्हा त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला ऊन लागत नाही का? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले, सुरुवातीला लहान असताना ऊन लागायचे, पण जेव्हा पोटाची भूक ही उन्हाच्या झळेपेक्षा मोठी झळ आहे, हे कळायला लागले तेव्हापासून ऊन लागणेच बंद झाले.

त्या कामाच्या ठिकाणी एक 6 महिन्याचे तान्हे बाळ झाडाला बांधलेल्या झोक्यात झोपलेले मी पाहिले, त्याची आई तिच्या रोजच्याच कामात व्यस्त होती. उन्हाच्या काहिलीने घाम येऊन तोंड कोरडे पडलेले मी पाहिले. इथे तर या माऊलीचे दूध आटण्याची वेळ आली होती, मग ती तिच्या पिल्याला कुठले दूध पाजत असेल, हे सारखे मनात घोळू लागले. मनात एक विचारपण आला की शासनाने अशी काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून या बाळालातरी मोठेपणी हे काम करण्याची वेळ येऊ नये.

दगडाला पाझर फुटण्याचा मला इथे पहिल्यांदाच प्रत्यय आला. जो दगड इतरासाठी रडून स्वतः फुटायला तयार होता. फुटलेल्या प्रत्येक दगडाचा आकार असा एकसारखा होता, जणू काय एखादया मशीनमधून बारीक केलेले असावेत. काम करणाऱ्या हातांचा चपळपणा सुद्धा असा जसे काय मशीन एका विशिष्ट मोशनमध्ये सुरू असावी.

शेवटी, त्या माणसांच्या काम करण्याच्या सचोटीकडे पाहून मी भारावून गेलो, आणि एक नवीन ऊर्जा घेऊन माझ्या कामाच्या गावाला सरकलो!

धन्यवाद!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:-8806721206)