कमी खर्चात उत्तम शेती करण्याचा संदेश वसंतरावांनी महाराष्ट्राला दिला : खा. धानोरकर

31

🔹चंद्रपूर मध्ये कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर, (दि.1जुलै): महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाच्यामार्फत पाण्याची उपलब्धता करून कमी खर्चात उत्तम शेती करण्याचा संदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांनी दिला त्यासाठी स्वतः नियोजन करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी वस्तुपाठ घालून दिला. शेती, शेतकरी आणि शेतीवर आधारित व्यवस्था समजून घेणारे ते महाराष्ट्राचे थोर सुपुत्र होते, अशा शब्दात चंद्रपूरचे खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज पासून कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचेही जाहीर केले.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीला आठवण करीत त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी दरवर्षी एक जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. तसेच 1 ते 7 जुलै या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन गाव बैठका, शिवार भेटी व शेतीशाळेचे आयोजन करून कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जलसंधारणाचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले होत्या. तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एस. किरवे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे कार्यक्रम समन्वयक नागदेवते, आदींसह कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवरांनी यांच्या प्रतिमेला हारअर्पण केले. त्यानंतर आपल्या उद्घाटनीय भाषणामध्ये खासदार धानोरकर यांनी वसंतरावांच्या माध्यमातून राज्याच्या कृषी विकासाला चालना मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वसंतराव नाईक यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून कमी पाण्यामध्ये उत्तम पद्धतीचे पीक घेण्याची शिकवण महाराष्ट्राला दिली आहे. दुष्काळाशी सामना करताना त्यांनी कृषी क्षेत्रात अतिशय मोलाची भूमिका पार पाडली आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षावरही विरोधकांवररही प्रेम कसे करावे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला असल्याचे सांगितले. वसंतराव नाईक यांच्या संदर्भात सांगितल्या जाणाऱ्या त्यांच्या तत्कालीन राजकीय व्यासपीठावर विरोधात असणाऱ्या जेष्ठनेते नानासाहेब गोरे, मृणाल गोरे, भाऊ जांबुवंतराव धोटे, जेष्ठ पत्रकार प्र.के अत्रे यांच्यासोबत त्यांची वैचारिक मतभिन्नता असतानाही व्यक्तिगत पातळीवर जोपासल्या गेलेल्या संबंधाचे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी शेती करणे ही एक कला असून त्यासाठी अक्कलहुशारीने प्रयोग करणाऱ्याला शेतीतून भरपूर मोबदला मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या नावावर इंचभर जमीन नाही असे भूमिहीन प्रयोगशील शेतकरी इतरांच्या जमिनी घेऊन त्यावर लक्षावधी रुपये आपल्या मेहनतीने कमावतात त्यामुळे शेती कोणीही करून चालणार नाही, तर त्यामध्ये डोकं लावून काम करणाऱ्याला यश मिळेल हे पक्के लक्षात घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी चंद्रपूर जिल्ह्याने कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती शेतकऱ्यांपुढे मांडली.जलसंधारणाची अनेक कामे जिल्ह्यात झाली असून काही प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कृषी सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रयोगशीलता कायम ठेवून जिल्ह्यात आवश्यकतेनुसार पीक पॅटर्न राबवण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना आजारामुळे सध्या सर्वच आर्थिक आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. या परिस्थितीत देशाची निकड बघून व आवश्यकता बघून पीक पॅटर्न राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करताना त्यांनी बसल्या जाग्यावर लाभार्थी शोधण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या प्रयोगाची नोंद घेतली गेली पाहिजे. त्यांना खरोखर गरज आहेत, अशा लोकांच्या हातात योजना पडल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी सर्वात लक्षणीय ठरले ते चोरगाव येथील पांडुरंग कोकोडे या प्रगतिशील शेतकऱ्यांचे संबोधन. केवळ काही एकर शेतीमध्ये शेततळ्याच्या माध्यमातून विदेशी भाज्या फुलविण्याचे कसब त्यांनी दाखवले आहे. सोबतीलाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसायातूनही एक सधन शेतकरी म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे उदाहरण ‍ स्वकर्तृत्‍वातून उभे केले. त्यांचे यावेळी केलेले मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना वस्तुपाठ घालून देणारे होते.

तत्पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत जिल्हाभरात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या उपायोजना व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गणेश मादेवार यांनी केले