कार्यकर्त्याचे कौशल्य ओळखून नेता बनविणारे रमेश रंगारी साहेब!

27

शिक्षणात आरक्षणाची सवलत घेऊन उच्चशिक्षित झालेले लोक नोकरीत सुद्धा आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतात. पण आरक्षणाच्या कोणत्याही रस्तावरील आंदोलनात भाग घेत नाही. शासकीय नोकरी मिळाली की आपले घर व कुटुंबात रममाण होतात. स्वतःच्या जन्मभूमीत तालुक्यात जिल्ह्यात कोणत्याही संस्था संघटना मध्ये उच्चशिक्षित म्हणून सहभागी होत नाहीत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात होणाऱ्या संघर्षमय लढ्यात भाग घेत नाही. असे उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे लोक तेव्हा ही होते. त्याचा अनुभव स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता म्हणूनच ते खेदाने म्हणत होते की “मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया”. त्याला काही लोक अपवाद आणि लक्षवेधी असतात. म्हणूनच एका इंजिनियरचा वयाच्या ८० व्या वर्षी कृतज्ञता ठेऊन भव्य सत्कार होत आहे.

आयु. रमेश रंगारी इलेक्ट्रिकल इंजिनिअर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये अभियंता होते. शासकीय नोकरी करून कुुुटुंबात रममाण होण्यापेक्षा समाजावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य सनदशीर मार्गाने संघर्ष करून आपण समाजाला काही देणे लागतो ही वृत्ती जोपासणारा नेता म्हणजेच रमेश रंगारी आहेत. आजकाल असे नेते मिळणे दुर्मिळ झाले असतांना आपल्या सेवेत कसूर न करता कामगार, कर्मचारी हितासाठी लढणारा मागासवर्गीय कामगारांची चळवळ मजबूत पणे उभी करण्यासाठी सतत विविध वृत्तपत्रात वैचारिक लेख लिहणारे आणि त्याचे पुस्तक तयार करून कामगार कर्मचाऱ्यांच्या हातात देऊन संघटनेत किर्याशील पदाधिकारी बनविणारे. त्यासाठी तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावणारे नेते म्हणजे रमेश रंगारी हे मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांना प्रेरणा देणारे कुशल नेतृत्व ८० वर्षाचे झाले. म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा विशेष सत्कार सोहळा ९ जुलै २०२२ ला इलाईट ऑडीटोरीम, क्रिस्टल पॉईनट, (स्टार बझार समोर) न्यू लिंक रोड,अंधेरी (वेस्ट) मुंबई येथे आयोजित केला आहे. त्यात विविध राज्यातील संघटना, युनियनचे कामगार, कर्मचारी व पदाधिकारी मोठया उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सत्कार करणार आहेत. एका इंजिनियरचा तो भव्य सत्कार नाही तर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विद्यार्थी दशेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता असलेल्या नेत्यांचा तो सत्कार आहे. विद्यार्थी दशेपासून ते निवृत्त होण्या पर्यंत आणि सेवानिवृत्त झाल्या नंतर ही २० वर्ष कामगार, कर्मचाऱ्यांच्या संघटनेला कामगारांच्या राष्ट्रीय ट्रेड युनियनला वैचारिक मार्गदर्शन करणे अद्याप ही सुरु आहे. कार्यकर्त्याचे कौशल्य ओळखून नेता बनविणारे रमेश रंगारी साहेब.

कामगार कर्मचारी हा त्याच्या कामांत शिक्षणामुळे किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रशिक्षण घेतल्यामुळे नोकरी वर असतो. त्यात त्याच्या कामाचा तो तज्ञ असू शकतो. पण कार्यकर्ता असण्यासाठी त्यांच्या अंगी वेगळे कौशल्य असले पाहिजे. ते त्यांने योग्य संधी मिळताच दाखवून दिले पाहिजे. तेव्हाच त्याला संघटना,युनियन मध्ये पद व नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाते. कोणते ही कौशल्य नसल्यास त्यांच्या कडे कोणीच फारसं लक्ष देत नाही. त्यासाठी कामगार, कर्मचारी यांच्यातील कौशल्याचे नोंद घेणारा जाणकार नेता असावा लागतो. असा नेता मी रमेश रंगारी इंजिनियर यांच्या रूपाने पाहिला.

मी असंघटीत नाका कामगारांच्या समस्या वर नियमितपणे लिहत होतो. आझाद मैदानात जन आंदोलन करीत होत. त्यावर प्रतिक्रिया लिहून प्रतिसाद देणारी एकच व्यक्ती होती.आणि तीच व्यक्ती आझाद मैदानांत जनांदोलन करीत असतांना त्या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी येणारी व्यक्ती म्हणजेच माननीय रमेश रंगारी साहेब होत. त्यावेळी ते आझाद मैदानात येत होते आणि आमची चौकशी करीत होते. कोणत्या विचारधारेशी संबधित आहात कोणत्या राष्ट्रीय ट्रेड युनियनशी संलग्नता आहे. यांची माहिती विचारत होते. त्यावेळी आम्ही आंबेडकरवादी आहेत असेच सांगत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळी वरील भाषणे वाचली काय? अशा प्रश्नावर आमची बोलती बंद होत होती. कामगार चळवळीतील भाषणे वाचा अभ्यास करा असे सांगितल्यामुळे माझ्यात बदल झाला. यातूनच रमेश रंगारी साहेब यांच्याशी माझे वैचारिक नातं जुळले. मी कन्फेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन ऑफ इंडिया (C.F.T.U.I) अंतर राष्ट्रीय ट्रेड युनियन सोबत जोडल्या गेलो होत. पण रमेश रंगारी यांनी सांगितल्यामुळे आदरणीय जे.एस.पाटील साहेब यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वार्षिक संमेलनात, कामगार मेळाव्यात मला असंघटीत कामगारांच्या समस्या आणि उपाय यावर बोलण्याची संधी दिली म्हणूनच मी आज स्वतंत्र मजदूर युनियन सोबत जोडला गेलो आहे. यांचे शंभर टक्के श्रेय हे रमेश रंगारी व पाटील साहेब यांना द्यावे लागेल. म्हणूनच मी लिहतो कार्यकर्त्याचे कौशल्य ओळखून नेता बनविणारे आदरणीय रमेश रंगारी साहेब.
आदरणीय रमेश रंगारी हे निवळ कामगार नेते नव्हते तर ते क्रांतिकारी आंबेडकरवादी विचारांचे प्रभावी लेखकही होते. त्यांच्या लेखनीची झलक त्यांनी अनेक दैनिकातून दाखवून दिली आहे.

आज वयोमानाने ते लिहत नसले तरी त्यांनी लिहलेले महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतिकारी विचारांचे पुस्तके आज ही कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांनी देशव्यापी स्वतंत्र विद्युत एम्लाईज फेडरेशन मध्ये व देशव्यापी स्वतंत्र मजदूर युनियनच्या यशस्वी वाटचालीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. संघटनेचे मुखपत्र ऊर्जा श्रमिक हे यांच्या संपादनाखाली सुरु झाले होते. ते आज ही सुरु आहे. हे मुखपत्र नसते तर २२ पतसंस्था, कल्याण निधी, प्रशिक्षण संस्था, क्रांती ऊर्जा सार्वजनिक वाचनालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र उभे झाले नसते. संघटनेने इंजिनियर रमेश रंगारी यांची १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. जे.एस.पाटील यांच्या सोबत रमेश रंगारी साहेबांनी यांची मोलाची साथ दिली होती. त्याची जाणीव फक्त आदरणीय जे. एस.पाटील साहेबांसारखे नेतेच ठेऊ शकतात. वयाच्या ८० व्या वर्षी सत्कार करून आर्थिक मदत देण्याची दानत आज पर्यंत आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही नेत्यांनी दाखविली नाही.

नाही तर प्रशासनात अनेक अधिकारी झाले सेवानिवृत्तीनंतर त्यांची कोणीच दखल घेत नाही. एका इंजिनियरचे कार्यक्षेत्र डिपार्टमेंट, डिव्हिजन आणि कॅबिन असते. त्यात ते बायको मूल प्लॉट बांगला व गाडी यांच्यातच निवृत्त होतात. आपण पाहत असाल काही लक्षवेधी उच्चशिक्षित अधिकारी निवृत्तीनंतर समाज, संस्था आणि संघटना मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करतात.जे स्वताचे निर्माण करीत नाही. पण आहे त्यात घुसखोरी करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं आंबेडकर भवन होत्याचे नव्हते होते.परंतु जे एस पाटिल,रमेश रंगारी, नरेंद्र जारोंडे, संजय घोडके, प्रेमानंद मोर्या, मिलिंद बनसोडे,सुदाम हनवते, जीवन गायकवाड,ज्ञानेश्वर खैरे,राजु गायकवाड,गणेश उके,वाय डी मेश्राम, मिलिंद भगत सारखे अनेक इंजिनियर आणि अधिकारी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन जिवंत ठेऊन मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघटित करीत आहेत.

आदरणीय रमेश रंगारी यांच्या वैचारिक मांडणी आणि दूरदृष्टीमुळेच मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही महात्मा ज्योतिबा फुले, रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा घेऊन एक मान्यताप्राप्त संघटना झाली आहे. मागासवर्गीय कामगार कर्मचारी विचाराने एकत्र आल्यास काय होऊ शकते त्यांचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार कर्मचारी संघटना आहे. ही बेचाळीस वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, त्यांनीच देशव्यापी विद्युत फेडरेशन २००० ला बनविले.त्यांच्याच प्रयत्नाने स्वतंत्र मजदूर युनियन २००३ ला नव्याने स्थापना झाली.आज महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना सोबत घेवून स्वतंत्र मजदूर युनियन देशभरात बावीस राज्यात आणि सतरा क्षेत्रात आदरणीय जे एस पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली लक्षवेधी वाटचाल करीत आहे. यात आदरणीय रमेश रंगारी साहेब यांचे मौलिक योगदान आहे. त्यांनी लावलेले रोपटे आज देशातील मागासवर्गीय कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गाला वृटवृक्षाची सावली देत आहे आणि संघटीत होऊन लढण्याची प्रेरणा देत आहे.

नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्राची वास्तू येणाऱ्या युवा पिढीतील कामगारांना शंभर टक्के प्रेरणा देणारे असणार आहे.कारण ते ही प्रेरणा नगरात आहे. म्हणूनच मी नेहमी लिहतो आणि बोलतो कि कार्यकर्त्याचे कौशल ओळखून नेता बनविणारे रंगारी साहेब. वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कुशल कर्माने त्यांच्या आरोग्यावर मात केली आहे. ते वृद्धापकाळाने शरीराने थकलेले वाटत असले तरी ते क्रांतिकारी विचारांची चिंगारी आज ही पेटविण्याची वैचारिक ताकद त्यांच्या शब्दात आहे. ते शब्दच क्रांती करू शकतात. त्यांचे आरोग्य निरोगी राहो हीच तथागता चरणी त्रिवार वंदना करतो. त्यांना सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबईअध्यक्ष – स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-9920403859