मनाच्या धुंदीत लहरीत येना! लोकप्रिय गाण्याने रसिक झाले धुंद! दामोदर नाट्यगृहात संगीतकार देवदत्त साबळे रजनी ठरली अविस्मरणीय!

25

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.६जुलै):-महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासने परेलच्या दामोदर नाट्यगृहात आयोजित केलेल्या लोकोत्सवात काल संगीतकार देवदत्त साबळे रंजनी ठरली अविस्मरणीय! “मनाच्या धुंदीत लहरीत येना ” आणि “ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु” या संगीतकार देवदत्त साबळे यांनी ४२ वर्षांपूर्वी अजरामर केलेल्या गाण्याचे गायक गौरव दांडेकर यांनी सादरीकरण केले आणि या अविट गोडिच्या गाण्यावर उपस्थित रसिक अक्षरशःधुंद झाले!

संगीत कलेत प्राथमिक धडे मला माझे वडील महाराष्ट्राचे दिग्गज शाहीर साबळे यांची गाणी ऐकताना मिळाले, ही वस्तूस्थिती असली तरी उत्तम संगितकार होण्यासाठी केवळ वडिलोपार्जित वारसा असून चालत नाही तर त्यासाठी साधना,तपश्चर्या आणि जिद्द महत्वाची असते,असे उद्गार संगीतकार देवदत्त साबळे यांनी येथे आपल्या मुलाखतीत सांगितले.

या प्रसंगी मराठी कलाभ्यासक डॉक्टर जितेंद्र जाधव यांनी संगीतकार देवदत्त साबळे यांची दिलखुलास मुलाखत घेतली आणि त्यांच्या ५० वर्षाच्या सांगितीक प्रवासाला उजाळा दिला.

रसिकांना नेमके काय हवे याचा वेध घेत, त्यांना समजेल अशा साध्या रचनेतून आपण संगीत लोकांपर्यंत नेले आहे, हेच आपल्या यशाचे गमक आहे,असे संगीतकार देवदत्त साबळे यांनी येथे प्रकट मुलाखत देताना सांगितले.ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी अवघ्या दोन दिवसात गाणी लिहून दिली आणि त्यावेळचे ज्येष्ठ संगीतकार खळेकाका यांनी रेडिओवर या गाण्याच्या प्रसारणाला संधी प्राप्त करुन दिली. त्या मुळे संगीतातील माझी मेहनत मला दाखवून देता आली आहे,अशी आठवण देवदत्त साबळे यांनी करुन दिली. या प्रसंगी संगीतकार आणि लोकमहोत्सवाचे संगीत संयोजक मनोहर गोलांबरे उपस्थित होते.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षांपासून संगीतकार म्हणून सुरू केलेला प्रवास,महाराष्ट्राची लोकधारा पासून कॅसेट द्वारे लोकमानसावर उमटवलेला ठसा, स्वतः गाणी लिहितांना जाहिरात क्षेत्रात दाखवलेली कर्तबगारीही मुलाखतीतून स्पष्ट केली.देवदत्त साबळे यांनी संगीतात लावणी, कोळी गीते,भक्ती गिते,प्रेम गीते आदी क्षेत्रातील लिलया पेलून नेलेली किमया मुलाखती द्वारे पटवून दिली.रसिक हे सारे ऐकून अवाक होऊन गेले.

समीर लाड,अनया सावंत, ब्रह्मानंदा पाटणकर, यांनी देवदत्त साबळे यांची सुस्वर आवाजात गाणी सादर केली.तर अन्य वादकांनी आपली कामगिरी उत्तम बजाऊन महोत्सवात चांगलाच रंग भरला.कार्यकारी विश्वस्त संतोष परब यांच्या सहयोगातून आणि सायली परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष किसन जाधव, विश्वस्त अशोक सावंत, डॉ. सुनिल हळुरकर, बाळा खोपडे, राजू शेरवाडे संगितकार महादेव खैरमोडे, डॉ. किशोर खुशाले आदिंची उपस्थित लक्षणीय ठरली.