सुरजागडच्या माध्यमातून स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा

68

🔸प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे – महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.7जुलै):-उद्योग विरहीत जिल्हा म्हणून राज्याच्या नकाशावर गडचिरोलीचा नाव आहे. मात्र, सुरजागड लोहखाणीच्या माध्यमातून हे नाव मिटविता येऊ शकते. त्याकरिता सुरजागड प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून येथील युवकांनाच रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासोबतच याच प्रकल्पाच्या माध्यमातून कोनसरी येथे प्रकल्प उभारण्याची तयारी सदर कंपनीने दर्शविली होती. कोनसरी प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.सदर प्रकल्पासाठी जिल्ह्यातील अनेकांचा विरोध पत्करून तत्कालीन सरकारने सुरजागड प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली, नव्हे तर ते सुरूही करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची तयारी संबंधीत कंपनीने दर्शविली होती.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक आदिवाशी व स्थानिक युवकांच्या हातात ट्रक च्या चाव्या दिल्या व स्थानिक लोकांना रोजगार देणार असे आश्वासन दिले होते, मात्र कोणत्या लोकांना रोजगार मिळाला अद्याप त्याचा खुलासा झालेला नाही ना त्या ट्रक कुठे चालतांना दिसल्या. त्यामुळे स्थानिकांना मध्ये याबाबतीत मोठा रोष असून या प्रकल्पात किती स्थानिक किती लोकांना रोजगार देण्यात आला याचा खुलासा सरकारने व संबंधित लाँयन्ड मेटल कंपनीने करावा.

याबरोबरच कच्चा मालावर प्रक्रीया करण्यासाठी कोनसरी येथे प्रकल्प उभारण्यात येणार असून तिथेही स्थानिकांना रोजगार देण्याची तयारीही कंपनीने दाखविली होती. मात्र, अजूनपर्यंत कोनसरी येथे प्रकल्प उभारला नाही. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तत्काळ हे प्रकल्प सुरू करावे अशी मागणी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.मागील काही दिवसांपासून सुरजागड येथे उत्खनन सुरू आहे. उत्खनन केलेला कच्चा माल राज्याच्या इतर जिल्ह्यात व राज्याबाहेरही वाहतूक केल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील प्रकल्प सुरळीत सुरू होऊन तेथील युवकांना रोजगार मिळत आहे. मात्र, स्थानिकांना प्रतिक्षाच करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोनसरी येथील प्रकल्प त्वरीत उभारण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सुरजागडमधून कच्चा माल बाहेर जिल्ह्यात वाहून नेल्या जात असल्यामुळे येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहन उभे केले जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे. याचा परिणाम अपघात वाढले आहे. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार कोनसरी येथील प्रकल्प उभे करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अन्यथा काँग्रेसच्यावतीने मोठे जणआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.