राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका 18 ऑगस्टला

34

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

बीड(दि.9जुलै):-इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला निवडणुका होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यावर होणाऱ्या या निवडुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे. अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गिरीश महाजन, छगन भुजबळ,जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या मतदारसंघात निवडणुका होत आहेत. त्यामुळे या नेत्यांना आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

एकीकडे नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, अशी सर्वपक्षीय भूमिका असताना राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतीसाठी येत्या 18 ऑगस्टला निवडणुका घेण्याची घोषणा राज्य निवडणुक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी शुक्रवारी जाहीर केली. राज्यात सत्तांतर होताच पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी मागणी सर्वच नेते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी पुढील सुनावणी होणार असताना राज्य निवडणुक आयोगाने 96 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय 17 जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली. कमी पाऊस असलेल्या भागांमध्ये पावसाळ्यात निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

निवडणुका कोणत्या जिल्ह्यांमध्ये.!
——————-

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना,बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा. बारामती,भुसावळ, बार्शी,जालना, बीड, उस्मानाबाद, या अ वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे.

या पालिकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.29 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 ऑगस्ट आहे.18 ऑगस्टला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे.19 ऑगस्टला मतमोजणी आहे.