आता बांगड्या कुणाला पाठवणार?

7

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(2 जुलै):-केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधी पक्षात असताना तत्कालीन मंत्र्यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आता त्या कुणाला बांगड्या पाठवणार? हा भंडार त्यांनी स्वपक्षीय नेत्यांसाठी ठेवला आहे का,’अशा शब्दांत शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीविरुद्ध शिवसेनेने केलेल्या आंदोलनात ते बोलत होते.

पेट्रोल व डिझेलची भाववाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने तुमाने यांच्या नेतृत्वात अमरावती रोडवरील वाडी चौकात आंदोलन केले. ‘बहोत हो गयी मन की बात, नही जीना अब महंगाई के साथ’, ‘करोना प्रादुर्भाव वाढत असताना पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेचे खिसे कापणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो’, असे लिहिलेले फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी, पेट्रोलियम भाववाढ मागे घ्या, आदी घोषणा दिल्या.
जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असताना देशात उत्पादनशुल्क आकारून प्रचंड वाढ करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भाववाढीमुळे मालवाहतूक व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ सुरू झाली. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारने तातडीने भाववाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृपाल तुमाने यांनी दिला.
लॉकडाउनदरम्यान हळूहळू लहान-मोठे उद्योग सुरू करण्यात येत आहेत. स्थानिकांना रोजगारासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, केंद्राकडे जीएसटी, पंतप्रधान आवास योजनेसह अन्य निधी प्रलंबित आहे. केंद्राने विविध योजनांचा निधी तातडीने द्यावा, त्यातून विकासकामांना चालना मिळेल, असेही कृपाल तुमाने म्हणाले. आंदोलनात उपजिल्हा प्रमुख दिलीप माथनकर, विधानसभा संघटक रवी जोडागळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल काकडे, संजय अनासने, नंदू कन्हेरे, संतोष केचे, मधु मणके, रूपेश झाडे, कपिल भलमे, विजय मिश्रा, सचिन बोंबले आदी सहभागी झाले होते.